मुंबई : बोरिवलीतील गोराई गावात मागील चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच होत नसल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. तसेच, वारंवार यासंबंधी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याचेही येथील स्थनिकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मागील चार महिन्यांपासून आम्हाला एक थेंब पिण्याचे पाणी मिळत नाही. आमच्या येथे जलवाहिनी जुनी झाली होती. त्यासाठी काम करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु, फक्त वाहिनी टाकून ठेवली आहे, पाणीपुरवठ्यासाठी लागणारी जोडणी मात्र केली नाही. याबाबत अनेकदा पालिकेच्या अधिकार्यांना तक्रार करूनही पालिका काहीही ठोस कारवाई करत नाही. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधीही येथे लक्ष देत नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले.
पालिकेची कारवाई नावापुरतीच!
“गोराई गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा मालाड-मनोरीवरून होत असून तेथे एका हॉटेलने बेकायदेशीररित्या पाणी मध्येच अडवून हॉटेलला फिरवले आहे. यासंबंधी त्या हॉटेलच्या नावासकट तक्रार मुंबई महापालिकेला केली होती. परंतु, तेवढ्यापुरती पालिकेने कारवाई केल्याचे दाखवत नंतर पुन्हा त्या हॉटेल मालकाने स्वतःकडे पाणी फिरवलेले आहे. पालिकेचा तेथील उप अभियंता कोरे याच्या नावाची मी तक्रार केली. तसेच, त्याला 15 दिवस आधीच पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे आणि आता तो तुरुंगात आहे,” अशी माहिती येथील माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली. मागील दहा वर्षांपासून येथील पाण्यासंबंधी सातत्याने तक्रार करत असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.