मुंबई : ठाकरे पितापुत्राच्या हातून वरळी निसटते का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गट ठाकरेंच्या विरोधात रान पेटवताना दिसत आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे मोहरे आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश मिळत असतानाच त्यांच्याकडून मोठा डाव टाकला जात आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी मंत्री असलेले वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात आस्मान दाखवण्याची तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारी वरळी ठाकरे पितापुत्राच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निशाण्यावर आदित्य ठाकरेच !
एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अंतर्गत दुफळी आणि नाराज आमदारांची भावना लक्षात घेत नेतृत्वाच्या विरोधात बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार ठाकरेंच्या नेतृत्वावर तोफ डागून शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात यशस्वी झाले हा इतिहास आहे. मात्र, शिंदे गटाचा निशाणा केवळ उद्धव ठाकरे नसून त्यांचे विशेष लक्ष युवासेनाप्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही आहे हे त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट झालेले आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदावर राहिलेल्या आदित्य यांनी पक्षात झालेल्या उलथापालथीनंतर राज्यात दौरे सुरु केले असून पक्षसंघटना बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात फिरणाऱ्या आदित्य यांच्या वरळी मतदारसंघावर शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीत वरळीत शिंदे गटाकडून लावण्यात आलेले बॅनर्स आणि त्यातून वरळीकरांना घालण्यात आलेली साद येत्या काळातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत समजले जात आहेत.
एकीकडे पक्षांतर्गत बंड, तीन आमदार असूनही शिल्लक राहिलेल्या संघटनेतील समन्वयाचा अभाव, सत्तेमुळे मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष आणि अडगळीस टाकलेल्या वरळीकरांचा ओढवून घेतलेला रोष या कारणांमुळे ठाकरे पिता पुत्रांचा हक्काचा मतदारसंघ मानली जाणारी वरळी त्यांच्या हातून निसटतेय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपचे वरळीवर खास लक्ष
२०१९ सत्तांतरापासून मुंबई भाजपकडून वरळीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि वरळीत मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींवर करण्यात आलेला खर्च याकडे भाजपने लक्ष वेधत वरळीकरांच्या मनाला हात घातला आहे. एकनाथ शिंदे देखील बंडानंतर पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा त्यांनी वरळीत थांबून स्थानिकांच्या स्वागताचा स्वीकार केला होता. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट वरळीवर विशेष लक्ष ठेवून असणार हे निर्विवाद आहे.
स्थानिकांशी तुटलेला संवाद आणि निर्माण झालेला रोष
स्थानिक आमदार असूनही आदित्य ठाकरेंचा वरळीतील मतदारांशी आवश्यक तो संवाद होत नव्हता, अशी तक्रार वरळीकर सातत्याने करत होते. मतदारसंघातील कुठलाही प्रश्न जर लोकप्रतिनिधी म्हणून ठाकरेंकडे मांडायची वेळ आली तर ती भेट कधीही होत नव्हती असा त्यांचा आरोप आहे. मागील वर्षी मुंबईत आलेल्या वादळात बीडीडी चाळीतील रहिवाशी असलेल्या महिलेचा झाड अंगावर पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्या महिलेच्या कुटुंबीयांकडे अनेक दिवस ना महापालिका प्रशासन पोहोचले ना शिवसेना आणि स्थानिक आमदारांकडून या घटनेची दखल घेतली गेली. अखेरीस युवासेनेकडून त्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांशी आवश्यक असलेला संवाद ठेवण्यात आदित्य अपयशी ठरले आणि त्यातून त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाल्याची स्थिती आज दिसून येत आहे.
प्रकल्पबाधितांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वरळीत अनेक प्रकल्प सुरु करण्यात आलेले आहेत. त्यात कोस्टल रोड, बीडीडी चाळ पुनर्विकासासह इतर प्रकल्पांचा समावेश होतो. मात्र, कोस्टल रोड असोत किंवा बीडीडी चाळ प्रकल्प त्यातील प्रकल्पबाधितांचे प्रश्न आणि प्रकल्प पूर्तीच्या दरम्यान त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या याकडे स्थानिक आमदारांनी साफ दुर्र्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त सातत्याने करत आलेले आहेत.
आमदार तीन पण संघटना विस्कळीत
आदित्य ठाकरे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर तिथूनच आणखी दोन नेत्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले होते. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर आणि आदित्य ठाकरेंसाठी आमदारकीवर पाणी सोडणाऱ्या सुनील शिंदेंचाही समावेश होतो. मात्र, असे असूनही वरळीत शिवसेना एकसंघ दिसत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. वर्षानुवर्षे जांबोरी मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम घेणाऱ्या शिवसेनेच्या हातून यावर्षी भाजपने जांबोरी मैदानासह दहीहंडी देखील हिसकावून घेतली होती. युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याचे समोर आले होते. वरळीत अनेक प्रकल्प येऊनही त्यात युवासैनिकांना सहभागी करून न घेतल्याने त्यांच्यातही तीव्र नाराजी आहेच. त्यामुळे ठाकरे - शिंदे आणि अहिर असे तीन आमदार असूनही ठाकरे गट विस्कळीत असल्याचे चित्र वरळीत निर्माण झाले आहे.
वरळीत शिंदे गटाची पुन्हा बॅनरबाजी
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या नंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे लक्ष वरळीवर गेले आहे. सोमवार, दि. २६ सप्टेंबर रोजी शिंदे गटातर्फे वरळीच्या अनेक भागांमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले ;आहेत. वरळीच्या विविध देवी उत्सव मंडळांच्या प्रवेश द्वारालाच हे बॅनर लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या बॅनरपेक्षा शिंदे गटाच्या बॅनरची संख्या अधिक असल्याने या प्रकारची वरळीसह मुंबईत चर्चा सुरु झाली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.