मुंबई : भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत साकारण्यात येत आहे. सध्या या निसर्ग पर्यटन केंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आठ हेक्टरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये बोर्डवॉक, कयाकिंग, नेचर ट्रेल्स यासह इतर आकर्षणांचा समावेश असेल. यात निसर्ग व्याख्या केंद्र, पायवाट, पक्षी वेधशाळा आणि मोबाईल ॲप-आधारित माहिती प्रणालीचा विकास करण्यात येत आहे.
पूर्वी सात बेटांचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईला कांदळवनांची झालर आहे. या निसर्गसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; तसेच त्याची माहिती सामन्य माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी कांदळवन कक्षाने ‘पर्यावरण पर्यटन प्रकल्प’ हाती घेतला आहे. त्याचबरोबर कांदळवन संवर्धन केंद्र आणि कांदळवन उद्यान उभे करण्यात येत आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्च करून, तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्च करून कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे.
एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची निर्मिती होणार आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार करण्यात आली आहे. उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनाचे मानवाला असणारे फायदे समजणार आहेत. यासह कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते याची माहिती मिळणार आहे. कांदळवन उद्यानाची माहिती देणारे एक अॅप तयार करण्यात येत आहे. थायलंड, अबूधाब, सिंगापूर, या देशात असलेल्या कांदळवनातील उन्नत मार्गासारखा उन्नत मार्ग गोराईत तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर असेल. तसेच या मार्गाच्या जागोजागी विश्रांतीसाठी सुविधा आणि माहितीकेंद्र उभारण्यात येणार आहेत. या उन्नत मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.