काही विमा कंपन्यांनी आरोग्य विमा पॉलिसीत ‘वेलनेस बेनिफिट्स क्लॉज’ अंतर्भूत केले आहेत. या क्लॉजच्या नियमांत जर पॉलिसीधारक बसला तर त्याला बरेच फायदे मिळू शकतात. प्रीमियमची रक्कम कमी भरावी लागते व अन्य फायदेही मिळतात. ‘आदित्य बिर्ला’ या आरोग्य विमा विकणार्या कंपनीने, २०२१ मध्ये ‘अक्टीव्ह हेल्थ प्लॅटीनम’ पॉलिसी लाँच केली. या पॉलिसीतील नियमांनुसार, जर पॉलिसीधारकाने आरोग्य राखले तर त्याचा पूर्ण प्रीमियम माफ होऊ शकतो.
या पॉलिसीचे फायदे मिळण्यासाठी पॉलिसीधारकाला एका दिवशी किमान दहा हजार पायर्या चढाव्या लागतात किंवा शरीरातील ३०० कॅलरी जाळाव्या लागतात किंवा जीममध्ये ३० मिनिटे व्यायाम करावा लागतो. असे महिन्यात किमान १२ दिवस केल्यासच तो पॉलिसीधारक ‘वेलनेस बेनिफिट्स’ मिळविण्यास पात्र ठरू शकतो.पॉलिसीधारक योग करीत असेल किंवा पोहण्याचा व्यायाम करीत असेल, तर ते यासाठी असलेल्या अॅपवर मोजले जात नाही. यासाठी शरीर तंदुरुस्त असल्याचे मूल्यमापन दर दहा महिन्यांनी करावे लागते.
‘आदित्य बिर्ला’ही जगात एकमेव अशी कंपनी आहे जी ‘वेलनेस बेनिफिट्स’ योजनेखाली प्रीमियममध्ये १०० टक्के सवलत देते. ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड हेल्थ इन्शुरन्स’, ‘बजाज अलायन्स स्टार हेल्थ’ या आरोग्य विमा कंपन्या प्रीमियममध्ये १०० टक्के सवलत देत नाहीत, तर वेगवेगळ्या पॉलिसींवर वेगवेगळी सूट देतात. यासाठीचे पॉलिसीत नमूद केलेले सर्व निकष पूर्ण केल्यास ‘बजाज अलायन्स’ कंपनी १२.५ टक्के प्रीमियममध्ये ‘डिस्काउंट’ देते. ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने नुकत्याच ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) व ‘वेलनेस रायडर लाँच’ केला आहे.
यात ही कंपनी मूळ प्रीमियममध्ये २५ टक्के डिस्काऊंट देते. एकूण पॉलिसीधारकांच्या सुमारे दहा टक्के पॉलिसीधारक हा पर्याय स्वीकारतात. एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत एकूण पॉलिसीधारकांच्या ३० टक्के पॉलिसीधारकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. एप्रिल ते जून २०२१ दरम्यान याचे प्रमाण २० टक्के होते. ‘वेलनेस बेनिफिट्स’ मध्ये ‘आदित्य बिर्ला अॅक्टिव्ह हेल्थ’, ‘आदित्य बिर्ला अॅक्टिव्ह अश्युअर डायमण्ड’, ‘निवाबूपा रिअॅश्युअर स्टार कॉम्प्रीहेन्सिव्ह’, ‘स्टार हेल्थ यंग स्टार’, ‘केअर प्लस’ आणि ‘मणिपाल सिग्ना प्राईम’ या पॉलिसीज लोकप्रिय आहेत.
वरिष्ठ नागरिक
वरिष्ठ नागरिकांच्या पॉलिसीवर फार चढ्या दराने प्रीमियम आकारला जातो. वरिष्ठ नागरिकांनी जर चांगले आरोग्य राखले तर त्यांनाही याचा फायदा घेता येऊ शकतो. वरिष्ठ नागरिकांसाठी दहा हजार पायर्या चढण्याचा नियम नसून, ७५०० पायर्या चढण्याचा निर्णय आहे. यात इतर फायदेही आहेत ते- पॉलिसीधारक औषधे अन्य आरोग्य संबंधित उत्पादने तसेच शारीरिक चाचण्या विमा कंपन्याच्या ‘सेवा भागीदार’ कंपनीकडून करून घेऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला मोफत मिळू शकतो. हा सल्ला जर पॉलिसीधारकाने पाळला तर त्याचे ‘वेलबिईंग’चे मार्क वाढतात. साऊथ आफ्रिकन ‘हेल्थ इन्शूरा डिस्कवरी हेल्थ’ या वेळनेस बेनिफिट्स पहिल्यांदा लाँच केले.
ही कंपनी विमानप्रवास किरकोळ विक्री व प्रवास यावरही या पॉलिसीअंतर्गत सवलत देते. पॉलिसीधारकाने आरोग्यादायी खाद्यपदार्थ विकत घेतले, तर त्याचा ‘वेलनेस स्कोअर’ वाढतो. ‘आदित्य बिर्ला’ने सात जीवनशैली भागीदारांबरोबर करार केले आहे. यामुळे ‘आदित्य बिर्ला’चे ग्राहक त्यांचे हेल्थ स्कोअर ‘अमेझॉन’, ‘उबेर’, ‘सॅमसंग’ यांची बिल भरताना ‘रिवार्ड पॉईंट्स’चा फायदा घेऊ शकतात. आरोेग्यदायक अन्न खाणार्यांना त्यांना यात प्रोत्साहन दिले जाते. पॉलिसीधारक त्यांचा नाश्ता, सकाळचे जेवण व रात्रीचे जेवण यांचे फोटो व्हॉट्सअॅप किंवा मेल करू शकतो. या पॉलिसीमुळे विमा कंपन्यांवरील ताण काहीसा कमी होतो आणि त्यामुळे विमा कंपन्यांचा नफाही वाढतो. त्यामुळे या ‘वेलनेस बेनिफिट्स’ पॉलिसी पॉलिसीधारक व विमा कंपन्या दोघांनाही फायदेशीर आहेत.
प्रवास विमा
परदेशी गेल्यावर वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे तुम्ही अडचणीत असाल, तर त्यापासून संरक्षण म्हणून प्रवास विमा पॉलिसी उतरविल्या जातात. यात दोन प्रकार आहेत. एक ‘सिंगल ट्रीप ट्रॅव्हल इन्शुरन्स’ योजना व दुसरी ‘मल्टिट्रिप ट्रॅव्हल इन्शुरन्स.’ एका वेळच्या प्रवासासाठी किंवा बर्याच वेळच्या प्रवासासाठी.
सिंगल ट्रिप
यात देशांतर्गत किंवा एका परदेशी प्रवासाचे संरक्षण मिळते. या पॉलिसीची मुदत १८० दिवसांची असते. तुम्ही एकाच प्रवासात बर्याच ठिकाणी जाणार असाल, तर ती एकच ट्रिप समजली जाते व या पॉलिसीत संरक्षण मिळते. तुमच्या देशातून विमानात बसल्यापासून ते तुमच्या देशात परत विमानातून उतरेपर्यंत ही पॉलिसी कार्यरत राहाते. पण, या दोन्ही कालावधीत १८० दिवसांहून अधिक अंतर असता कामा नये. कारण, या पॉलिसीची मुदत फक्त १८० दिवस असते. प्रवासात सामान हरवले किंवा चोरीला गेले, पासपोर्ट हरवला, तत्काळ दातांवर उपचार करून घ्यावे लागल्यास, प्रवासाची कागदपत्रे, वैयक्तिक महत्त्वाच्या वस्तू हरविणे या सर्वांची भरपाई या पॉलिसीद्वारे मिळू शकते.
मल्टिट्रिप ट्रॅव्हल विमा
हा विमा एक वर्षांसाठी उतरविता येतो. या एका वर्षांत पॉलिसीधारक कितीही प्रवास करू शकतो. ‘सिंगल ट्रिप’मध्ये मिळणारे सर्व संरक्षण या पॉलिसीतही मिळते. दोन्ही प्लान सारखेच संरक्षण देतात, फक्त यांचा कालावधी वेगवेगळा असतो. वर्षात किती ट्रिप असतील, यानुसार पॉलिसीची निवड करावी. ट्रिपचा कालावधी किती दिवसांचा आहे, हा मुद्दाही विचारात घ्यावा लागतो. जे अधिक दिवसांची (सहा महिने) एकच परदेशी ट्रिप करतात, त्यांच्यासाठी सिंगल ट्रीप पॉलिसी योग्य आहे. मल्टिट्रिप पॉलिसी, तुम्ही विकत घेतलेल्या दिवसापासून ३६५ दिवसांसाठी कार्यरत होते. समजा, एखादा पॉलिसी घेतल्यानंतर एक महिन्याने प्रवासास निघाला तर त्याची एक महिन्याची पॉलिसी फुकट गेली.
व्यवसायाच्या निमित्ताने जे वरचेवर प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही पॉलिसी चांगली आहे. ट्रॅव्हल विमा खरेदी करताना एक लक्षात ठेवावे की, देशादेशाप्रमाणे नियम व संरक्षण वेगवेगळे असते. या पॉलिसीत ठिकाण, दिवस हे मुद्दे महत्त्वाचे असतात. रोखरक्कम, मौल्यवान वस्तू, वैद्यकीय खर्च ट्रिप रद्द होणे याबाबतची कमाल संरक्षणाची रक्कम व पॉलिसीत असलेले ‘एक्सक्लुजन’ याची माहिती करून घ्यावी. फक्त विमान प्रवासापुरती नुसती पॉलिसीही मिळते. हीचा कालावधी/हीचे संरक्षण विमान उडाल्यापासून विमान जमिनीवर उतरेपर्यंत मर्यादित असते. यापेक्षा ट्रॅव्हल विमा उतरविण्यास जास्त फायदे मिळतात.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.