वेणास्वामी !! समर्थ शिष्य वेणास्वामी इतकीच आपल्याला त्यांची ओळख आहे. पण सोळाव्या शतकात बालविधवांच्या फार मोठ्या समस्या होत्या. विधवांचे जीवन भयानक होते. त्या काळात समर्थ रामदासस्वामींनी विधवा स्त्रियांना संप्रदायात प्रवेश दिला त्यातील काहींना मठपती बनवले त्यातील मिरज मठाच्या मठपती म्हणून वेणास्वामी यांची निवड समर्थांनी केली. हे त्या काळातील क्रांतिकार्य समर्थांनी घडवले. अत्यंत कणखर मनाच्या असलेल्या वेणास्वामी समर्थ संप्रदायाच्या आधारवेली वर स्थिरावल्या आणि संप्रदाय कार्य व्यापक उंचीवर नेले. वेणा ते वेणास्वामी ही आधारवेल चिंतनीय आहे.
वेणा यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत देशपांडे यांच्या त्या कन्या होत्या. गोपजीपंत देशपांडे हे कोल्हापूरमधील मान्यवर गृहस्थ होते. वेणाबाईंच्या घरात रामोपासना परंपरेने चालत आली होती. त्यामुळे राम उपासनेचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून चालत आले होते. रामकथा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय त्यांचा होता. वेणाच्या सद्गुणांचे संवर्धन व्हावे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उजळावे त्यांच्या प्रज्ञेचा प्रकाश सर्वत्र पसरावा असे आईवडिलांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी जवळच्या पत्की गुरुजींच्या द्वारे स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था केली. कालांतराने मिरजेच्या देशपांडे घराण्यातीलच दत्तात्रेय नावाच्या मुलाशी वेणाबाईंचे लग्न झाले. विवाहानंतर वेणाबाई मिरजेला गेल्या आणि काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी वेणाबाईंना वैधव्य आले. दिवसामागून दिवस जात होते. वीस वर्षांच्या वेणाबाई सासरच्या अंगणात तुळशीवृंदावनाजवळ बसून संत एकनाथांचे भागवत वाचीत असत. भागवत आणि भावार्थ रामायण याने वैधव्याची जखम भरून निघत होती.
अचानक एके दिवशी ' जय जय रघुवीर समर्थ ' असे म्हणत समर्थ भर दुपारी बारा वाजता भिक्षेसाठी आले. अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ वेणाबाई भागवत वाचीत बसल्या होत्या. एवढे बलदंड आणि तेजस्वी पुरुष त्यांनी पहिल्यांदाच बघितले होते. भिक्षा देऊन त्यांनी सतत समर्थांचा ध्यास घेतला आणि पुढे राधिकाबाई आणि गोपजीपंतासह वेणाबाईंनी समर्थ रामदास स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. वेणाबाईंना समर्थांनी कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. त्याकाळी समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागले आणि समर्थही त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई,अक्काबाई,अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात होते आणि तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात असत. सासू - सासरे संत एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. त्यामुळे सासर आणि माहेर घरातून कोणताच विरोध नव्हता.
समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणाबाईंवर सोपविण्यात आली. नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो. वेणाबाई समर्थांच्या आज्ञेने चाफळ मठात आल्या. समर्थांनी त्यांना अक्कास्वामींच्या स्वाधीन केलं. संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू या भाषांवर वेणाबाईंनी प्रभुत्व मिळवलं. ग्रंथवाचन,ग्रंथलेखन, काव्यरचना आणि गुरुसेवा हा त्यांचा दिनक्रम बनला. समर्थांनी त्यांची योग्यता ओळखून पुढे स्वतंत्र मठाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवला आणि वेणाबाई त्यांच्या सासरच्या गावी अर्थात मिरजेला 'वेणास्वामी' बनून 'मिरज- मठाधिपती' झाल्या. या काळात मंगल रामायण,छंदो रामायण,संकेत रामायण,लव कुश रामायण,शब्द रामायण,भाषा रामायण अशी अनेक रामायणे, सीतास्वयंवरसारखे ग्रंथ आणि विपुल अभंग रचना अशी मोठी काव्यरचना वेणास्वामींनी केली. धर्मजागृतीचे कार्य करणाऱ्या त्या एक श्रेष्ठ समर्थ सांप्रदायिक मठपती बनल्या.
खरंतर प्रवृत्ती हेच वेणास्वामींचे सासर होते आणि निवृत्ती हे त्यांचे माहेर होते. हे फक्त तिघांना ठाऊक होते. एक समर्थ, दुजी वेणाबाई अन् त्या दोघांचे जीवनातील अद्भुत नाट्याचे साक्षीदार असलेले रामराय. कालांतराने पूर्वरंग संपला आणि उत्तररंग सुरू झाला.
बंद विमोचन राम । माझा बंद विमोचन राम ।।
सकळही ऋषीमुनी भजती जयासी । एकचि तो सुखधाम ।।
सद्गुरुकृपया ओळखीला जो। कौसल्येचा राम ।।
भावभक्तीच्या सुलभ साधनी । पुरवी सकळही काम ||
शरणही वेणा आत्मारामा । पावली पूर्णविराम।।
बंधनातून सोडवणारा राम केवळ सद्गुरुकृपेने मला दिसला असे भावगर्भ पद वेणास्वामींनी कीर्तनासाठी घेतलं. उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार समर्थ संप्रदायात फक्त वेणास्वामींना होता. सज्जनगडावर रामरायाच्या आणि समर्थांच्या साक्षीने वेणास्वामी उत्तररंगाची सांगता करत होत्या. वेणास्वामींनी कीर्तन सांगता केली आणि त्याच पावलांशी समर्पण करत वेणास्वामी समर्थांच्या चरणी पूर्णविराम पावल्या होत्या.
त्याकाळी माणुसकीचा गळा घोटणाऱ्या, रूढीने माथी मारलेलं वैधव्य आणि त्याने दुर्दैवी जिणं झुगारुन देणाऱ्या एका तेजस्विनीची ही यशोगाथा आहे. जननिंदेचं हलाहल पचवून तमसो मा ज्योतिर्गमय ! मृत्यो मा अमृतं गमय !! असं म्हणत जीवन मुक्तीच्या मार्गावर, आपल्या कडकडीत वैराग्यानं, उत्कट गुरुभक्तीने आणि उदंड प्रयत्नाने समर्थ संप्रदाय आधारवेलीच्या गुरुपीठावर अधिष्ठीत झालेल्या समर्थ शिष्या वेणास्वामींची ही संजीवक जीवन कथा आहे. समर्थ शिष्य वेणास्वामींच्या चरणी नमन.