जागतिक स्तरावर विचार करता इ. स. २०२२ या वर्षाचा समारोप फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेत आपण साजरा केला, तर आता २०२३ या वर्षाचा जागतिक क्रीडारंभ भारतीय राष्ट्रीय खेळाच्या विश्वचषक स्पर्धेने जानेवारी १३ ते २९ दरम्यान भारतात होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या राष्ट्रीय खेळाच्या संघाला शुभेच्छा देत त्याबद्दलचे हे विचार...
'Fµdµration Internationale de Hockey' (FIH) ’आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ’ (एफआयएच) ही हॉकी या खेळाची परिचालक संघटना असून त्यामध्येही फुटबॉलसारखीच क्रमवारी हॉकीसाठी लावली जाते आणि सद्यःस्थितीत त्यामध्ये एकूण ९५ देशांचा अंतर्भाव आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम व नेदरलँड्स हे अनुक्रमाने प्रथम तीन स्थानांवर असून बांगलादेश २९, श्रीलंका ३४ आणि आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणजे पाकिस्तान १७वा आहे, तर आपला भारत हॉकीच्या क्रमवारीत सहावा आहे. फुटबॉलस्नेही ब्राझीलसुद्धा हॉकी क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर आहे. तेव्हा हॉकी, फुटबॉल सहीत अनेक मैदानी खेळांचा विचार करता क्रिकेट एवढीच किंबहुना त्यांच्याहून अधिकच असेल,अशी लोकप्रियता फुटबॉलने संपादित केलेली आपण नुकतीच बघितली.
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
असे कितीही जरी असले तरी क्रीडा क्षेत्रात लोकमान्यता, राजमान्यता आणि लोकप्रियता यांमध्ये फरक असतोच. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, प्राणी, गीत कोणतं? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला लहानपणापासून ज्ञात असतात. असाच एक प्रश्न असतो की भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? आणि आपल्या झटकन तोंडात उत्तर येते ’हॉकी’. राष्ट्रीय खेळ कोणता याबद्दल कोणी म्हणतो धनुर्विद्या, तर कोणी कबड्डी, तर कोणी बुद्धीबळ, खो-खो, कुस्ती, बॅडमिंटन, मल्लखांब तर कोणी क्रिकेट; असे कोणी काय अन् कोणी काय! अनेकजण क्रिकेटचे समर्थन करत असताना खुद्द अनेक क्रिकेटवीर मात्र त्याला पाठिंबा देण्यात नाखुश आढळतात. खुद्द क्रीडा भारतीचे अध्यक्ष व जागतिक किर्तीचे क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी आपले मत मांडताना म्हटले होते की, “ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके हॉकीने जिंकली आहेत.
मेजर ध्यानचंद यांनी या भारताचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे हॉकीचाच राष्ट्रीय खेळ म्हणून हक्क आहे.” असा हा आपला राष्ट्रीय खेळ कोणता हा मुद्दा वारंवार चर्चेत येत असतो. त्यामधली एक-दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तेव्हा एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळात भारताने तब्बल आठ सुवर्णपदके जिंकली आहेत, त्या हॉकी या खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून भारत सरकारने अधिकृतपणे मान्यता द्यावी. संसदेत देखील यावर प्रश्नोत्तरं होत असतात. ऑगस्ट २०१२ मध्ये, केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालयाने लखनौ येथील ऐश्वर्या पराशर या दहा वर्षांच्या मुलीने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) उत्तरात घोषित केले होते की, भारतात राष्ट्रीय खेळ नाही.
हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा जाहीर करणारा कोणताही अधिकृत आदेश त्यांना सापडला नाही, असे सांगून केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालयाने त्याकडे पाठ फिरवली. भारत सरकारच्या संकेतस्थळावरही हा खेळ देशाचा ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेल्याने अनेकांना हा धक्का बसला आहे. अद्याप कोणत्याही खेळाला ‘राष्ट्रीय खेळा’चा दर्जा दिलेला नाही, असे असले तरी सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘राष्ट्रीय खेळ’ म्हणून हॉकीचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. तेव्हा हॉकीला अधिकृतपणे ‘राष्ट्रीय खेळा’चा दर्जा नाही, हे आजही सत्य आहे, असे असले तरी जागतिक स्तरावरही पाकिस्तान आणि भारत अशा दोघांचाही लोकप्रिय (राष्ट्रीय) खेळ हॉकीच आहे, असे मानले जाते.
