समाजसेवेच्या ‘आरंभा’चा अमृतकुंभ

    25-Jan-2023   
Total Views |
‘आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’द्वारे आपल्या सामाजिक कार्याचा शुभारंभ करणार्‍या अमृता पुरंदरे यांचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख...
 
 
 
Amrita Purandare
 
अमृता पुरंदरे यांचा जन्म, विरारचा. त्यांचे संपूर्ण बालपण विरारमध्येच गेले. त्यांचे शालेय शिक्षण आगाशीतील के. जी. हायस्कूल या शाळेत झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून पूर्ण केले. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातून ’एम.कॉम’ ही पदवी मिळविली.


आपण समाजसेवेत उतरावे, असे अमृताचे मुळी उद्दिष्ट नव्हते. परंतु, सिंधुताई सकपाळ आणि सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचून समाजसेवेची प्रेरणा मिळाली, असे अमृता सांगतात. एकदा अमृता त्यांच्या गणेश दाते या मानलेल्या भावाबरोबर अनाथाश्रमात सामाजिक उपक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आपल्या शिक्षणाचा फायदा या अनाथांसाठी करावा, असा विचार अमृता यांच्या मनात आला. त्यानंतर २०१७ साली त्यांनी ’आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ’आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’ हे महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण यांसारख्या क्षेत्रात समाजकार्यातून योगदान देते.

अमृता यांच्याकडे २०१८ साली एक केस आली होती. त्यात एक ७०-७५ वर्षांची आजी तीन-चार दिवस रस्त्यावर फिरत होत्या. त्या आजी मनोरुग्ण असून त्यांना (एड्स), कुष्ठरोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांना चार मूलं आणि एक मुलगी असल्याचे अमृताला कळले. परंतु, त्या आजी स्वतःच्या कुटुंबाला त्रास होऊ नये, म्हणून आपल्या मुलांची नावं सांगत नव्हत्या. त्यावेळी त्या आजींना आश्रमात दाखल करण्यासाठी अमृता आणि तिच्या सहकार्‍यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, एड्ससारख्या आजाराबद्दल असणारे गैरसमज आणि मानसिकतेमुळे त्या वृद्ध महिलेला शेवटी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पण, या घटनेने अमृता यांना मोठा धक्का बसला. ही घटना त्यांना इतकी अस्वस्थ करून गेली की, त्यानंतर त्यांनी गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक आश्रमांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. आज अमृता यांचा लोकसंपर्क वाढल्याने रस्त्यावरील निराधारांना आश्रमात मायेचे छत मिळवून देणे त्यांच्यासाठी सोपे झाले आहे.

असाच आणखीन एक प्रसंग. अमृता दिवाळीच्या दिवसामध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावर काही फुगे विकणारी लहान मुले त्यांना दिसली. त्यावेळी खाद्यपदार्थ विकणारा दुकानदार त्या मुलांना हडतूड करत होता. या प्रसंगानंतर अमृता यांनी त्यावर्षीची दिवाळी फुगे विकणार्‍या लहान मुलांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुलांच्या चेहर्‍यांवरील आनंदाने मिळणारे समाधान हे अविस्मरणीय असल्याचे ही अमृता सांगतात. तसेच, कोरोनाच्या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढत होते. त्यावेळी ऑनलाईन योगाचे व्याख्यान संस्थेद्वारे घेतले होते. अमृता या मध्यवर्गीय कुटुंबातून येतात त्यामुळे सामाजिक उपक्रमासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्या स्वकमाईतील काही भाग राखून ठेवतात. वेळप्रसंगी सहकार्‍यांनीही उदार मनाने मदत केल्याचे त्या सांगतात. व्यसनमुक्ती, कचरा व्यवस्थापन, मानसिक आरोग्य यांसारख्या अनेक विषयांबद्दल त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. समाजसेवेची नव्याने सुरुवात केल्याने संस्थेचे नाव ’आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’ ठेवल्याचे सांगायलाही अमृता विसरत नाही.

‘आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’मध्ये जानारोसा फर्नांडिस, प्रीती धबधबे, गणेश दाते, आशिष कवळी, शालिनी शंभरकर, गणेश घुगे, रॉबिन लोपिस, रफिक सैय्यद, उमेश सावंत, अमोल पुरंदरे, स्मायली वाझ, नितेश पाटील, श्रद्धा अष्टिवकर, विनोद साडविलकर यांच्यासहकार्याने आरंभचे काम सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे, सगळ्या जाती-धर्माचे लोक या संस्थेत मिळूनमिसळून काम करतात. समाजकार्यामागील पाठिंबा आणि प्रेरणा याविषयी विचारले असता अमृता म्हणतात की, “माझ्याकडून हे सगळं सामाजिक काम घडतंय, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आणि स्वामींची कृपा.”

‘आरंभ सामजिक प्रतिष्ठान’तर्फे महिलांच्या मासिक पाळीबद्दल व्याख्यान, रस्त्यावरील निराधारांना वृद्धाश्रमात दाखल करणे, त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणे, दिव्यांगांसाठी ’दृष्टी पल्याडची सृष्टी’, झाडं खिळेमुक्त करणे, ज्येष्ठांना विनामूल्य टिफीन पोहोचवणार्‍या संस्थेसाठी (समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट)साठी निधी संकलन करणे, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध, ‘कोविड’काळ आणि व्यसनांचे दुष्परिणाम, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर योगशास्त्र या विषयांवर प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना लोकसहभागातून मोफत एक महिन्याची औषधे मिळवून देणे, दीप अमावस्येला रा. स्व. संघासोबत दीपपूजनाचा कार्यक्रम करणे यांसारखे जवळजवळ ३३ हून अधिक वेगवेगळे उपक्रम ’आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’तर्फे राबविले जातात.

जिथे समाजाला गरज आहे, तिथे ’कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे ‘आरंभ सामाजिक प्रतिष्ठान’ काम करत असल्याचे अमृता सांगतात. अमृता यांना ‘लायन्स क्लब ऑफ विरार’ तर्फे सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कारांनीदेखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, ‘कोविड’ काळातील कामासाठी ‘डेटॉल सॅल्युट’ आणि ‘आमची वसई सामाजिक संस्था - वसई’, ‘कुटुंब फाऊंडेशन- सातारा’, ‘ध्यास फाऊंडेशन- वसई’ व बहुजन विकास आघाडी बोळींज, यांच्याकडून ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. भविष्यात पूर्णवेळ समाजसेवेत झोकून देण्याचा अमृता यांचा मानस आहे. अमृता यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!


 
-सुप्रिम मस्कर



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.