२०२० पासून आता २०२२ मध्येही इस्रायलच्या या ‘आयर्न डोम’चा प्रभाव पाहून खुद्द सौदी अरेबियासह इतरही अरब देश इस्रायलच्या ‘अब्राहम करारा’मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. फक्त अजून उघडपणे ते तसं म्हणत नाहीयेत. कारण, आपण ज्यू लोकांशी मैत्री केलेली आपल्या नागरिकांना कितपत आवडेल, याबद्दल ते साशंक आहेत.
नवी मन किंवा मानवी समाजाची वर्तणूक कोणत्या प्रेरणांमधून होते? एक माणूस किंवा अनेक माणसांचा एक समूह किंवा अनेक समूह हे नेमक्या कोणत्या प्रेरणांमुळे आपलं काही एक विशिष्ट ध्येय, उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे वागतात? तत्त्वचिंतकांचा याबाबत कायमच विचार सुरू असतो. तत्वचिंतक, म्हणजे पाश्चिमात्य तत्वचिंतक. मानवी मन हे एकाच वेळेला अनेक प्रेरणांच्या अमलाखाली वर्तणूक करत असतं, हे त्यांना फारसं मान्य नाही.
पाश्चिमात्यांचा इतिहास हा ग्रीक साम्राज्यापासून सुरू होतो. ग्रीसचा राजा अलेक्झांडर हा जग जिंकायला बाहेर पडला. अचाट पराक्रम गाजवून त्याने फारच विशाल असं साम्राज्य निर्माण केलं. त्याचाच कित्ता पुढ्यात ठेवून नंतर रोमन लोकांनी त्याच्याही पेक्षा मोठं साम्राज्य निर्माण केलं. या ग्रीक आणि रोमन साम्राज्यांचा पाश्चिमात्त्यांना फार अभिमान वाटतो. त्याची तात्त्विक मांडणीते अशी करतात की, तत्कालीन माणसांना किंवा समाजांना अधिकार गाजवणं, आपलं श्रेष्ठत्त्व मिरवणं याची फार हौस होती; त्या प्रेरणेतून राज्याराज्यांमधल्या लढाया आणि साम्राज्य निर्मिती झाली.
साधारण १७०० वर्षांपूर्वी ‘अधिकार लालसा’ ही प्रेरणा मागे पडून ‘धर्म’ किंवा ‘उपासना संप्रदाय’ ही प्रेरणा बलवान झाली. इतकी की, आपल्या साम्राज्याचा डळमळता डोलारा सावरण्यासाठी रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण, तरी रोमन साम्राज्य कोसळलंच. मग ख्रिश्चन धर्मप्रमुख पोप हाच एकाच वेळी सम्राट आणि राजगुरू बनला. पोपला शरण जाऊन एकापाठोपाठ एक युरोपीय देशांनी ख्रिश्चानिटीचा स्वीकार केला.
हे एकीकडे घडत असतानाच इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात एका जबरदस्त नेत्याचा उदय झाला. त्याने इस्लाम हा एक नवाच संप्रदाय स्थापन केला. बघता-बघता इस्लामने आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामधला फार मोठा भूभाग व्यापला. पोपच्या ख्रिश्चन संप्रदायाची आणि या नव्या इस्लामी संप्रदायाची धार्मिक वर्चस्वासाठी जोरदार स्पर्धा सुरु झाली.म्हणजेच तत्कालीन मानवी समाजांचं वर्तन हे धार्मिक प्रेरणेतून घडलं, असं पाश्चात्य पंडित म्हणातात.
साधारणं १५व्या शतकापासून युरोप खंडात वैचारिक पुनरूत्थान ‘रेनेसाँ’ सुरू झालं. त्याची दृष्य परिणती म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये वेगवान वाटचाल सुरू झाली. त्यातून दर्यावर्दी सफरी, नव्या सागरी मार्गांचा शोध सुरू झाला. त्यात यश मिळाल्यामुळे व्यापाराला महत्त्व आलं. व्यापार हे क्षेत्र भरभराटत चाललं. यातून १८-१९व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. कारखानदारी हा एक नवाच व्यवसाय भरभराटला. त्यामुळे वस्तूंचं फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झालं. यातून व्यापाराला फारच मोठी चालना मिळाली. साम्राज्यशाही, धर्मसत्ता इत्यादी प्रेरणा मागे पडल्याशा होऊन आर्थिक सत्ता नि महासत्ता निर्माण झाल्या. मानवी वर्तनाची प्रमुख प्रेरणा आर्थिक सामर्थ्य मिळवणं ही ठरली, असं पाश्वात्य पंडितांना वाटतं.
