शेअर बाजार गुंतवणूक आणि परताव्याचे गणित

    23-Sep-2022   
Total Views |

share market
 
 
 
गुंतवणुकीतील अनेक पर्यायांत शेअर बाजारातील गुंतवणूक हा एक मुख्य पर्याय आहे. मराठी माणसे पूर्वी शेअर बाजारात विशेष गुंतवणूक करीत नसत. मराठी माणसांची ‘शेअर बाजार म्हणजे जुगार’ अशी मनोभावना होती, पण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नसून, आता मराठी माणसांची शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे. त्याविषयी...
 
 
मुंबई शेअर बाजार हा भारतातील सर्वात जुना शेअर बाजार असून, सर्वात लोकप्रिय शेअर बाजार आहे. यातील गुंतवणुकीवर अगदी सुरुवातीपासून गुंतवणूकदराला वार्षिक सरासरी 17 ते 18 टक्के परतावा मिळाला आहे. हा परताव्याचा दर खरोखरच जबरदस्त आहे.
 
 
शेअर बाजाराचे चढ-उतार हे निर्देशांकातमोजतात. इंग्रजीत त्याला ‘इंडेक्स’ म्हणतात. लोकांच्या बोलण्यातही ‘इंडेक्स’ हाच शब्द असतो. एप्रिल 1979 मध्ये हा निर्देशांक 100 अंशांवर होता, तर गेल्या बुधवार, दि. 21 सप्टेंबर रोजी तो 59456.78 अंश होता. 43 वर्षांत शेअर बाजाराची ही प्रचंड उसळी म्हणावी लागेल! निर्देशांकाच्या पातळीची आकडेवारी 1979 पासून उपलब्ध असली, तरी निर्देशांक 1986 साली ‘लॉन्च’ झाला. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली नसण्याच्या कालावधीत निर्देशांक ‘लॉन्च’ झाला. कोणाची जर 30 प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये 1979 पासून आतापर्यंत गुंतवणूक असेल (मध्ये शेअर विकलेले नसतील) तर अशा गुंतवणूकदाराला वर्षाला सरासरी 15.8 टक्के दराने परतावा मिळाला असेल.
 
 
बँक ठेवी, अल्प बचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांतून मिळणार्‍या परताव्याचा विचार केला, तर या गुंतवणुकींतून मिळालेल्या परताव्याच्या दुपटीहून जास्त परतावा शेअर बाजारात गुंतवणूक असणार्‍यांना मिळाला आहे. याशिवाय या शेअरमधील गुंतवणुकींवर दरवर्षी कंपन्यांतर्फे लाभांशही मिळतो. लाभांशापोटी मिळालेली रक्कम जर गुंतवणूकदाराने शेअरमध्ये गुंतवली तर त्याला एक ते दीड टक्का जास्त परतावा मिळू शकतो. सुमारे 17 टक्के दराला परतावा मिळू शकतो. नोव्हेंबर 2014 (सध्याचे सरकार अस्तित्वात आलेले वर्ष) निर्देशांक 28 हजार, 694 होता. एप्रिल 1979 पासून नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्यांची शेअर बाजारात सरासरी 17.2 टक्के परतावा मिळाला.
 
 
लाभांशाची रक्कम ज्यांनी गुंतवली असेल, अशांना तर 18 टक्क्यांहून अधिक दराने परतावा मिळाला. हे चित्र गुलाबी वाटत असले, तरी शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीमही आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक करणार्‍यांना जोखमीची झळ, दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणार्‍यांपेक्षा जास्त बसते.
 
 
निर्देशांक ‘डेटा’ दि. 1 एप्रिल, 1979 पासूनचा उपलब्ध आहे. या दिवशी निर्देशांक124.15 अंशांवर बंद झाला होता. निर्देशांकाची एप्रिल 1979 मध्ये 100 समजून आकडेवारी केली तर परतव्याची टक्केवारी 15.2 येते. जर निर्देशांकाची पातळी 124.15 समजून आकडेवारी केली, तर परताव्याची टक्केवारी 15.2 येते. 1979 मध्ये शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 43 वर्षांनंतर आता 15.8 टक्के दराने, गुंतवणूक मूल्य रुपये 5 लाख, 83 हजार, 463 झाले असेल, तर 15.2 टक्के दराने, गुंतवणूक मूल्य रुपये 4 लाख, 65 हजार, 562 हजार रुपये झाले असेल. सुमारे साडेचार तप शेअर बाजारात गुंतवणूक कायम ठेवलेल्यांचा इतका प्रचंड परतावा मिळाला असेल.
 
