मुंबई: किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या 'रे' आणि जेलीफिशचा त्रास दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर आलेल्या भाविकांना, तसेच जीवरक्षकांना झाल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रात, गुडघाभर पाण्याच्या जागी मोठ्या प्रमाणात स्टिंग रे आणि जेली फिश यांचे दंश लोकांना झाले. परंतु, भरती ओहटीची तीव्रता लक्षात घेता, हा त्रास दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळीच जास्त जाणवला.
पावसाळ्याच्या दिवसात किनाऱ्यावर 'रे' आणि जेलीफिश वाहून येण्याचे प्रमाण वाढते. गणेशोत्सवाच्या आधी जाळी लावून या माशांचे प्रमाण किती आहे, कोणत्या भागात हे मासे जास्त दिसत आहेत याचा अंदाज स्थानिक कोळी आणि जीवरक्षकांच्या मदतीने घेतला जातो. मात्र, हे सर्वेक्षणही यंदा झाले नसल्याचे, स्थानिक कोळी बांधवांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोणत्या भागामध्ये जाणे टाळावे याबद्दल लोकांनाही माहिती देता आली नाही, अशी काही जणांनी तक्रार केली. मात्र पाच दिवसाच्या विसर्जनावेळी याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.
गुरुवारी दि. १ सप्टेंबर रोजी दुपारपासून विसर्जनाला सुरुवात झाली. संध्याकाळच्या सुमारास काही भाविकांना आणि जीवरक्षकांनाही समुद्री जीवांनी दंश केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भाविकांना पाण्यात जाऊ नये, असे सांगण्यात आले. गिरगावच्या किनाऱ्यावर दोन ठिकाणी माशांबद्दल माहिती देणारे फलक आहेत, मात्र अंधारामध्ये याकडे लक्ष जाणे कठीण होते. अशीही तक्रार करण्यात येत आहे.
अमावस्ये नंतर पाच दिवस भरती ओहटीची तीव्रता जास्त असते, या मुळे अनेक प्राणी किनारी, किंवा किनाऱ्या लागत येतात. अशावेळी भाविकांना समुद्रात जाऊ नये, यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.असे मरीन लाईफ ऑफ मुंबईच्या प्रदीप पाताडे यांनी सांगितले. महापालिकेने देखील विसर्जनासाठी मूर्ती पालिकेच्या कक्षाकडे सोपवाव्यात असे आवाहन केले आहे.