चीनचे भारताविरोधातील ‘मल्टिडोमेन युद्ध’

    14-Jan-2023   
Total Views |
Multidomain War' Against India


सध्या चीन हा देश भारत आणि जगातील अनेक देशांच्याविरुद्ध ‘मल्टिडोमेन वॉर’(एकाच वेळेला चीन भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध) लढत आहे. जी अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. चीन यामध्ये अनेक प्रकारच्या लढायांचा वापर करत आहे. ही लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये घुसलेली आहे. याचे एक सर्वात चांगले उदाहरण म्हणजे चीनने जगाविरुद्ध/भारताविरुद्ध चालवलेले चिनी व्हायरसचे जैविक महायुद्ध. त्याविषयी सविस्तर...


'मल्टिडोमेन वॉर’ हे ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ (प्रतिबंधित युद्ध) (unrestricted war)किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध, हायब्रीड वॉर, ग्रे झोन युद्ध (grey zone war) यांचे मिश्रण आहे. हे युद्ध ‘नॉन-कोनटॅक्ट वॉर’ म्हणजे संपर्क नसलेले युद्ध (non-contact war) किंवा ‘कायनेटिक वॉर’ (kinetic war) या दोन्ही पद्धतीने लढले जाते. ‘कायनेटिक वॉर’मध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने लढतात, सैनिक त्यांच्याकडे असलेली शस्त्रे रायफल, मशीन गन, तोफा, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टरचा वापर करतात. शस्त्रास्त्र आणि सैन्याच्या बळावर झालेल्या लढाईत बरेच नुकसान होते, अशी युद्धे खूप महाग असतात. परंतु, ‘मल्टिडोमेन वॉर वॉरफेअर’मध्ये कमी किमतीमध्ये, न कळता आपल्याला शत्रूचे नुकसान करता येते.

सैनिक आणि नागरिकांमधला फरक धुसर


युद्धाचे अनेक नवीन आयाम यापुढे सैनिक आणि देशातील इतर नागरिक यांच्यामधला फरक धुसर होत राहील. युद्ध कुठेही, केव्हाही सुरू होऊ शकेल. यामध्ये युद्धाचे अनेक नवीन आयाम वापरले जातील. उदाहरणार्थ आर्थिक युद्ध(economic war), व्यापार युद्ध (trade war), सांस्कृतिक युद्ध (cultural war), पर्यावरण युद्ध/ ‘एन्व्हायरमेंटल’ युद्ध ,कायद्याचे युद्ध (legal war),मुत्सद्देगिरीचे युद्ध (diplomatic war).‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ ही एक लष्करी रणनीती आहे. ज्यात राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध, निवडणूक हस्तक्षेप यांचे मिश्रण आहे. ‘मल्टिडोमेन वॉरफेअर’ अनेक प्रभावी पद्धतींना एकत्र करते.

हे युद्ध २४ तास, आठवड्यातून सात दिवस आणि वर्षांतून ३६५ दिवस चालू राहील. त्यामुळे याची व्याप्ती प्रचंड आहे. हे युद्ध केवळ सीमेवर नाही, तर भारताच्या आत वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाच वेळेला लढले जात आहे. त्यामुळे यामध्ये भारताचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था, वेगवेगळी राज्य सरकारे, केंद्र सरकार, सुरक्षा एजन्सीज सैनिक म्हणून सामील आहेत.या युद्धामध्ये बुद्धीबळाप्रमाणे वेगवेगळे मोहरे वापरले जातील, कधी राजकीय युद्ध, कधी आर्थिक युद्ध, कधी आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर, कधी युद्धाच्या धमक्या देऊन, देशातील नेतृत्वाला, मीडियाला आणि सैनिकांना घाबरले जाईल.

‘मल्टिडोमेन वॉर’मध्ये चीनकडे असलेल्या सर्व ताकदीचा वापर करून युद्ध म्हणजे ‘मल्टिडोमेन वॉर’मध्ये चीनकडे असलेल्या सर्वसमावेशक ताकदीचा म्हणजेच ‘कॉमप्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर’चा (comprehensive national power) वापर केला जातो. साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून, युद्ध न करता शस्त्रांचा वापर न करता, हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. यापुढे अशी अनेक शस्त्रे वापरली जातील की, याविषयी जगाला काहीही कल्पना नसेल.

चिनी वेगवेगळ्या युद्ध पद्धतींच्या पुस्तकी व्याख्यांमध्ये न जाता, चीन जमिनीवरती ते युद्ध कसे लढतो आणि आपण त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, या मुद्द्यांवर आपण आपले लक्ष केंद्रित करू.आज चीनमध्ये कोरोना प्रचंड वेगाने पसरत आहे. चीनची अर्थव्यवस्था खराब अवस्थेत आहे, तरीपण चीन भारताविरुद्धचे ‘मल्टिडोमेन युद्ध’ थांबवण्याची शक्यता अजिबात नाही.म्हणून २०२३ मध्ये आपण या युद्धामध्ये आपले संरक्षण करण्याकरिता योग्य आणि सगळी पाऊले उचलली पाहिजे.

‘चिनी व्हायरस’चे जैविक महायुद्ध


कोरोनाचा विषाणू चीनमधून आलेला आहे, चीनमधील वुहान शहरातून कोरोना महामारीचा उगम झाला. आज या महामारीविरुद्ध सार्‍या जगाने युद्ध पुकारले असताना, चीनला मात्र यात संधी दिसू लागली आहे. कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या स्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या असताना, चीन स्वतःच्या आर्थिक ताकदीच्या बळावर भारत देशांच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.