राष्ट्रीय खेळाचा विश्वचषक....
अशा या राष्ट्रीय खेळाच्या विश्वचषक स्पर्धा भारतात पुन्हा एकदा आयोजित करण्यात येत आहेत. ‘एफआयएच’ ओडिशा हॉकी पुरुषांचा विश्वचषक २०२३ या भुवनेश्वर राऊलकेला येथील स्पर्धेत प्रथमच १६ संघ असतील, तत्पूर्वी या स्पर्धा १२ संघांमध्ये खेळवल्या जात होत्या. आजतागायत सहा देशांनीच हॉकीचा विश्वचषक जिंकला आहे. पाकिस्तानने १९७१, १९७८, १९८१, १९९४ साली, नेदरलँड्सने १९७३, १९९०, १९९८ साली, ऑस्ट्रेलियाने १९८६, २०१०, २०१४ साली, जर्मनीने २००२, २००६ साली, बेल्जियम २०१८ साली आणि भारताने फक्त एकदाच १९७५ साली. प्रत्येक चार देशांचा एक असे अ, इ उ, आणि ऊ असे चार गट असतील. आपल्या ’ऊ ’ गटात जागतिक क्रमवारीतला पाचवा इंग्लंड, आठवा स्पेन, १५ वा वेल्स या देशांचा समावेश आहे. भारत आशियाई हॉकी संघटनेतील देश असून इंग्लंड, स्पेन व वेल्स हे तिघेही युरोपीय हॉकी संघटनेतील देश आहेत.
या स्पर्धा दूरचित्रवाणीवरील ‘स्टार स्पोर्ट्स’, ‘डिस्ने+’ किंवा ‘हॉटस्टार’ या वाहिन्यांवर बघता येतील. आपण कतारमधील ‘फिफा’ विश्वचषकाचा आनंद घेत आपापल्या लाडक्या संघाला प्रोत्साहित केले होते तसे आता आपल्याच देशात, आपल्याच देशाला आपल्याच राष्ट्रीय खेळाचा विश्वचषक जिंकण्यास प्रोत्साहित करत तो आनंद साजरा करू. आपले साखळी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, १९.०० म्हणजे ७ वाजता असतील.
भारताने विश्वचषक जर जिंकला, तर त्यातील खेळाडूंना एक कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा नवीन पटनायकांनी केली आहे. पर्यावरणाशी समतोल साधत खेळ व खेळाडूंसाठी अंमलात आणलेल्या तेथील पायाभूत सुविधा या अप्रतिम आहेत. हॉकी म्हटले की, आधी दिल्ली, पंजाब-हरियाणा डोळ्यासमोर येत असे पण आता ओडिशाची थोड्या काळात केलेली लक्षणीय कामगिरी इतर राज्यांसाठी पथदर्शक ठरणारी असेल. हॉकीमय झालेल्या हॉकीवेड्या नवीन पटनायकांवर त्यांचे विरोधक टीका करत असले तरी त्याची तमा न बाळगता ते ’हॉकीसाठी काय पण..’ असे दाखवून देत सिद्ध करत आहेत की, आपला राष्ट्रीय खेळ हॉकीच आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रेक्षणीय सामना बघायलाच तेथे गर्दी होते, तर प्रत्यक्ष स्पर्धेच्यावेळेस काय होईल! हे फक्त नवीन पटनायकांचेच हॉकी प्रेम दिसते असे नाही, तर ओडिशा, भारत अशांसकट विदेशी प्रेक्षकांचे हॉकीप्रेम आता दिसून येईल. मग का बरं म्हणू नये आपण की हॉकी हा ‘राष्ट्रीय खेळ’ आहे म्हणून!
आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यावेळी अपात्र ठरल्याकारणाने तो या स्पर्धेत नाही. इ. स. १९६९ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) परिषदेच्या एका बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले होते. तेव्हा पाकिस्तान हॉकी संघटनेचे प्रमुख एअर मार्शल नूर खान यांनी प्रस्ताव दाखल करत, या स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करण्यात याव्यात, असा आग्रह धरला होता. परंतु, भारतीय उपमहाद्वीपातील पाकची राजकीय पार्श्वभूमी बघता, स्पेनमध्ये या स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. तो पहिला विश्वचषक ६१ सेंमी लांबीचा होता. पाक सैन्यातील कारागिरांनी तो घडवताना सोने व चांदीचा वापर त्यात केला होता.
इ.स. १९७०चा काळ हॉकीच्या दृष्टीने आणि त्यातही भारताच्या दृष्टीने बदलांचा काळ होता. त्याच काळात कृत्रिम हिरवळ ’एस्ट्रो-टर्फ’ हॉकीच्या मैदानांत उगवत फोफावत होती. खेळाच्या मैदानातील बदलांमुळे खेळाडूंच्या कौशल्यात फरक होऊ लागला, त्यांच्या प्रदर्शनावरही फरक दिसू लागला. युरोपीय खेळाडूंना उपयोगी ठरलेल्या या ‘एस्ट्रो-टर्फ’वर खेळण्याची क्षमता व उपलब्धता मिळवण्यास एक-दोन पिढ्या लागल्या. हळूहळू उत्क्रांती होत आता या पिढ्या सरसावू लागल्या आणि परत आपले कौशल्य दाखवू लागल्या आहेत.
१९७१चा हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा दि. १५ ते २४ ऑक्टोबर १९७१ दरम्यान स्पेन, बार्सिलोना शहरात खेळवली गेली. दहा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये स्पेनचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले. भारतीय हॉकी संघ तिसर्या क्रमांकावर होता.
भारताने ऑलिम्पिक पदके मिळवली आहेत. परंतु, हॉकीचा विश्वचषक फक्त एकदाच जिंकला आहे. तो विश्वचषक १९७५चा क्वालालंपूर येथील. हॉकी विश्वचषक स्पर्धेचे ते तिसरे सत्र होते. त्या भारतीय संघात एकमेव मुस्लीम खेळाडू होता की ज्याच्या खेळाने तो विश्वचषक मिळवायला मदत झाली होती. त्या संघात ध्यानचंद पुत्र अशोक कुमारही होता, त्याचे वडील ध्यानचंद आणि असलम शेरखानचे वडील हे १९३६च्या ऑलिम्पिकमध्ये एकत्र होते. ही दुसरी पिढी भारतीय संघात होती. अजितपाल सिंग हा त्यांचे नेतृत्व करत होता. सुरजित सिंगने अशोक कुमारने पाठवलेल्या चेंडूवर गोल केला होता. असलम शेरखान याला बराच वेळ मैदानात उतरवले नव्हते. पण एकत्रित विचारांती त्याला खेळायला उतरविण्यात आले. त्याने भारताचा दुसरा गोल केला आणि भारत विश्वचषक विजेता ठरला.
पहिल्या हॉकी विश्वचषकाला घेऊन भारतीय संघ जेव्हा परतला तेव्हा इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होत्या. त्यांनी संघाला भेटून शाबासकीही दिली होती. आता पटनायकांच्या राज्यातून विश्वचषक घेऊन आपला संघ नरेंद्र मोदींना भेटेल तेव्हाचा क्षण विशेष असेल, कारण मोदींसारख्या नेत्याच्या संघातली अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू, राजवर्धनसिंह राठोड अशा क्रीडामंत्र्यांची वेळोवेळी होत असलेली मदत सार्थकी लागेल. भारताच्या अमृत महोत्सवी काळातला हा सोहळा नक्कीच संस्मरणीय असेल. लागोपाठ दुसर्यांदा नवीन पटनायकांनी आयोजित केलेली ही स्पर्धा भारतीय संघाला लाभदायक होवो आणि या वेळचाच विश्वचषक नव्हे तर पुढचा विश्वचषक देखील मिळो, ही समस्त क्रीडाप्रेमींच्या वतीने ध्यानचंदांच्या व आपल्या मातृभूमीकडे आपण मागणे मागू.
श्रीपाद पेंडसे
(लेखक वनवासी कल्याण आश्रम, खेलकूद आयाम आहेत.)