ऑस्ट्रेलियात खड्डेमुक्त रस्ते बांधणारा ठाणेकर

    11-Jan-2023   
Total Views | 112
Dr. Vijay Joshi

लोखंडापासून निघणार्‍या टाकाऊ मळीपासुन टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित करून ऑस्ट्रेलियात खड्डेमुक्त रस्ते उभारणारे डॉ. विजय जोशी या मूळ ठाणेकर अभियंत्याविषयी...

ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले डॉ. विजय जोशी यांचा जन्म ठाण्यात झाला. त्यांचे वडील भारतीय नौदलात, तर आई मुंबई महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या पत्नीही ठाणेकर असून सध्या त्या ऑस्ट्रेलियातील प्रथितयश रुग्णालयात पॅथोलॉजिस्ट आहेत. त्यांचे बालपण ठाणे पूर्वेकडील सुदर्शन कॉलनीत चाळवजा इमारतीत गेले. नजीकच्या शाळेत पहिली ते चौथी आणि मो. ह. विद्यालयात अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मराठी माध्यमातून घेतले. अ‍ॅड.हेमंत टाकसाळे, सुरेंद्र दिघे आदी प्रभृती त्यांचे सहअध्यायी होते. आठवीत असताना टेक्निकल विषय घेऊन शिकत असताना सुरेंद्र दिघेंचे वडीलबंधु शेखर दिघे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ११ वी पूर्ण झाल्यावर त्यांनी ’व्हीजेटीआय’मधून ‘सिव्हील इंजिनिअरिंग’ची पदवी घेतली.

‘व्हीजेटीआय’मध्ये प्रथम आल्यामुळे डॉ.गुपचूप यांच्या सहकार्याने मुंबई युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर इतरांप्रमाणे त्यांनाही परदेशात जाण्याचे वेध लागले होते.सुरुवातीला भारतात ‘टाटा’, ‘मिडलईस्ट’, ‘हमफ्रीज् अ‍ॅण्ड ग्लेक्सो’ (आताची जेकब इंजिनीअरिंग) या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना २५० फूट उंच ‘प्रिलिंग टॉवर’च्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंडमध्ये रस्ते बांधणीच्या कामात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. नंतर ऑस्ट्रेलियातील एडवर्ड सी लेव्ही या अमेरिकन कंपनीत ते रुजू झाले. मागील ३५ वर्षांपासून डॉ. जोशी सिडनी येथे स्थायिक असून ठाण्यात येऊन जाऊन असतात.

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करीत असतानाच स्टील उत्पादनादरम्यान तयार होणारी मळी रस्ते बांधण्यात कशी वापरता येईल, या विषयावर प्रबंध सादर करुन त्यांनी डॉक्टरेट मिळवली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रस्ते बांधले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सर्व रस्ते लोखंड व स्टील उत्पादनात तयार होणार्‍या मळीचा वापर करून बांधले. जोशी यांचे तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये सिडनी विमानतळाच्या धावपट्टीपासून ते देशातील वेगवेगळ्या भागांमधून जाणार्‍या शेकडो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचाही समावेश आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर ऑस्ट्रेलियात पीडब्ल्यूडी’नेही केल्याचे ते सांगतात.

स्टील उत्पादनात मुख्य उत्पादन तयार झाल्यानंतर उरलेल्या मळीमध्ये अस्फाल्ट मिसळले असता ते अजून टिकाऊ होते. यापासून बांधलेले रस्ते किमान २० वर्षे उत्तम राहतात. तशी बँक गॅरंटीच ठेकेदार कंपनीला द्यावी लागते. त्यांनी शोधून काढलेल्या या आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारने २०१२ साली त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणारा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा पुरस्कार आपल्याकडील ‘पद्मश्री’ पुरस्काराप्रमाणेच असतो. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरलाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, असे अन्य पुरस्कारही डॉ.जोशी यांना मिळाले आहेत.

डॉ. जोशी यांच्या या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती, खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून शेकडो कोटी टन (मुंब्रा पारसिक डोंगराएवढे पाच डोंगर भरतील एवढी खडी व माती) एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीची बचत झाली आहे. १९९५ साली सिडनी विमानतळ झाल्यानंतर १९९७ ते २००० पर्यंत त्यांची अमेरिकावारी सुरुच होती. सहा आठवडे ऑस्ट्रेलियात, तर दोन आठवडे परदेशात असा त्यांचा शिरस्ता असे. भारतासह जगभरातील स्टील प्लांटचा अभ्यास करून त्यांनी या मळीचे महत्त्व जाणले. अनेक कंपन्यांमध्ये ही मळी म्हणजे टाकाऊ वस्तूंचे डोंगर बनले होते. ती मळी अशी सत्कारणी लावून एकप्रकार पर्यावरण जतनाचेच कार्य डॉ. विजय जोशी करीत आहेत.

भारताचे दुर्दैव आहे की, आपल्या देशातील मूळचे भारतीय असणारे विद्वान लोक जगभरात इतकं सुंदर काम करत आहेत, ते आपल्याला मदत करायलासुद्धा तयार आहेत, पण आपण त्याकडे फक्त दुर्लक्ष करतो. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली, तेव्हा तेथील खासदाराने डॉ. विजय जोशी यांची ओळख करून देताना, ज्या ‘एअरपोर्ट’वर तुम्ही उतरलात, तो तुमच्या मूळ भारतीयाने बनवल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्लीला पोहोचताच मंत्री सुरेश प्रभू यांच्याकरवी फोन करून भेटीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार बनलेले डॉ. जोशी यांच्या सल्ल्यानुसार देशातील जमशेदपुर ते रांची रस्ता बनवला. मुंबई ते दिल्ली या महामार्गाचे काम प्रस्तावित आहे.

 महाराष्ट्र सरकारसाठीही त्यांना काम करण्याची इच्छा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाठभेट अद्याप होऊ शकली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. असे मौलिक काम केल्याबद्दल भारत सरकारकडून आजवर एकही रुपया घेतला नसल्याचे सांगताना , “मी जन्मलो त्या मातृभूमीचे पांग फेडणे, हे माझे कर्तव्यच आहे,” असे ते मानतात. अशा या भारताच्या सुपुत्राला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!




दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121