लिसेस्टर हिंसाचार : हिंदू समाजाविरुद्धची योजनाबद्ध दहशतवादी मोहीम!

    27-Sep-2022   
Total Views |
लिसेस्टरहिंसाचार
 
 
 
लिसेस्टर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी ज्या १८ जणांना अटक केली त्यातील तिघे हॉन्स्लो, लुटोन किंवा सलिहल येथील असल्याचे आणि तिघे बर्मिंगहॅम येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लिसेस्टरमधील हिंदूविरोधी संघर्षास खलिस्तानवादी आणि इस्लामवाद्यांच्या मागे उभ्या राहणार्या शीख फेडरेशन (युके) यांनी पाठिंबा दिला होता. या सर्व घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण, या हिंसाचारामध्ये हिंदूंचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
 
  
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एशिया कप क्रिकेट सामन्याचे निमित्त झाले असले तरी इंग्लंडमधील लिसेस्टर शहरामध्ये हिंदू समाजास लक्ष्य करण्याचा योजनाबद्ध आणि पद्धतशीर प्रयत्न जहाल इस्लामधर्मीयांनी केल्याचे दिसून येते. लिसेस्टर या शहरामध्ये हिंदू समाज मोठ्या संख्येने राहतो. हिंदू समाजाची मोठी लोकसंख्या असलेले हे युरोपमधील दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. दिवाळीसह विविध हिंदू सणवार या शहरातील हिंदू समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतात.
 
 
 
या शहरात राहणार्या हिंदू समाजास अस्थिर करण्यासाठी आणि हिंदू समाजाचा कणा मोडण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने लिसेस्टरमधील हिंदूंवर हल्ले करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील ‘एशिया कप क्रिकेट सामन्या’चे या हिंसाचारासाठी निमित्त झाल्याचे सांगण्यात येत असले तरी लिसेस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लीम समाजात गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण होते, असे लिटलवूड नावाच्या एका महिला रिसर्च फेलोने ‘जीबी’ न्यूजशी बोलताना स्पष्ट केले. या दोन्ही समाजातील वादाचा मुद्दा हा राजकारणापेक्षा प्रादेशिक अधिक आहे.
 
 
 
क्रिकेट सामन्याचे निमित्त मिळाले आणि विविध शहरांतील मुस्लीम लिसेस्टरमध्ये मोठ्या संख्येने जमा झाले. हिंदू समाजाचा द्वेष करणारी भाषणे त्या समाजातील नेत्यांकडून करण्यात येत होती. एवढ्यावरच न थांबता मुस्लीम समाजाने हिंदूंवर हल्ले केले. त्यांच्या खासगी मालमत्तेवर हल्ले करून नुकसान केले. त्यानंतरच्या काळात हिंदू समाजाविरुद्ध करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे आगीत तेल ओतले गेले. त्यामुळे भडकलेल्या जहाल गटांनी हिंदूंच्या घरांवर, मालमत्तेवर, वाहनांवर हल्ले करून अतोनात नुकसान केले.
 
 
 
हे सर्व एवढ्यावरच मिटले नाही. ८ सप्टेंबर या दिवशी आगीत आणखी तेल ओतले गेले. शेजारीपाजारी राहणार्या इसलामधर्मीयांनी आणि पाकिस्तान समर्थक एका जहालाने ट्विटर अकाऊंटवरून, एका मुस्लीम मुलीचे स्थानिक हिंदू तरुणाने अपहरण केल्याची अफवा पसरविली. या प्रकारची लिसेस्टर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता असे काही घडलेच नसल्याचे त्यांच्याकडून १४ सप्टेंबर रोजी स्पष्ट करण्यात आले.
 
 
 
जहाल इस्लामधर्मीय मजीद फ्रीमन याने ही चुकीची माहिती पसरविल्याचे निष्पन्न झाले. हा वादग्रस्त इस्लामी कट्टर कार्यकर्ता अन्य धर्मीयांविरुद्ध खोट्यानाट्या बातम्या पसरविण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. लिसेस्टरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच या मजीद फ्रीमनने मुस्लीम मुलीचे अपहरण झाल्याची खोटी बातमी पसरविली. त्याने नंतर ही बातमी खोटी असल्याचे कबूल केले. पण, तोपर्यंत जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले होते. त्याचे ट्विटर खाते २४ तासांसाठी बंद करण्यात आले होते. पण, तरीही तो त्याचा वापर करीत होता. ५ सप्टेंबर रोजी या मजिदने हिंदू समाजास उघड धमकी दिली. तसेच भारत, पाकिस्तान, बांगलादेश, सोमालिया आणि अन्य देशांमधील मुस्लिमांनी हिंदूंच्याविरुद्ध संघटित व्हावे, असे आवाहन त्याने केले.
 
 
 
हे सर्व घडत असताना ब्रिटनमधील माध्यमांनी या जहाल, दंगेखोर मुस्लिमांची बाजू घेतल्याचे दिसून आले. मुस्लिमांना संपविण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी हल्ला केल्याचे कुभांड या माध्यमांकडून रचण्यात आले. हिंदू समाजावर योजनाबद्ध हल्ले करण्यात आले तरी आणि याबाबतची वस्तुस्थिती समोर आली असतानाही या हल्ल्यांचा निषेध करावा, असे माध्यमांना वाटले नाही. उलट सनी हुंदलसारख्या पत्रकाराने लिसेस्टरमध्ये जहाल हिंदू गटाने हिंसाचार माजविला, असा आरोप केला.
हिंदू समाजावर झालेल्या या हल्ल्यांच्या निषेधार्थ दि. १७ सप्टेंबर रोजी हिंदू समाजाने लिसेस्टरमध्ये शांततापूर्ण मोर्चा काढला. त्यामधून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ असा संदेश देण्यात येत होता.
 
