पाकिस्तानातील हिंदू मंदिरांच्या अखेरच्या घटका...

Total Views |

पाकिस्तान
 
 
 
कट्टर जिहादी मानसिकतेच्या पगड्याखाली असलेल्या पाकिस्तानात हिंदू धार्मिकस्थळांची दुर्दशा होणे म्हणा अगदी स्वाभाविकच. आज 75 वर्षांनंतरही हिंदू बांधवांसह हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे पाकिस्तानातील सत्र काही थांबलेले नाही.
 
 
पाकिस्तान हा तसा प्रारंभीपासूनच अल्पसंख्याकांसाठी एक धोकादायक देश ठरला आहे. विशेषत: जनरल झिया-उल-हक यांच्या कारकिर्दीपासून अल्पसंख्याक समुदायांवर अत्याचार हे तर पाकिस्तानचे एक शासन-समर्थित धोरणच होते. त्यामुळे या देशात अल्पसंख्याक समुदायांना त्यांचा धर्म पाळणे, उपासना-आचरण आणि उपासना पद्धतींचे पालन करणे असे सर्व काही एकंदरच अत्यंत कठीण झाले. यामुळे एकीकडे पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समुदायांना त्रास सहन करावा लागत असताना, दुसरीकडे शिया, अहमदिया आणि हजारा यांसारख्या इस्लाम मानणार्‍या समुदायांच्या समस्यांमध्येही प्रचंड वाढ झाली होती. त्यापैकीच एक गहन समस्या म्हणजे, गेल्या 75 वर्षांत पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदिरांची झालेली दुर्दशा!
 
 
हिंदूंची पवित्र स्थळे असलेल्या मंदिरांचा जिहाद्यांकडून केला गेलेला विध्वंस आणि झालेली दुर्दशा हे पाकिस्तानचे कटू सत्य. फाळणीपूर्व काळात सध्याच्या पाकिस्तानी प्रदेशात हिंदू बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास होते. पण, धर्माच्या आधारावर झालेल्या विभाजनानंतर आपला जीव मुठीत घेऊन लाखो हिंदू बांधवांनी भारताचाच मार्ग स्वीकारला. त्यांना आपल्या जमीनजुमल्यावर पाणी सोडून जीवाची पर्वा न करता सुरक्षित भारताकडे वळावे लागले. पण, काही कारणास्तव जे हिंदू बांधव नाईलाजाने का होईना पाकिस्तानातच राहिले, त्यांचे जीवन तिथे नरकमय झाले. त्यामुळे अशा कट्टर जिहादी मानसिकतेच्या पगड्याखाली असलेल्या पाकिस्तानात हिंदू धार्मिकस्थळांची अशी दुर्दशा होणे म्हणा अगदी स्वाभाविकच. आज 75 वर्षांनंतरही हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे सत्र काही थांबलेले नाही.
 
 
पाकिस्तानमध्ये हिंदू बांधवांची अनेक महत्त्वाची मंदिरे आहेत. यापैकी काही प्रमुख मानली जातात. बलुचिस्तानमधील श्री हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानमधील सर्वात मोठे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तसेच श्री रामदेव पीर मंदिर, जेथे वार्षिक रामदेवपीर मेळा हा पाकिस्तानमधील दुसरा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. उमरकोट येथील शिव मंदिर हे त्याच्या वार्षिक शिवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, तर चुरियो जबल दुर्गा माता मंदिर हेसुद्धा शिवरात्रीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध असून येथे अंदाजे दोन लाख यात्रेकरू हजेरी लावतात. खैबर पख्तुनख्वामधील टेरी येथील श्री परमहंसजी महाराज मंदिर आणि समाधी आणि थाना बुल्ला खाँ येथील गुरु बलपुरी आश्रम ही पाकिस्तानातील काही प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. याशिवाय अनेक महत्त्वाची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रेही पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जम्मू-काश्मीर प्रदेशात आहेत. ज्यात बरनाळा, भीमबेर येथील शिव मंदिर, खुईरट्टा, कोटली येथील बाणगंगा मंदिर, बाबा बालाजी मंदिर, रट्टा, ददयाल, मीरपूर रघुनाथ, मंगला धरण तलाव, मीरपूर येथील शिवला मंदिर, मुझफ्फराबादमधील सीता राम मंदिर आणि शारदा, नीलम जिल्ह्यातील शारदा पीठ ही काही महत्त्वाची मंदिरे व तीर्थस्थळे आहेत.
 
 
 

pakistan 
 
 
 
पाकिस्तानातील मंदिरे आणि गुरुद्वारांची दुर्दशा एका आकडेवारीवरून अधिक चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येईल. 1941च्या जनगणनेनुसार, लाहोरमध्ये सुमारे 40 टक्के हिंदू आणि शीख होते आणि या शहरात अनेक मोठी मंदिरे आणि गुरुद्वाराही अभिमानाने उभे होते. आता केवळ एका शहरापुरते न बोलता, संपूर्ण पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, 1971 मध्ये बांगलादेश म्हणून नकाशावर आलेल्या भागासह संपूर्ण पाकिस्तानात हीच परिस्थिती होती. मात्र, आज पाकिस्तानमध्ये केवळ 13 हिंदू मंदिरे आहेत, ज्यांचे व्यवस्थापन ‘इवैक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डा’कडे (ईटीपीबी) आहे. तसेच ही संस्था पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक संस्था आणि त्यांच्या उत्सवांचेही व्यवस्थापन करते.
 
