हैदराबाद : मुस्लिमांचे आरक्षण वाढवा अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. सुधीर आयोगाच्या सूचनेनुसार तेलंगाणाराज्यातील मागास मुस्लीम कोटा चार टक्क्यांवरून १२ टक्के केला पाहिजे, अशी मागणी ओवेसीं यांनी सरकारकडे केली.
ओवेसी म्हणाले कि, तेलंगणातील मुस्लिमांची लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक स्थितीच्या तुलनेत सध्याचे ४ टक्के आरक्षण अपुरे आहे. आयोगाने यापूर्वी राज्य सरकारला आरक्षण १२% पर्यंत वाढवावे किंवा ते किमान 9% ठेवावे अशी शिफारस केली होती.
"आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आम्ही तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी मुस्लिमांच्या आर्थिक, आरोग्य आणि गरिबीबाबत एक समिती स्थापन केली होती. समितीने सर्व जिल्ह्यांचा दौरा करून सविस्तर अहवाल सादर केला. मुस्लिमांना ९ ते १२ टक्के आरक्षण मिळायला हवे, असे या अहवालात म्हटले आहे.
तेलंगणा सरकारने नंतर मुस्लिमांसाठी १२ टक्के आरक्षण असावे, असे विधेयक मंजूर केले. ते विधेयक तेलंगणात मंजूर करून केंद्रसरकारकडे पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यात पुन्हा वाढ करावी, असे आवाहन आम्ही सरकारला केले. त्यावर राज्य सरकारने निर्णय घ्यावा" अशी माहिती ओवेसी यांच्या वतीने दिली गेली.