मुंबई(प्रतिनिधी): बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाॅल्की-टाॅकी' सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या साठी लागणाऱ्या सर्व यंत्रणांची पूर्तता झाली असून, या वर्षी जुलैपासून सर्व वनपालांना 'वाॅल्की-टाॅकी' देण्यात आले. 'वाॅल्की-टाॅकी' साठी लागणारे 'बेस आणि रिपिटर' स्टेशन तैनात करण्यात आले आहेत. या वन्य अधिवासात मोबाईल टावर नसल्यामुळे पूर्वी आपापसातल्या संपर्कासाठी पायपिट करावी लागत असे. या 'वाॅल्की-टाॅकी' उपकरणामुळे विविध रेंज मधील वन पालांना एकमेकांशी समन्वय साधण्यात मदत होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ठाणे जिल्ह्यात आणि (५९.२४ चौ.कि.मी.) मुंबई उपनगर जिल्ह्यात (४४.४४ चौ.कि.मी.) वसलेले आहे. या विभागात तीन प्रादेशिक रेंज आहेत. येऊर रेंज, तुळशी रेंज आणि कृष्णगिरी उपवन रेंज. पूर्वी या तिन्ही रेंजमध्ये आपसात काही संपर्क साधायचा असल्यास वनपालांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे लागत होते. यामुळे अनेक वेळा संपर्कात विलंब होत होता. परंतु, आता 'वाॅल्की-टाॅकी' मिळाल्यामुळे संपर्क साधणे सोप्पे झाले आहे. या यंत्रणेसाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यात आली. आणि जुलै २०२२ पासून ही सेवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली आहे. सध्या, सर्व वनपालांना हँडसेट देण्यात आले आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीवर हा तोडगा प्रभावी ठरणार आहे. या हँडसेटमुळे आम्हाला संपर्क करण्यास मोठी मदत होणार आहे. राष्ट्रीय उद्यानात घडलेल्या घटनांची माहित त्वरित आणि तत्काळ आमच्या पर्यंत पोहोचेल किंवा आम्ही देखील ती वेळ प्रसंगी पोहोचवू शकू असा विश्वास वन क्षेत्रपाल दिनेश देसले यांनी व्यक्त केला.
“ही नवीन वॉकी-टॉकी प्रणाली कर्मचार्यांमध्ये सुधारित संवाद प्रस्थापित करणार आहे. 'वाॅल्की-टाॅकी' समजून घेण्यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तंत्रज्ञानामुळे वन संरक्षणास मदत होणार आहे. हे 'वाॅल्की-टाॅकी' उद्यानाच्या विविध प्रवेशद्वारांवर देखील देण्यात आले आहेत. यामुळे पर्यटकांच्या प्रवेशाचे चांगले नियमन करण्यात देखील मदत होणार आहे. ही प्रणाली आमच्या नियमित गस्त आणि वन अग्नि व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरेल.” - जी. मल्लिकार्जुन, संचालक तथा मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.