समाजक्रांतिकारकाचे प्रेरक चरित्र

    14-Jan-2023   
Total Views |
Pioneer of Social Revolution - Maharshi Dayananda Saraswati

एकोणिसावे शतक येईपर्यंत भारताची अवस्था चमत्कारिक झाली होती. एकेकाळी अत्यंत उदार आणि खुले वातावरण असलेल्या हिंदू अवकाशाचे अनेक कारणांनी आकुंचन झाले होते. अन्यायकारक रुढींची बजबजपुरी माजली होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र सुधारकांनी कुप्रथांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. या ‘प्रबोधनपर्वा’तील सुधारकांच्या मांदियाळीमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे नाव म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती.
वेदांचे पुरस्कर्ते



दि. २० सप्टेंबर, १८२४ रोजी टंकारा (गुजरात) येथे सावकारी कुटुंबात जन्मलेल्या मूलशंकर त्रिवेदी या बालकाकडे लहानपणापासून कुठलीही गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याची दुर्मीळ वृत्ती होती. यातूनच तो घरादाराचा त्याग करून सत्याच्या शोधात बाहेर पडला. सत्याचा शोध घेण्यासाठी त्याने गुरूचाही शोध घेतला. परंतु, त्याला कुणी एकच असा गुरू लाभला नाही. अनेक संन्याश्यांना भेटत, त्यांच्याकडून सत्व घेत आणि फोलपटे बाजूला सारत मूलशंकर ज्ञानार्जन करत राहिला आणि अखेर इ. स. १८४८ मध्ये योगी पूर्णानंद यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यासी बनला. मूलशंकर आता ‘दयानंद सरस्वती’ बनले.

“दयानंदांच्या सर्व सैद्धांतिक मांडणीचा मूलाधार वेद हाच होता. वेदांमधील विचारांवर समाजाने चालावे आणि राष्ट्र घडवावे यासाठी ते आग्रही होते. वेदांमध्ये मूर्तिपूजेला स्थान नसल्याने त्यांनी मूर्तिपूजेला कडाडून विरोध केला. मूर्तिपूजेच्या अनुषंगाने रुजलेल्या कर्मकांडांमुळे भारतीयांचे कसे नुकसान होत आहे, याबद्दल ते जोरकसपणे त्याबद्दल बोलत. वेदांनी ब्राह्मणेतर जातींना तसेच स्त्रियांनाही यज्ञोपवीत धारण करण्याचे, मंत्रोच्चारण करण्याचे अधिकार दिले आहेत,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून ब्राह्मणेतर जातींना तसेच स्त्रियांना यज्ञोपवीत प्रदानही केले. यामुळे त्यांच्या कार्यात सर्व जातींचे लोक सहभागी झाले आणि दयानंदांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे कार्य प्रभावीपणे पुढे नेले.’सत्यार्थप्रकाश’ या आपल्या ग्रंथामधून त्यांनी प्रतिपादित केलेल्या विषयांची प्रस्तुत पुस्तकामधली यादी वाचून स्तिमित व्हायला होते आणि त्यांच्या चिंतनाला कुठलाच विषय वर्ज्य नव्हता हे लक्षात येते.

झंझावाती दौरे



आपल्या विचारांच्या प्रसारासाठी दयानंदांनी महाराष्ट्रापासून उत्तरेकडचा जवळपास सर्व भारत पालथा घातला. एका ठिकाणी ते दीर्घकाळ मुक्काम करत. विद्वानांशी शास्त्रार्थ करत. ‘मी...मी’ म्हणणार्‍यांना त्यांच्या युक्तिवादापुढे टिकणे शक्य होत नसे. मुक्कामाच्या ठिकाणी दयानंद अनेक व्याख्याने देत. पुणे मुक्कामी त्यांनी तब्बल ५० व्याख्याने दिली! त्यांच्या विचारांनी मंत्रमुग्ध होऊन अनेक लोक आर्यधर्माचे अनुसरण करू लागत (’हिंदू’ हा शब्द परकियांनी आपल्याला दिलेला असल्याने या शब्दाला दयानंदांचा विरोध होता म्हणून ते सनातन वैदिक धर्माला ‘आर्यधर्म ‘असे संबोधत).