चीनने कोरोनाबाबत भारताने विकसित केलेल्या लसींचा ‘फॉर्म्युला’ चोरण्याचेदेखील केलेले प्रयत्न उघडकीस आले आहेत. भारतीय लसीचा ‘फॉर्म्युला’ आभासी पद्धतीने चोरण्याचे प्रयत्न झाले. चीनमधील ‘हॅकर्स’च्या एका गटाने हे प्रयत्न केल्याची बाबही उघडकीस आली. ‘भारत बायोटेक’ आणि ‘सीरम’ या दोन कंपन्या कोरोनाच्या लसी तयार करण्यात आघाडीवर असून, त्यांचीच संगणक प्रणाली ‘हॅक’ करण्याचे झालेले प्रयत्न हाणून पाडले गेले. एका ‘इंटेलिजन्स’ कंपनीने चीनची ही हेरगिरी उघड केली.

आपल्याला नवीन विषाणूंपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक असताना, संपूर्ण जगाला लस आणि औषधे प्रदान करण्यासाठी जगाची फार्मसी बनण्याची एक उत्तम संधी देते भारताला मिळत आहे. आपण त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे.
भारत-चीन सीमेवर चीनची ‘सलामी स्लायसिंग’ किंवा घुसखोरी आता आपले लक्ष भारत-पाकिस्तान सीमेवरून काढून भारत चीन सीमेवर केंद्रित केले आहे. सीमेचे रक्षण करण्याकरिता आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून चीनला तिथे थांबवत आहोत. या सीमेवरती टेहळणी करणे, रस्ते बांधणे यामुळे गस्त घालण्याची आपली क्षमता आपण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, सीमेचे इंच इंच रक्षण करणे सोपे नसते.

आता अरुणाचल प्रदेशमध्ये १७ स्ट्राईक स्कोर आणि लडाखमध्ये एक स्ट्राईक स्कोरला नियुक्त केलेले आहे. त्यामुळे चीनवर आपण प्रतिहल्ला करू शकतो. म्हणून आपण जर चीनने घुसखोरी केली, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनच्या दुसर्‍या भागामध्ये घुसखोरी करून जशास तसे असे उत्तर देऊ शकतो का? अशा आक्रमक कारवायांची गरज आहे.अपप्रचार युद्धाचा, माहिती युद्धाचा, मानसिक युद्धाचा वापर करून जनतेचे मत परिवर्तन करणे, मीडिया वॉरफेरमध्ये, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. चीनचे अनेक हस्तक चीनच्या बाजूने अपप्रचार किंवा दुषप्रचार भारताच्या मीडियामध्ये करत असतात. मात्र, चीनच्या मीडियामध्ये अशा प्रकारचा प्रचार आपण करू शकत नाही. कारण, चीनच्या मीडियामध्ये कोणालाच प्रवेश नाही. सोशल मीडियाला चीनमध्ये प्रवेश नाही. मग चीनच्या विरोधात आपण आक्रमक माहिती युद्ध कसे लढायचे?


आक्रमक माहितीयुद्ध लढले गेलेच पाहिजे. फेसबुक किंवा ट्विटर यांना चीनमध्ये प्रवेश नाही. परंतु, चीनचा यांच्यावर प्रभाव जास्त आहे. चीन यावर अनेक ‘फेक अकाऊंट’ तयार करून दुषप्रचार करतो.जे चिनी नागरिक चीनच्या बाहेर आलेले आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आपण माहिती युद्ध लढायला पाहिजे. याशिवाय आपल्या देशात जे चिनी हस्तक कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करून अपप्रचार करत असतात त्यांना पकडून कायद्याच्याखाली वेगाने कारवाई करण्याची गरज आहे.यामध्ये सामान्य नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी देशाविरुद्ध, सैन्याविरुद्ध करण्यात आलेल्या कुठल्याही अपप्रचार किंवा दुष्प्रचारावर विश्वास ठेवू नये. आपला आपल्या देशावर, देशाच्या नेतृत्वावर सैन्यावर विश्वास असायलाच पाहिजे. चीन नक्कीच दहा फूट उंच नाही.


Multidomain War' Against India


अजून काय करावे?


या ‘मल्टिडोमेन वॉरफेअर’ला कसे प्रत्युत्तर द्यायचे? लक्षात असावे की, अशा युद्धात स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, अशाप्रकारची ऑपरेशन्स आपणसुद्धा चीनमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला, तर आम्हीसुद्धा चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनझियांग, हाँगकाँग इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना राजकीय मदत करू शकतो. त्यांनाही भारतात पर्यटक म्हणून यायला आवडेल.

चीनला जशास तसे हीच भाषा कळते, म्हणून त्यांच्या मानवधिकार संस्था, अल्पसंख्याकांच्या संस्थांशी आणि नेतृत्वांशी बोलून त्यांना राजकीय मदत करावी? आवडत नसेल, तर तुम्ही भारताच्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ करणे थांबवा. म्हणजेच जसे वेगवेगळे युद्ध चीन आपल्याबरोबर लढत आहे, तशाच प्रकारचे युद्ध आपण चीन विरोधात वेगवेगळ्या आघाडीवर सुरू केले पाहिजे. याशिवाय प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे!






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.