मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 1 जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला होता. यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्यावर कागल आणि पुण्यातील निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने आज पहाटेपासून छापेमारी केली आहे. ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यामध्ये मुश्रीफ यांचे जावई आणि मुलगा सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
काय आहे प्रकरण ?
2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला.