उद्योजिका मेघना यांची बांधिलकी

    15-Jan-2023   
Total Views |
मेघना कुलकर्णी


मेघना कुलकर्णी, डोंबिवलीतील शैक्षणिक, सांस्कृतिक अणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व. ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या मेघना डोंबिवलीकर झाल्या. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षिका, समाजसेविका ते उद्योजिका अशी यशस्वी वाटचाल केली. त्यांच्या या वाटचालीचे उलगडलेले पैलू...



मेघना यांचे पूर्वाश्रमीचे नाव रेखा कुलकर्णी. त्यांचा जन्म १९५४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावी एका शेतकरी कुटंबात झाला. शेतातील छोट्या घरात आई-वडील, आजी-आजोबा, तीन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार राहत होता. शेतीतील तुटपुंज्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालत होता. मेघना यांना बालपणापासून शिक्षणाची ओढ होती म्हणुनच शाळेत जाण्यासाठी दररोज पाच किलोमीटर अंतर त्या आनंदाने पार करत असत. मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांचा विरोध होता. पण घरातील इतर सदस्यांच्या आग्रहाने मेघना यांनी शिवराज महाविद्यालयात प्रवेश घेतला.महाविद्यालयीन शिक्षणाची दोन वर्षे होताच मेघना यांचे लग्न ठरले. पती कल्याणच्या एका महाविद्यालयात व्याख्याते असल्याने विवाहानंतर मेघना डोंबिवलीत वास्तव्यास आल्या.

एका छोट्या घरात त्यांचा संसार सुरु झाला. हळूहळू शहरी जीवनाची त्यांना सवय झाली. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती पण त्या वेळी मुंबई विद्यापीठात बाहेरून परीक्षा द्यायची सोय नव्हती. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी बी.एची पदवी प्राप्त केली. पुढे उल्हानगरमधील एका महाविद्यालयातून त्यांनी एम.ए अणि बी. एड् या पदव्यादेखील प्राप्त केल्या. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी दोन मुली अणि एक मुलगा या अपत्यांना जन्म दिला. खेडेगावातील एका मुलींनी डोंबिवलीत येऊन उच्च विद्याविभूषित होण्याचा मान पटकाविला.

बी.एड् झाल्यानंतर कल्याणच्या नूतन विद्यालयात त्या साहाय्यक शिक्षिका या पदी नोकरीवर रुजू झाल्या. विषयाचे सखोल ज्ञान आणि शिकवण्याची एक वेगळी कला यामुळे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका झाल्या. सहकारी शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे मेघना यांनी शाळेच्या परीक्षा, सांस्कृतिक, क्रीडा, सहली अशा सर्व विभागात भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत पुण्याच्या शिक्षण मंडळाने मेघना यांची १०वी च्या मराठी पुस्तक संपादक मंडळावर नियुक्ती केली. तिथेही आपली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. २४ वर्षे अविरत सेवा करून २०१२ साली मेघना सेवानिृत्त झाल्या. पण त्यांनी आपले अध्यापनाचे काम मात्र सुरु ठेवले. सत्तरीकडे वाटचाल करणार्‍या मेघना कुलकर्णी आज ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थांना मराठी अणि समाजशास्त्र या विषयांचे मार्गदर्शन करतात.

ध्येयपूर्ती अणि छंद जोपासण्यासाठी वयाची अट नसते, हे मेघना यांच्याकडे पाहिले की नक्की पटते. विविध विषयांवर व्याख्यान देणे, स्पर्धांमध्ये सहभाग घेणे, शाळेतील मुलांना संस्कृत शिकवणे असे त्यांचे उपक्रम सुरु असतात. भगवद्गीतेचा अभ्यास करून त्या गीताव्रती झाल्या. पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची परीक्षा त्यांनी दिली आहे. नुकतीच त्यांची दासबोध अभ्यासक्रमाच्या परीक्षा समीक्षक पदी नेमणूक झाली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा ‘साहित्य भूषण’ हा पुरस्कार मेघना यांना प्रदान करण्यात आला आहे.

शिक्षण आणि सामाजिक कारकीर्द सुरु असताना मेघना यांनी एक गृहउद्योग सुरु केला. रुचकर पदार्थ तयार करण्याचे कौशल्य अणि स्वयंपाकाची आवड यामुळे अल्पावधीत त्यांच्या गृहउद्योगाने छान जम बसविला. पुढे एमआयडीसी परिसरात एक जागा घेऊन यशदा गृहउद्योग जोमाने सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, भाजण्या, मोरावळा, मसाला सुपारी, हळद, मिरची पुड, पापड असे दहा ते बारा पदार्थ त्या बनवू लागल्या. शबरी सेवा समितीतर्फे कुपोषित मुलांना पौष्टिक आहार देण्याचे काम चालते. मेघना यांच्या गृह उद्योगातर्फे दर महिन्याला दोन हजार शेंगदाणा लाडू, दोन हजार गहू लाडू अणि १५ किलो सातू पीठ शबरी सेवा समितीला ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर पुरविले जात होते. परंतु, भारनियमनाच्या काळात हा उद्योग काहीसा विस्कटला.


 पुन्हा हा उद्योग छोट्या स्वरूपात त्यांनी घरातूनच सुरु ठेवला. आजही अनेकांना मागणीनुसार त्या विविध पदार्थ बनवून देतात.सतत कार्यमग्न असावे, हे तत्त्व मेघना नेहमी पाळतात. डोंबिवलीतील अनेक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. नागरिक मंडळ, स्वरुपिणी भगिनी मंडळ, जिजाऊ महिला मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, संस्कार भारती, इतिहास संकलन समिती, भारतीय शिक्षण मंडळ, राष्ट्रपुरूष स्मृती समिती, दासबोध मंडळ, गीता पठण मंडळ अशा अनेक संस्थांशी त्या संलग्न आहेत.

आपली सामाजिक अणि व्यावसायिक कारकीर्द पुढे नेताना त्यांनी कौटुंबिक जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडली. संधी मिळेल तेव्हा गावाला जाण्यात त्यांना नेहमी आनंद वाटतो. आजमितीस पती, दोन मुली, जावई, मुलगा, सून अणि पाच नातवंडे अशा परिवारात मेघना फार समाधानी आहेत. मैत्रिणींनी दिलेले प्रोत्साहन आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा त्या नेहमी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. खेडेगावातून आलेली एक नवविवाहिता केवळ जिद्द चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आपला संसार सांभाळून आपल्या स्वप्नवत ध्येयाला गवसणी घालू शकते, हे मेघना यांनी दाखवून दिले आहे. मेघना कुलकर्णी यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा.








आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.