 
 
 
या शांततापूर्ण मोर्चावर अचानक शेकडो जहाल इस्लमवाद्यांनी हल्ला केला. या मोर्च्यावर काचेच्या बाटल्या, दगड फेकण्यात आले. या मोर्च्यावर हल्ले करणारे लिसेस्टरबाहेरचे आणि ब्रिटनच्या अन्य भागातून आलेले होते, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते. त्याच दिवशी इस्लामधर्मीयांनी लिसेस्टरमधीलएका हिंदू मंदिरास घेराव घातला. मंदिरावरील भगवा ध्वज काढून त्याची विटंबना केली. लिसेस्टर पोलिसांच्या डोळ्यादेखत या जहाल मुस्लिमांचा हा नंगानाच सुरू होता. या मंदिरात जे हिंदू होते त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्नही या धर्मांधांनी केला.
 
 
 
 
या घटनेप्रकरणी लिसेस्टर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी ज्या १८ जणांना अटक केली त्यातील तिघे हॉन्स्लो, लुटोन किंवा सलिहल येथील असल्याचे आणि तिघे बर्मिंगहॅम येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लिसेस्टरमधील हिंदूविरोधी संघर्षास खलिस्तानवादी आणि इस्लामवाद्यांच्या मागे उभ्या राहणार्या शीख फेडरेशन (युके) यांनी पाठिंबा दिला होता. या सर्व घटनेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण, या हिंसाचारामध्ये हिंदूंचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
 
 
 
दरम्यान, लिसेस्टर या शहरामध्ये हिंदू समाजावर हल्ले होण्याचे जे प्रकार घडले, हिंदूंच्याविरुद्ध जो हिंसाचार झाला त्या प्रकाराविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिसेस्टरमध्ये हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लिसेस्टरमधील हिंसाचारास हिंदू समाज जबाबदार असल्याचा अपप्रचार केला जात आहे, याकडेही ब्रिटिश पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक हिंदूंच्यावर हल्ले करण्यात आले.
 
 
 
 
त्यांच्या घरांचे, मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, याकडेही लक्ष वेधण्यात आले. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांनी लिसेस्टरमधील भारतीय समुदायावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. या हल्ल्यांना जे जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही उच्चायुक्तांनी केली आहे.
 
 
 
 
विदेशात शांततापूर्णरीत्या राहत असलेल्या हिंदू समाजास कट्टर जहाल इस्लामधर्मीय कशाप्रकारे लक्ष्य करीत आहेत, ते लिसेस्टरमध्येजो भयानक हिंसाचार झाला त्यावरून दिसून येत आहे. पण, लिसेस्टरमधील हिंदू समाज हा एकटा नसून त्यांच्यामागे समस्त हिंदू समाजाची ताकद उभी आहे हे कट्टरपंथी धर्मांधांच्या लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
भ्रष्टाचाराबद्दल चर्चची बघ्याची भूमिका!
 
नागालँडमधील प्रशासनामध्ये ख्रिश्चन समाजाची मक्तेदारी असतानाही ख्रिस्ती समाजाची मूल्ये पायदळी तुडवून त्या राज्यात भ्रष्टाचाराने जनजीवन व्यापले असल्याचे दिसून येते. नागालँडमधील ९० टक्के सरकारी अधिकारी आणि मंत्री हे ख्रिश्चन समाजाचे आहेत, अशी माहिती ‘नागालँड बाप्टिस्ट चर्च कौन्सिल’चे सरचिटणीस रेव्हरंड डॉ. झेलहॉऊ कीहो यांनी दिली. पण, चर्चच्या बाहेर पडले की, येथील लोकांना ख्रिश्चन मूल्यांचा विसर पडतो ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नमूद करावे वाटते, असेही या रेव्हरंडने म्हटले आहे.
 
 
 
 
चर्चमधील आध्यात्मिकता आणि चर्चच्या बाहेरील आध्यात्मिकता यामध्ये विसंगती, विरोधाभास असल्याचे दिसून येते, असेही या रेव्हरंडने म्हटले आहे. भ्रष्टाचारमुक्त वातावरणामध्ये नागालँडमध्ये निवडणुका व्हाव्यात, यासाठी चर्चने चळवळही हाती घेतली होती. पण, त्यास यश आले नसल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
नागालँडमधील राजकीय पक्ष किंवा राजकीय आघाड्या यापैकी कोण सर्वाधिक भ्रष्टाचारी आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र चर्चच्या या नेत्याने टाळले. नागालँडमध्ये निवडणुकीतील भ्रष्टाचार हा १०-१५ वर्षांपासून सुरू झालेला नाही, तर तो 70च्या दशकाच्या मध्यास सुरू झाला आणि ८०च्या दशकात तो फोफावला. 21व्या शतकात तर भ्रष्टाचाराने विक्राळ रूप धारण केले. भ्रष्टाचार हा नागालँडच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. नागा जीवनात भ्रष्टाचार हा बाहेरून आला, असे काही सामाजिक अभ्यासकांचे म्हणणे आहे. नागा घुसखोरीचा कणा मोडून काढण्यासाठी सरकारने ‘वाईन’ आणि ‘वेल्थ’चा अप्रत्यक्ष वापर केला, असे सांगितले जाते.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.