कोल्हापूर - शाहूवाडीत ६० हे. वनक्षेत्रावरील खाणकामाला तत्वत: मंजुरी; व्याघ्र भ्रमणमार्गात अडथळा

    24-Sep-2022   
Total Views |
sahaydri



मुंबई (अक्षय मांडवकर) -
पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला लागून असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हेक्टर राखीव वनक्षेत्र बाॅक्ससाईट खाणकामाकरिता वळते करण्यासाठी तत्वत: मान्यता (इन-प्रिन्सिपल) मिळाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील पठार (सडा) पट्ट्यातील हे राखीव वनक्षेत्र खाणकामासाठी वळते करण्यासाठी वन विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. खाणकामाचे हे क्षेत्र पश्चिम घाटाचे (sahyadri) पर्यावरणीय क्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गालगत असून 'विशाळगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'पासून काही किलोमीटर अंतरावर आहे.

शाहूवाडी तालुक्यातील ६० हेक्टर राखीव वनक्षेत्र बाॅक्ससाईट खाणकामाकरिता वळते करण्यासाठी वन विभाग आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भातील परवानगी पत्र दै. 'मुंबई तरुण भारत'ला (महा MTB) मिळाले आहेत. शाहूवाडीमधील घुंगूर, आंबर्डे, परळी आणि सावर्डे बी.के या गावातील पठार पट्ट्यामध्ये खाणकाम सुरू होणार आहे. यासाठी घुंगूरमधील ४.४० हेक्टर, आंबर्डेतील ३ हेक्टर, सावर्डे बी.केमधील १३ हेक्टर आणि घुंगूर-आंबर्डेमधील ३४.६० हेक्टर राखीव वनक्षेत्र वळते करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन कक्षाकडून या खाणकामाकरिता तीन कंपन्यांना २०१९ साली प्रथम टप्प्याची मान्यता मिळाली होती. आता या कंपन्यांना दुसऱ्या टप्प्याची तत्वत: मान्यता मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे खाणकामांना परवानगी देण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या परिसरात वन्यजीवांचा वावर नसल्याची नोंद केली आहे. (हे सर्वेक्षण अहवाल दै. 'मुंबई तरुण भारत'कडे उपलब्ध आहेत). मात्र, राज्य सरकारने घोषित केलेले विशाळगड आणि पन्हाळगड काॅन्झर्वेशन रिझर्व्हचे वनक्षेत्र या परिसरातील वनक्षेत्राशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे या पठार क्षेत्रात गवे, बिबटे आणि खवले मांजरासारख्या 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित असणाऱ्या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. (sahyadri)
 
महत्त्वाचे म्हणजे खाणकामासाठी परवानगी मिळालेले हे क्षेत्र पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला लागूनच आहे. या क्षेत्राला लागून असलेल्या सोनुर्ली गावाचा पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समावेश आहेच. शिवाय 'राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणा'ने नोंदवलेल्या 'चांदोली-राधानगरी-गोवा' या व्याघ्र भ्रमणमार्गतही या गावाचा समावेश आहे. राधानगरी वन्यजीव अभयरण्यापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र भ्रमणमार्ग अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानिक स्वरुपात वाघाचे अस्तित्व नाही. उलटपक्षी राधानगरी वन्यजीव अभयारण्यात एका वाघाचा अधिवास आहे. राधानगरी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा हा व्याघ्र भ्रमणमार्ग या वाघाच्या उत्तरेकडील स्थलांतरासाठी महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत या भ्रमणमार्गाच्या आसपास असलेल्या परिसरामध्ये खाणकाम रेटल्यास त्याचे गंभीर परिणाम भ्रमणमार्गावर होऊ शकतात. तसेच खाणकामासाठी परवानगी मिळालेल्या राखीव वनक्षेत्राचा भूभाग 'विशाळगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ला जोडणारा आहे. पठार म्हणजेच सडे हे वरकरणी निर्जीव वाटत असले तरी पाणी धरुन ठेवण्याबरोबरच प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचे आहेत. (sahyadri)

सडा (पठार) म्हणजे काय ? 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.