मुंबई : दि. 2 जुलै, 2019ची ती मध्यरात्र. अचानक पावसाने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे मालाडमधील कुरार गाव येथील आंबेडकरनगर येथे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अचानक कोसळलेल्या भिंतीमुळे 32 जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झालेे. परंतु, या दुर्घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतरही येथील नागरिकांना अद्याप त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत. अजूनही येथील नागरिक हे मृत्यूच्या छायेतच आपले जीवन कंठत आहेत.
येथील नागरिकांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लवकरात लवकर येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींचे दार ठोठावूनदेखील कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नसून आम्हा महिलांनाच तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते, असे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना स्पष्ट केले.
तसेच, मागे जेव्हा आम्ही धरणे आंदोलन केले होते, त्यावेळी आम्हाला सांगितले होते की, तुम्हाला घरे लवकरच मिळतील. पण नंतर सांगितले की, आम्ही तुमच्या कागदपत्रांच्या हिशोबाने काम करत आहोत. आम्ही सर्व कागदपत्रे दिली असूनही अद्याप आम्हाला घरे मिळालेली नाहीत. तसेच, आमची फाईल संबंधित विभागात अडकलेली असून तिथून फाईल आली की, आम्हाला लगेच घरे मिळतील, असे आम्हाला सांगण्यात आले आहे, असेही येथील स्थानिकांनी सांगितले. त्याचबरोबर आमची फाईल नक्की कशामुळे अडकली आहे, हेदेखील आम्हाला माहिती नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाचा जोर थोडाजरी वाढला, तरी आमची लहान मुले घाबरून उठतात. आम्हाला लवकरात लवकर आमची घरे मिळावी, अशी मागणीही नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
आम्हाला हक्काचे घर मिळणार आहे का?
आम्ही एका रात्रीत सर्व काही गमावले आहे. अजूनही आम्ही जीव मुठीत घेऊन येथे राहत आहोत. मागील वर्षीही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पावसाचे पाणी आमच्या परिसरात आले आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही आम्ही भीतीच्या छायेखाली राहिलो होतो, असे सांगत आतातरी आम्हाला आमच्या हक्काचे घर प्रशासन देणार आहे का, असा सवाल येथील स्थानिकांनी प्रशासनाला विचारला आहे.