मुस्लीमबहुल परिसरातील आपल्या घरात देश-विदेशातील हजारो गणपती बाप्पांना आसनस्थ करणार्या ठाण्यातील दिलीप वैती या अवलियाविषयी...
14 विद्या, 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या घरात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांचे सोबती बनलेल्या दिलीप जनार्दन वैती यांची गणेशभक्ती अवर्णनीय आहे. दिलीप यांचा जन्म 27 जानेवारी 1972 साली ठाण्यातील मुस्लीमबहुल राबोडी परिसरात झाला. बालपणापासूनच हट्टी व मस्तीखोर असलेल्या दिलीप यांना वयाच्या चौथ्या वर्षीच ढोलकी तसेच रंभासंभा वाद्य वाजवण्याचा छंद जडला. त्यानंतर पुढील आयुष्यात एक-एक करीत अनेक कला आत्मसात करण्यासह त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले.
दिलीप कुठलेही व्रतवैकल्य अथवा उपासतपास करीत नाहीत. तरीही त्यांच्यात गणेशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या घरी पूर्वजांचा नवसाचा गणपती पूजला जात असे. याच प्रेरणेतून वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मुंबईतील एका प्रदर्शनातून ‘पॉकेटमनी’ खर्चून शिळेची पहिली गणेशमूर्ती घरात आणली. यामुळे घरच्यांची बोलणीदेखील त्यांना खावी लागली, असे दिलीप सांगतात. मात्र, कालांतराने संपूर्ण घरच गणेशमूर्तीमय बनल्याने ‘बाप्पाचे घर’ हीच दिलीप वैती कुटुंबाची ओळख बनली आहे. ठाण्यातील ‘श्रीरंग विद्यालया’त प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप यांनी मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून ‘कमर्शियल आर्ट्स’चे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन विश्वात वेगळेच चित्ररूपी आयुष्य जगायला मिळाल्याने प्रत्येक कला त्यांनी अवगत केली.
शिक्षण घेताना गणपती बाप्पांच्या मखरांची कामे केली. त्याकाळात जवळपास 300 मखरांची सजावट करीत. त्याचदरम्यान खरा सुवर्णयोग जुळून आला. दिलीप यांनी साकारलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या सिंहासनाच्या डिझाईनची निवड झाली. त्यानंतर नृसिंहवाडी पदवस्त्र, एकविरा देवीचे आरेखन, हिंगलाई देवी मंदिर, तसेच गिरनार दत्तगुरुंची सजावट, सावंतवाडीतील टेंबे स्वामी पादुका मंदिर, प्रती गाणगापूर, ठाण्यातील मंदिरे सजवण्याची सेवा घडल्याचे दिलीप सांगतात. सध्या ते पूर्णवेळ कलाक्षेत्राशी निगडित व्यवसायात व्यस्त आहेत. गणेशोत्सवात त्यांच्या घरातील सजावट नेहमीच हटके असते. एकदा गणेशोत्सवादरम्यान आलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून वह्या-पुस्तकांची सजावट करून हजारो वह्या-पुस्तके वाटपाचा आगळा उपक्रम त्यांनी साजरा केला होता.
या अवलियाने हजारो गणेशमूर्तींचे संकलन घरातच करून अनोखा छंद जोपासला आहे. अगदी 20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते 300 किलोपर्यंत आणि अर्धा इंचापासून ते चार ते पाच फुटी गणेशमूर्ती त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचनेत कृषी गणेश ते विश्वविनायकाच्या शेकडो गणेशमूर्ती विराजमान आहेत. आरामात पहुडलेले गणराय, क्रिकेट खेळताना विविध ‘पोझ’मधील बाप्पा, सभागायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, शिक्षक बाप्पा, वनवासी वेशातील, बालरूपातील, पाळण्यातील सृष्टीगणेश ते विश्वविनायक अशा अनेक रूपातील हजारो गणेशमूर्ती अक्षरशः मन मोहून घेतात. या छोटेखानी संग्रहात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आदी देशांतील त्याचबरोबर भारतभरातील गणेशमूर्तींचाही समावेश आहे.
यात ‘कॅनव्हॉस’वर चितारलेल्या गणपतीचे चित्र विलक्षण असून गणेशाच्या प्रतिमा व मूर्तींचा हा खजिना त्यांनी जीवापाड जपला आहे. हा संग्रह जोपासताना प्रत्येक गणेशमूर्तींची देखभालही तेवढीच काळजीपूर्वक घ्यावी लागते. पंधरवड्यातून एकदा त्यांची बहीण अर्चनासह ते सर्व मूर्ती पाण्याने धुवून पुसून ठेवतात. गेली अनेक वर्षे हा शिरस्ता कायम आहे. त्यामुळे ’आमच्या घरात बाप्पा’ म्हणण्यापेक्षा ’बाप्पांच्या घरात आम्ही राहतो’ असे ते अभिमानाने सांगतात. याच माध्यमातून दिलीप यांना विश्वविनायकाच्या 108 नामावलीतून बाप्पांच्या दर्शनाची ओढ वाटल्यानंतर ‘विश्वविनायक’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शहरविकासात योगदान तसेच अनेक समाजोपयोगी कामेही केल्याचे सांगतात. वृक्षारोपण, भीत्तिचित्रे, विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिकांतून बुद्धिदेवतेच्या कलेचा प्रसार ते करतात.
गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात ’ग्रीन गणेशा’ या उपक्रमात परीक्षक असलेल्या दिलीप यांना ‘ठाणे गुणिजन’, ‘ठाणे नवरत्न’ आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनेक नामांकने विविध माध्यमांमध्ये मुलाखती व कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. सध्या त्यांचा ‘मॉर्निंग मोरया’ हा ऑनलाईन उपक्रम अखंडपणे सुरु असून दररोज एक गणपतीचे चित्र ते रेखाटतात. त्यावर सर्वदूरच्या मान्यवर कवी तसेच नवोदित कवींच्या काव्यरूपी रचनांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचे ते सांगतात. “जिद्द सोडू नका, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहा, सातत्य आणि नवनिर्मितीचा ध्यास कायम ठेवा,” असा संदेश ते नवीन पिढीला देतात. समाजाचे आपणही देणे लागतो, म्हणून सतत नवनवीन संकल्पनांवर काम करीत असल्याचे सांगणार्या दिलीप वैती यांना पुढील वाटचालीस दै.‘मुंबई तरुण भारत’ च्या शुभेच्छा!