हे सर्व चिंतन खरं आहे, पण एकांगी आहे. ग्रीकांना आणि रोमनांना, राजकीय आणि सैनिकी अधिकार गाजवायचा होताच ; पण म्हणजे त्यांना संपत्ती, धन त्यांची लालसा नव्हती, असं कुठे आहे? पोप मंडळींना जास्तीत जास्त अजाण लेकरांना आकाशातल्या बापाच्या छत्रछायेखाली आणायचं होतंच. पण, त्याचवेळी त्यांना त्या अजाण लेकरांची संपत्ती आणि भूमीपण हवीच होती. म्हणजे ख्रिश्चनांची प्रेरणा, धर्म, अर्थ आणि अधिकारशाही अशी संमिश्र होती. ‘रेनेसाँ’मुळे बलाढ्य झालेल्या युरोपीय, देशांनी आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सर्वत्र प्रथम व्यापर ताब्यात घेतला. मग राजकीय वर्चस्व मिळवलं आणि त्याचवेळी भरपूर बाटवाबाटवी केली.
20व्या शतकात अफाट सैनिकी बळ मिळवलेल्या हिटलरला जगावर राज्यही करायचं होतं, आपलं नाझीवाद हे तत्त्वज्ञानही सर्वत्र प्रसरवायचं होतं. हे करताना ख्रिश्चन धर्माचा प्रसारही झाला असता, तर त्याची हरकत नव्हती. कारण, तो निष्ठावंत कॅथलिक होता.
कोणताही देव-धर्म न मानणार्या आणि स्वतःला शोषित-वंचितांचं राज्य म्हणवून घेणार्या स्टॅलिनच्या रशियाची तीच गत होती. त्याला ‘साम्यवादी क्रांतीची निर्यात’ करून जगभर साम्यवादी साम्राज्य उभारायचं होतं. कोणताही धर्म न मानणार्या साम्यवाद्यांनी साम्यवाद हाच एक नवा धर्म बनवला. म्हणजे त्यांच्या प्रेरणा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्याच होत्या.
20व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात धर्म आणि अर्थ यांच्यातला संघर्ष चालूच असताना, अर्थाच्या पाठबळावर धर्माने पुन्हा डोकं वर काढलं. पेट्रो डॉलर्सच्या प्रचंड शक्तीनिशी इस्लाम पुन्हा राजकीय वर्चस्वाच्या आखाड्यात उतरला. बुद्धिबळाच्या खेळात दोनच रंग, दोनच पक्ष असतात. एक काळा आणि एक पांढरा. पण, जागतिक सत्ताकारणाच्या खेळात इतके रंग असतात, इतके पक्ष असतात की, कोण मित्र नि कोण शत्रू हेच कळेनासं होतं. पुन्हा हे शत्रू नि मित्र बदलत असतात.
थोडेफार धर्माला मानणारे, पण मुख्यतः पैसा आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांना मानणारे पाश्चिमात्य आणि धर्माला अजिबात न मानणारे पाश्चिमात्य; थोडक्यात भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यात तीव्र पण सुप्त संघर्ष सुरु होता. त्याचवेळी मुसलमानी अरब राष्ट्रं नि त्यांच्या पोटात धर्माच्या आधारावर निर्माण झालेला इस्रायल हा ज्यू देश असे दोन्ही पक्ष आपापलं बळ वाढवत होते. साम्यवाद पराभूत होऊन भांडवलशाही निरंकुश होतेय असं वाटतंय, तोच इस्लामने तिच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं. अरबी देश आणि इराणचे अयातुल्ला लोक सर्वशक्तिमान पश्चिमी देशांच्या डोक्यावर मिर्या वाटतायत आणि त्याच वेळी चिमुकला ज्यू इस्रायल हा अरब-इराणी दोघांनाही सूर्याची पिल्लं दाखवतोय, असं चमत्कारिक गमतीदारदृष्य बघून जग चकित होतंय, तोच पुढची गंमत घडली. एका अरब्याने दुसर्या अरबावर आक्रमण करून त्याची भूमी हडपली. इराक या अरब देशाने कुवैत या अरबी देशाला जिंकलं. त्याबरोबर अमेरिका नि युरोप कुवैतच्या मदतीला धावले. आता दोन मुसलमान आपसात लढतायत, तर या ख्रिश्चनांना मध्ये पडायचं काय कारण? ती प्रेरणा धार्मिक नसून आर्थिक होती नि आहे. कुवैतकडचं विपुल तेल पश्चिमी देशांना हवं आहे. त्यांना ते काळं सोनं इराकला मिळू द्यायचं नाहीये.