सहिष्णुता आणि दयाभाव



दयानंदांच्या प्रवासात सर्व स्तरांतील लोक त्यांना भेटायला येत. अगदी मिशनरी, मौलवीही त्यांच्याशी चर्चा करत. दयानंद वादविवादात हिंदू धर्मातील अनेक पंथांच्या विचारसरणीवर, तसेच इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांवरही टीका करत असले तरीही त्यांनी कुणाबद्दलही वैयक्तिक द्वेषभाव बाळगला नाही. आपल्या प्रवासात ते अनेकदा मुस्लीम अथवा पारशी व्यक्तींच्या घरी मुक्काम करत. अनेक अन्यधर्मीय आर्यसमाजाचे अनुयायी बनले, तर काहींनी धर्म न बदलताही दयानंदांनी प्रतिपादन केलेली काही तत्त्वे अंगीकारली. कुणी मांसाहार करणे सोडून दिले, तर कुणी गोरक्षणाचा निश्चय केला.


कटू सत्य समाजाला सतत सांगितल्याचा परिणाम म्हणून दयानंदांवर अनेकदा शारीरिक हल्ले, विषप्रयोग झाले. तरीही आपल्या जीवावर उठलेल्यांना ते उदार अंतःकरणाने क्षमा करत. पण, पुढे हिंदूधर्मीय आणि मुस्लीमधर्मीय हितशत्रूंनी एकत्र येऊन केलेल्या या विषप्रयोगाचा परिणाम म्हणून दि. ३० ऑक्टोबर, १९८३ रोजी दयानंदांचे प्राणोत्क्रमण झाले. सुधारणेचा मार्ग कितीकाटेरी असू शकतो हेच यातून दिसून येते!



शुद्धिकार्य



मिशनर्‍यांच्या काव्याला बळी पडलेल्यांना, तलवारीच्या बळावर मुस्लिमांनी बाटवलेल्यांना सनातन धर्मात परत आणणे; जे धर्मांतरित होण्याच्या विचारात आहेत त्यांना सनातन धर्माचे महत्त्व पटवून देऊन धर्मांतरित होण्यापासून प्रवृत्त करणे हे महर्षींनी आपले कर्तव्य समजले. ’परधर्मात गेला तो आपल्यासाठी मेला’ असे टोकाचे भाव हिंदू समाजात रुजले असण्याच्या काळात दयानंदांनी दाखवलेली शहाणीव हिंदू धर्माला सशक्त करण्यास कारणीभूत ठरली. दयानंदांनी केलेल्या वैदिक परंपरेच्या अत्यंत प्रभावी मांडणीमुळे अब्राहमी धर्मांचेच नव्हे, तर जैनमतानुयीही सनातन वैदिक परंपरेकडे खेचून आणण्याचा चमत्कार घडला.


विचारांचा लढा विचारांनीच



परस्परविरोधी विचारांना मानणार्‍या विद्वानांनी समोरासमोर येऊन शास्त्रार्थ (वादविवाद) करावा, खंडन-मंडन करावे ही भारताची परंपरा आहे. दयानंदांनी हेच कार्य नेटाने केले. मूर्तिपूजेवरचा त्यांचा वैचारिक हल्ला प्रखर असे. परंतु, अशा तिखट विचारांचे रूपांतर हिंसेत न करणे, यामध्ये दयानंदांचे मोठेपण आहे. एका मॅजिस्ट्रेटने रस्तारुंदीच्या कामात येणारे एक मंदिर हटवण्यासाठी दयानंदांकडून मदत मागितली असता त्यावर दयानंद म्हणाले, “लोकांच्या मनमंदिरातल्या मूर्तिपूजेची भावना दूर करायची आहे. दगडविटांची देवळे नष्ट करून त्यातील मूर्ती नाहीशा करणे माझे काम नव्हे.” यावरुन मूर्तिपूजेला असणार्‍या विरोधातून मंदिरे आणि मूर्तिपूजकांवर हिंस्र हल्ले करणारे अब्राहमी धर्मांचे अनुयायी आणि महर्षींच्या विचारांमधील फरक नजरेत भरण्यासारखा आहे.


राष्ट्रहित सर्वोपरी



एकोणिसाव्या शतकात ’वाघिणीचे दूध’ पिऊन तरतरी आलेल्या अनेक सुधारकांना समाजसुधारणेला साहाय्यकारी ठरतील म्हणून मायबाप इंग्रज सरकारचे छत्र सदैव भारताच्या डोक्यावर राहावे असेच वाटत होते. दयानंदांनी मात्र समाजहिताच्या बदल्यात राष्ट्रहिताशी कधीही प्रतारणा केली नाही. व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी एकदा चर्चेनंतर दयानंदांना विचारले, “तुम्हाला संरक्षणाची आवश्यकता आहे का?” यावर दयानंद म्हणाले, “आपल्या शासनामध्ये आम्हांस प्रचारकार्यात काहीही अडचण नाही. आम्हांस संरक्षण नको आहे.” त्यावर नॉर्थब्रुक म्हणाले, “आमचे राज्य एवढे चांगले असेल, तर ते सदैव टिकून राहण्यासाठी तुम्ही प्रार्थना करणे योग्य राहील.” यावर दयानंद बाणेदारपणे म्हणाले, “अशी प्रार्थना मी करू शकत नाही. मी ईश्वरास अशी प्रार्थना करतो की, हे ईश्वरा! आम्हांस आमचे स्वराज्य लवकरात लवकर मिळो.”

