दशकात इंडो-अमेरिकन नागरिक हा अमेरिकेत एक प्रभावशाली गट म्हणून उदयास आलेला दिसतो. तसेच येथील आर्थिक सुबत्तेबरोबरच इंडो-अमेरिकन मंडळींचाही अमेरिकेच्या राजकारणात चांगलाच वरचश्मा कालौघात निर्माण झाला. मग प्रमिला जयपाल असो किंवा निक्की हेली, यांच्यासारखे अनेक राजकारणी या गटातून पुढे आलेल्यांपैकी एक. इतकचं नव्हे, तर तिकडे ऋषी सुनक युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्यापासून त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत होती. कारण, ऋषी सुनक हे युकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले मूळ भारतीय वंशाचे व्यक्ती. दीडशे वर्षं भारतावर राज्य करणार्या देशाच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक बसल्याने जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये आनंदाला उधाण आले. युकेनंतर आता ‘युएसए’ अर्थात ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरही भारतीय वंशाचा व्यक्ती विराजमान होण्याच्या शक्यतेमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या प्रभावशाली राजकीय व्यक्तींपैकी एक म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ‘प्रोग्रेसिव्ह विंग’चा एक प्रमुख आवाज असलेले रो खन्ना.
रो खन्ना म्हणजेच रोहित खन्ना हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ‘प्रोग्रेसिव्ह विंग’मधील एक प्रमुख नेते. पेशाने वकील असूनही सध्या कॅलिफोर्निया राज्यातून ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’, युएस काँग्रेसच्या खालच्या सभागृहाचे ते सदस्य आहेत. तसेच त्यांचा डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुरोगामी राजकारणाशी सखोल संबंध आहे. सध्या ते युएस काँग्रेसच्या ‘प्रोग्रेसिव्ह कॉकस’चे डेप्युटी तर ‘डेमोक्रॅटिक कॉकस’चे ‘साहाय्यक व्हिप’ म्हणून काम पाहतायत. कायदेकर्त्यांचा एक गट असतो जो अनेक सर्वसामान्य कारणांसाठी एकत्र येऊन काम करतो, त्याला ‘कॉकस’ म्हणतात. खन्ना यांनी 2009 ते 2011 या कालावधीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखालील ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स’मध्ये उप साहाय्यक सचिव म्हणूनही काम केले. अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात त्यांची कारकिर्द जरी मोठी असली तरी रो खन्ना यांचे पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत सहभागी होण्याबाबत रंगलेली राजकीय चर्चा. गेल्या काही दिवसांपूर्वी रो खन्ना यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींबाबत तेथील ‘पॉलिटिको’ या न्यूज पोर्टलने एक अहवाल सादर केला.
त्यात असं म्हटलयं की, खन्ना यांच्या अलीकडील हालचालींमुळे अनेक प्रमुख राज्यांतील डेमोक्रॅट्समध्ये अशी अटकळ पसरली आहे की, युएस काँग्रेसचे लक्ष हे अमेरिकेच्या उच्च पदाकडे लागले आहे. बराक ओबामा यांच्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेली व्यक्ती म्हणजे जो बायडन. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली होती. अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होतात. त्यामुळे रो खन्ना येत्या 2024च्या निवडणुकीच्या तयारीत असल्याचे संकेत ‘पॉलिटिको’ न्यूज पोर्टलच्या अहवालातून देण्यात आले आहेत. 2024 किंवा 2028 च्या निवडणुकीसाठी रो खन्ना हे उत्तम उमेदवार असल्याचेही बोलले जाते. मात्र, आगामी 2024च्या निवडणुकीत जो बायडन यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तरच रो खन्ना राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतआपलं खातं उघडू शकतात. रो खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत संकेत दिले की, बर्नी सँडर्स यांच्या बर्याच समर्थकांनी त्यांना या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीकडे पाहण्यासाठी प्रोत्साहित केल्याने युएस काँग्रेसचे वरचे सभागृह असलेल्या सिनेटमध्ये निवडणूक लढवायची की नाही यावर येत्या काही महिन्यांत ते विचार करणार आहेत. मुख्य म्हणजे प्रत्यक्षात अमेरिका आणि भारताचे संबंध आणखी चांगले सुधारणे, हा मूळ हेतू असल्याचे रो खन्ना यांचे म्हणणे आहे.
रो खन्ना राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताच्या दृष्टीनेसुद्धा तो एक महत्त्वाचा भाग ठरेल. कारण, रशियासोबतच्या क्षेपणास्त्र करारावर भारताला बंदी घालण्यापासून वाचवण्यात रो खन्ना यांची मोठी भूमिका होती. ‘काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट’ मध्ये दुरूस्तीसाठी ऐतिहासिक विधेयक त्यांनीच प्रस्तावित केले होते. भारत-अमेरिका मैत्री मजबूत करणे, हा त्यामागचा त्यांचा विचार होता. त्यामुळे ब्रिटनप्रमाणेच अमेरिकेतही भारतीय वंशाची व्यक्ती नेतृत्व करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
-ओंकार मुळ्ये