इकडे मुसलमान अरब देश ज्यू इस्रायलचं अस्तित्व नष्ट करण्याच्या वल्गना करून थकले. त्यांच्यातला प्रमुख देश जो इजिप्त तो केव्हाच इस्रायलशी मैत्री करून मोकळा झाला. इतर अरब देशांच्या विरोधाची धार मंदावली. तोच इराणने इस्रायलशी एकदम धारदार शत्रुत्व सुरू केलं. इराण अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ष्ट्रांप्रमाणेच इस्रायलचा पण उघड द्वेष करू लागला. इराणला जागतिक इस्लामचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली.
जगाचा नकाशा पाहिलात तर कळेल, इराण आणि अरबी देश यांच्या दरम्यान पर्शियन गल्फ किंवा इराणचं आखात आहे नि या आखाताच्या काठावर उमान (ओमान) संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन, कुवैत इत्यादी छोटे अरब देश आहेत. त्यांची भूमी छोटी असली तरी त्यात प्रचंड तेलसाठे आहेत. शिवाय गेल्या काही वर्षांत इराणी आखाताच्या समुद्र तळात नवनवीन तेलसाठे सापडत आहेत. त्यावर अधिकार कुणाचा, यावरून इराण आणि सगळे अरबी देश यांच्यात भांडणं सुरू झाली नि ती भडकतच चाललेली आहेत. म्हणजे या संघर्षाची प्रेरणा आर्थिक आहे.
आर्थिक तर आहेच, इस्लामच्या नेतृत्वाचा मुद्दा आहेच. पण, पंथाचा संघर्षही आहे. सर्व अरबी देश मुख्यत: सुन्नी पंथीय आहेत आणि इराण हा शिया पंथीय आहे. पुन्हा त्यात वांशिक मुद्दाही आहेच. अरब आणि इराणी हे वेगळ्या वंशाचे आहेत. अरब हे स्वत:ला अस्सल मुसलमान आणि जगातल्या इतर सर्व मुसलमानांना कमअस्सल मानतात. त्यामुळे अरबांचं इस्रायलशी पटत नाही, इराणचं इस्रायलशी पटत नाही, पण अरब आणि इराण यांचंही आपसात पटत नाही.
हे सगळं बघून अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांनी एक चांगली खेळी केली. सप्टेंबर २०२० मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीने चक्क मैत्री केली. नंतर बहारीन पण त्यांना सामील झाला. ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांचा मूळ पुरुष अब्राहम. म्हणून या मैत्री करायला ’अब्राहम करार’ असं नाव देण्यात आलं.
आता पॅलेस्टाईनी नागरिकांच्या पुनर्वसन विषयावरून इस्रायलमध्ये सतत घातपाती कारवाया करणारी अतिरेकी संघटना जी हमास, तिला साहाय्य करणारा मुख्य देश कोण? तर इराण! हमासच्या अतिरेक्यांनी ‘कासम’ नावाची हलकी क्षेपणास्त्रं वापरून घातपाती हल्ले सुरू केल्यावर इस्रायलने ‘आयर्न डोम’ या अत्यंत प्रगत प्रणालीद्वारे ‘तामीर’ नावाची क्षेपणास्त्रं वापरून ‘कासम’चा आकाशातच चुराडा उडवला. आता तर इस्रायल ‘आयर्न डोम’चा पुढचा टप्पा म्हणून ‘आयर्न बीम’ विकसित करीत आहे. ‘विज्ञान’ चित्रपटात दाखवतात तसा, एक अत्यंत प्रखर प्रकाशझोत सोडून, आक्रमण करून येणारं क्षेपणास्त्र आकाशातच ‘इंटरसेप्ट’ म्हणजे अडवून नष्ट करणारी ही प्रणाली अतिशय स्वस्तदेखील असेल.
२०२०पासून आता २०२२ मध्येही इस्रायलच्या या ‘आयर्न डोम’चा प्रभाव पाहून खुद्द सौदी अरेबियासह इतरही अरब देश इस्रायलच्या ‘अब्राहम करारा’मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. फक्त अजून उघडपणे ते तसं म्हणत नाहीयेत. कारण, आपण ज्यू लोकांशी मैत्री केलेली आपल्या नागरिकांना कितपत आवडेल, याबद्दल ते साशंक आहेत. मात्र, इराण या समान शत्रू विरोधात आपल्याला इस्रायलचा ‘आयर्न डोम’ नि ‘आयर्न बीम’ हवा, हे त्यांनी मनोमन ठरवलंच आहे. आता या प्रेरणांना काय म्हणायचं? धार्मिक, आर्थिक, राजकीय की संमिश्र?