महर्षींचा वारसा


वैचारिक मांडणी करणारी व्यक्ती उत्तम संघटन उभे करू शकतेच असे नाही. मात्र, दयानंदांनी उभ्या केलेल्या ’आर्य समाज’ या संघटनेची त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चातही वेगाने वाढ झाली.स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकप्रिय झालेल्या ’राष्ट्रीय शाळा’ म्हणजे दयानंदांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या शाळांचीच पुढची आवृत्ती होती. आर्यसमाजाच्या कन्यागुरुकुलांनी स्त्रियांसाठी मोठे कार्य केले. दयानंदांचा गोरक्षणाचा विचार कालांतराने देशव्यापी बनला.


श्यामजी कृष्ण वर्मा, लाला लजपतराय, मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल इत्यादी आर्यसमाजी नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात विलक्षण कामगिरी केली. दयानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या महनीय व्यक्तींची संख्याही मोठी आहे. शाहू महाराजांनी तर कोल्हापुरात सुरू केलेली विद्यालये कालांतराने आर्य समाजाला चालवायला दिली. त्यांनी सौराष्ट्रामध्ये १९२० साली आर्य समाजाच्या परिषदेत केलेले प्रस्तुत पुस्तकातले भाषण आवर्जून वाचावे असे आहे.


स्वयंप्रकाशी तारा


प्रबोधनपर्वातील सुधारकांना भारतीय समाजाचे उत्थान व्हावे, याची तळमळ असली तरी त्यापैकी अनेकांच्या प्रेरणा या पाश्चात्त्य विचार, धर्मग्रंथ आणि भाषेतून आल्या होत्या. दयानंदांना झालेली ज्ञानानुभूती मात्र कुठल्याही पाश्चात्त्य प्रभावाने झालेली नव्हती. कारण, त्यांना इंग्रजी भाषा अवगतच नव्हती. भारतातच मूळ असणार्‍या नानाविध विचारप्रवाहांच्या, पंथांच्या सखोल अभ्यासातूनच त्यांच्या समाजाच्या हित-अहिताबद्दलच्या धारणा बनल्या होत्या. पूर्णपणे देशी ज्ञानावर जोपासलेल्या त्यांच्या धारणा सती, हुंडा, बालविवाह, कर्मकांडे, बुवाबाजी यांच्यावर हल्ला चढवण्याआड कुठेही आल्या नाहीत. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी भारताबाहेरच्या विचारांच्या कुबड्यांची घेण्याची गरज नाही त्यांच्या कार्याकडे पाहून लक्षात येते.


राष्ट्रपुरुषाचा यथार्थ वेध


दयानंद आणि गांधीजी, दयानंद आणि जोतिबा फुले यांच्यातील साम्य आणि भेद दाखवणारी पुस्तकातली टिपणे विशेष उल्लेखनीय आहेत. पुस्तकाच्या शेवटी असणार्‍या ’विचारधन’ या विभागामधून दयानंदांनी मांडलेल्या राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, स्त्रीउद्धार, दलितोद्धार इ. संदर्भातील विचारांचे विवेचन केले गेले आहे.मर्यादित पृष्ठसंख्येत महर्षी दयानंदांच्या कर्तृत्वाचा वेध घेण्याचे आव्हान लेखक श्रीपाद जोशी यांनी समर्थपणे पेलले आहे. एका अद्वितीय राष्ट्रपुरुषाचे उत्तम चरित्र माफक किमतीत उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशकांचेही आभार मानायला हवेत.



पुस्तकाचे नाव : सामाजिक क्रांतीचे अग्रदूत - महर्षी दयानंद सरस्वती
लेखक : श्रीपाद जोशी
प्रकाशक : हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान
पृष्ठसंख्या : २९०
मूल्य : १२० रू.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रसाद फाटक

फर्ग्युसन कॉलेजमधून MCA शिक्षणानंतर सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी. माध्यमे, नाट्य, चित्रपट, साहित्य या विषयांत विशेष रस आणि फेसबुक, ब्लॉग आणि आता 'मुंबई तरुण भारत' या माध्यमांतून त्यावर सातत्याने लिखाण सुरू