मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
कोविड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स पाठवला असून सोमवारी कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याचे आदेश चहल यांना समन्सच्या माध्यमातून ईडीने दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या विविध कामांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी मागील वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचे देखील नाव पुढे आले आहे. तसेच या प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असून आता याच प्रकरणाचा समांतर तपास ईडीकडून देखील केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देखील चौकशी ईडीकडून केली जाणार असल्याचे समोर आले आहे.