 
हर्षद मेहतामुळे ज्या काळात शेअर बाजारात प्रचंड तेजी होती व नंतर हर्षद मेहताची लबाडी गुन्हेगारी लक्षात आल्यानंतर काही काळ शेअर बाजारात प्रचंड मंदी होती. 1961 नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर शेअर बाजारातील सौदे वाढले. परिणामी, 1979 पासून 1994 पर्यंत या कालावधीतील निर्देशांकाची वाटचाल जास्त वेगवान नव्हती 1994 नंतर ती जास्त वेगवान झाली. दि. 12 सप्टेंबर, 1994 रोजी शेअर बाजार निर्देशांक 4631 अशांवर बंद झाला होता. दि. 3 एप्रिल, 1979 ते दि. 12 सप्टेंबर, 1994 या कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 26.4 टक्के परतावा मिळाला होता. दि. 12 सप्टेंबर, 1994 पासून आतापर्यंत वार्षिक निर्देशांक परताव्याचे प्रमाण 9.5 टक्के होते. 1979 ते 1994 या 15 वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीच्या मूल्यात 36 पट वाढ झाली.
 
 
त्यानंतरच्या आतापर्यंतच्या 28 वर्षांच्या काळात गुंतवणुकीच्या मूल्यात 12 पट वाढ झाली. 1979 ते 1992 या काळात दि. 2 एप्रिल, 1992 मध्ये निर्देशांक सर्वाधिक 4388 इतका होता. या कालावधीत वार्षिक सुमारे 31.5 टक्के परतावा मिळाला. 1979 पासून त्यानंतरच्या वर्षी 8.9 टक्के दराने वार्षिक परतावा मिळाला. 1979 पासून पुढील 13 वर्षांत शेअर बाजारातील निर्देशांकगुंतवणुकीत 34 पट वाढ झाली, तर त्या पुढील तीन दशकांत सुमारे 12 टक्के वाढ झाली. 1979 पासून बरीच वर्षे शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण फार कमी होते व जी काही गुंतवणूक होते, असे ती प्रमुख व मोठ्या शहरांंतच होत असे. 1992-1994 पासून शेअर बाजारातील उलाढाल वाढली.
 
 
शेअर बाजारात ’लिस्ट’ असलेल्या शेअरची खरेदी करणे किंवा विक्री करणे याला ‘सेकंडरी मार्केट’ म्हणतात. कंपन्यांचे शेअर विक्रीस काढलेले शेअर याला विकत घेणे याला ‘प्रायमरी मार्केट’ म्हणतात. शेअर विक्री प्रक्रिया संपल्यानंतर शेअरचे वाटप झाल्यानंतर व शेअर ‘लिस्ट’ झाल्यानंतर तो शेअर ’प्रायमरी मार्केट’मधून ‘सेकंडरी मार्केट’मध्ये येतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना वेळ फार महत्त्वाची असते. योग्य वेळ साधण्याचे कौशल्य असावे लागते. शेअरचा भाव कमी असताना गुंतवणूकदार शेअर खरेदी करतात. भाव वाढल्यावर विक्रीचा विचार करतात. दि. 8 जानेवारी, 2005 रोजी निर्देशांक 20 हजार, 873 अंशांवर बंद झाला होता. या दिवसापासून आतापर्यंतचा विचार केल्यास परतावा 7.3 टक्के मिळाला.
 