 
पाकिस्तानातील मंदिरांच्या दुर्दशेबाबत तेथील सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीच्या अहवालाने बराच प्रकाश टाकला होता. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे की, फाळणीनंतर स्थापनकेलेली ‘ईटीपीबी’ ही संस्था हिंदू मंदिरांच्या देखभालीसाठी जबाबदार आहे. पण, आता हिंदू बांधवांची संख्या कमी झाली आहे आणि जे हिंदू शिल्लक आहेत, ते या मंदिरांची देखभाल-दुरुस्ती करु शकत नाहीत, असा दावा ‘ईटीपीबी’तर्फे केला गेला. म्हणूनच हे काम करण्यात ‘ईटीपीबी’ ही संस्था सपशेल अपयशी ठरल्याचे ताशेरे खुद्द पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयानेच ओढले आहेत.
 
 
उल्लेखनीय म्हणजे, एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने, गेल्या वर्षी दि. 5 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात, ‘ईटीपीबी’ला त्यांच्या अधिकारक्षेत्रातील पाकिस्तानमधील सर्व मंदिरे, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ‘ईटीपीबी’ने न्यायालयात दिलेल्या उत्तरानुसार, त्यांना व्यवस्थापनासाठी वर्ग केलेल्या 365 पैकी फक्त 13 मंदिरांचेच ही संस्था व्यवस्थापन करते आणि 65 मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू कमांडकडे आहे. पण, यापुढची परिस्थिती मात्र अधिक बिकट. या मंडळानुसार उर्वरित 287 जागा भूमाफियांच्या ताब्यात गेल्या आहेत. तथापि, ही निष्क्रियता लपविण्यासाठी, ‘ईटीपीबी’ अत्यंत निर्लज्ज युक्तिवाद करताना दिसते.
 
 
जसे की, त्या त्या भागातील हिंदू आणि शीख नागरिकांच्या कमतरतेमुळेच अकार्यक्षम मंदिरे आणि गुरुद्वारांची स्थिती अत्यंत बिकट आहे, असे ‘ईटीपीबी’चे म्हणणे. त्यामुळे या अहवालानंतर ‘ईटीपीबी’ला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. कारण, ‘ईटीपीबी’वर आरोप करण्यात आला आहे की, या यंत्रणेला केवळ स्थलांतरित समुदायाच्या मौल्यवान मालमत्ता हस्तगत करण्यातच अधिक स्वारस्य आहे. यासोबतच खैबर पख्तुनख्वामधील कराक जिल्ह्यातील टेरी गावातील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्यानावाखाली ‘ईटीपीबी’ने 38 दशलक्ष रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हे मंदिर कट्टरपंथी जमियत-उलेमा-ई-इस्लाम पार्टी (फजल-उर रहमान गट)च्या सदस्यांनी जाळले होते, हे इथे उल्लेखनीय. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही ‘ईटीपीबी’ने अद्याप रिक्त मालमत्तांचे ‘जियो-टॅगिंग’ केलेले नाही.
 
 
फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के होती. पण, 2017च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमधील 96.28 टक्के लोक आता मुस्लीम धर्मीय असून फक्त 3.72 टक्के अल्पसंख्याक किंवा गैरमुस्लीम या देशात उरले आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, पाकिस्तानात लष्कराच्या वर्चस्वाबरोबरच इस्लामिक कट्टरतावादाचा जोरही वाढला आहे आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे अल्पसंख्याकांवर सातत्याने होणारे अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या घटनादेखील झपाट्याने वाढलेल्या दिसतात. 1951च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानात 12.9 टक्के हिंदू धर्मीय वास्तव्यास होते. पण, आता या देशात फक्त 1.6 टक्के हिंदू उरले आहेत. अल्पसंख्याकांची सतत घटणारी लोकसंख्या पाकिस्तानातील त्यांच्या परिस्थितीचे भयावह चित्रच मांडते. कट्टरतावादी पाकिस्तान एकीकडे धार्मिक उन्मादापोटी हिंदूंची स्थळे उद्ध्वस्त करत आहे आणि प्राचीन ऐतिहासिक वारसा नष्ट करत आहे. पाकिस्तानातील धर्मांधांती ही कृत्ये बघता, ती तालिबानने बामियानमध्ये केलेल्या मूर्ख कृत्यांपेक्षाही भयंकर म्हणावी लागतील.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

संतोष कुमार वर्मा

संतोष कुमार वर्मा हे पीएचडी करत असून सध्या पाकिस्तान मीडिया स्कॅन या मासिकाचे सह संपादक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय विषयांवर विविध दैनिकातून लिखाण करत असतात.