 
‘निफ्टी’ निर्देशांक
 
 
जसा शेअर बाजारातील उलाढालीचे मूल्यमापन करण्याकरिता निर्देशांक आहे, तसा राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढालीचे मूल्यमापन करण्याकरिता ‘निफ्टी’ निर्देशांक आहे. ‘निफ्टी’ निर्देशांकाचा विचार केल्यास मात्र वर्षाला सरासरी 13.8 टक्के दराने परतावा मिळाला आहे. हा निर्देशांक 1999 पासून कार्यरत झाला. 1999 पासून ऑगस्ट 2014 पर्यंतच्या पहिल्या 15 वर्षांच्या काळात राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांना 14.5 टक्के दराने परतावा मिळाला. गुंतवणूकदार शेअर कधी खरेदी करतो? आणि कधी विकतो? यावर त्याला किती परतावा मिळणार, हे ठरते. शेअर खरेदी करायला आणि विकायला योग्य वेळी साधली गेली पाहिजे. अशी उदाहरणे घडतात की, आज शेअर विकले, पण उद्या विकले असते, तर जास्त पैसे मिळाले असते. शेअर बाजारातील उलाढालींना किंवा चढ-उतारांना तशी तार्किकता नाही. अमेरिकेचा अध्यक्ष बायडन जर शिंकला तरीही शेअरबाजार खाली जाऊ शकतो, असे म्हणूनच उपहासाने म्हटले जाते.
 
 
शेअर बाजार खाली किंवा वर जाण्यास देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारणेही अवलंबून असतात. ‘निफ्टी’ निर्देशांकात जर ऑगस्ट अखेरीची पहिल्या दहा वर्षांची आकेडवारी पाहिली, तर सरकारी वार्षिक 14.2 टक्के परतावा मिळाला. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून शेअर बाजाराचा अभ्यास लागतो, पण त्याशिवाय नशीबही बाजूने लागते. कधी कधी अभ्यास करणारे फसतात व अंदाजपंचे गुंतवणूक करणारे पैसा कमवून जातात. पण, ज्याप्रमाणे एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नयेत, त्यानुसार सर्वच गुंतवणूक एकाच पर्यायात करू नये. गुंतवणूक विभागावी.
 
 
म्युच्युअल फंड
 
 
ज्याला शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावयाची नसेल, अशांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. आपल्या देशात बर्‍याच म्युच्युअल फंड कंपन्या आहेत व त्याच्या फार मोठ्या संख्येने गुंतवणूक योजना आहेत. या म्युच्युअल फंड योजनांसाठी जनतेकडून पैसा जमविला जातो, तो ‘डेट’ किंवा शेअरमध्ये गुंतविला जातो. काही योजनांत 100 टक्के निधी शेअरमध्ये गुंतविला जातो. काही योजनांत 100 टक्के निधी ‘डेट’मध्ये गुंतविला जातो. काही योजनांत काही टक्के निधी ‘डेट’मध्ये व काही टक्के निधी शेअरमध्ये गुंतविला जातो.
 
 
गुंतवणूकदार त्याला हव्या त्या पर्यायात गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणूकदारांची त्याच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक होते. फक्त शेअरमध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांमध्ये जोखीम जास्त असते. ‘डेट’मध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांत जोखीम जवळजवळ नसते.
 
 
‘डेट’ व शेअर दोन्हींमध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांमध्ये मध्यम स्वरूपाची जोखीम असते. पूर्वी भारतीयांचा कल फक्त बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचा होता. आता भारतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण फार वाढले असून, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीवर कित्येक गुंतवणूकदारांना फार चांगला परतावा मिळाला आहे. कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना त्या कंपनीचा शेअर भाव काय आहे, हा मुद्दा विचारात घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक कंपनीच्या प्रवर्तकांना/व्यवस्थापकांना आपल्या कंपनीचा शेअरची जास्तीत जास्त उलाढाल व्हावी व शेअरचा भाव चढता राहावा असे वाटते, हे गुंतवणूकदारांनाही वाटते. शेअर बाजारातील कारभार हा जरी 100 टक्के शास्त्रशुद्ध नसला, तरी शेअर बाजार म्हणजे जुगार नव्हे, हे निश्चित!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.