पित्याच्या अधुऱ्या स्वप्नाला, पुत्रानं दिलेली मानवंदना म्हणजे मराठ्यांची 'राजमुद्रा'!
02-Sep-2022
Total Views | 117
22
छत्रपती शिवाजी महाराज या नावानेच संपूर्ण भारतवासीयांच्या मनात एक आदराची आहे. महाराजांच्या शौर्याच्या गाथा ऐकताना उर भरुनं येतं. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी बलाढ्य मुघल सम्राट औरंगजेबाशी दिलेली झुंज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्फुर्तीच निर्माण करते. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती म्हणून स्वतःला राज्याभिषेकही करून घेतला होता, स्वतःचे नाणे, ध्वज, राजमुद्रा या सगळ्याची निर्मिती त्यांनी केली होती. शिवाजी महाराजांच्या याच राजमुद्रेच्या अष्टकोनी आकारात आता भारतीय नौदलाचे नवे चिन्ह तयार करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या या राजमुद्रेच्या निर्मितीमागे खूप मोठा विचार होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यापूर्वी वडील शहाजी राजेंचा यात मोठा विचार होता.
अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध वजीर मलिक अंबर याच्या मृत्यूनंतर निजामशाहीत अंदाधुंद माजली, याच अंदाधुंदीचा फायदा घेत मुघल बादशहा शहाजहानने आदिलशहाशी हातमिळवणी केली. त्याने निजामशाहीचे अस्तित्वच नष्ट करण्यासाठी दक्षिणेत स्वारी केली. यावेळी निजामशाहीचे पराक्रमी सरदार शहाजी राजांनी निजामशाहीचे पुनरुज्जीवन करून या दोन्ही सत्तांशी तब्बल सहा वर्षे एकहाती झुंज दिली. पण शेवटी त्यांना फारकाळ हा लढा चालवणे अवघड झाले. तेव्हा त्यांनी निजामशाहीची शरणागती दिली आणि आदिलशाहीची नोकरी स्वीकारली.
तरीही त्यांच्या मनात असलेली स्वराज्याची आस काही केल्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दक्षिणेत बंगळुरू या जहागिरीत स्थिर झाल्यावर शहाजी राजांनी बालशिवबा आणि जिजाऊ यांना तिकडे बोलावून घेतले. आपल्या मुलांमध्ये ती स्वराज्याची आस दिसते आहे काय? हे शहाजीराजे पारखत असताना शिवाजी राजांच्या बाबतीत एक प्रसंग घडला आणि तिथूनच स्वराज्याची खरी पायाभरणी सुरू झाली.
बाल शिवबांना घेऊन शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारात गेले असताना, सर्वांनी बादशहाला कुर्निसात केला. शिवाजीराजे काही वाकले नाहीत तर ते बादशाहाच्या डोळ्यांना डोळे भिडवून तसेच ताठ उभे राहीले. यावरून दरबारचे वातावरण तापले पण शहाजी राजांनी सांभाळून घेतले. या प्रसंगाने शहाजी राजे सुखावले. आपल्या या मुलात आपल्या मनातली स्वराज्याची आस आहे हे बघून ते सुखावले आणि त्यांनी शिवाजी राजांना महाराष्ट्रात पाठवायचे ठरवले. त्यांनी यावेळी शिवाजी राजांसोबत सर्वच गोष्टी पाठवल्या. एका स्वतंत्र सार्वभौम राजाला आवश्यक त्या सर्व गोष्टी, ध्वज, अष्टप्रधान, सर्व शिक्के आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'राजमुद्रा'. एका स्वत्रंत राज्याची राजमुद्राच त्यांनी करून पाठवली.
'प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।'
‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ.
हीच मुद्रा शिवाजी राजांनी आपल्या सर्वच पत्रांवर, फर्मानांवर शिक्यांसाठी वापरली. १६७४ मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्याचा सार्वभौम सत्ताधीश म्हणून घोषित केले तेव्हा त्यांनी आपली राजमुद्रा म्हणून हीच शहाजी राजांनी दिलेली मुद्रा स्वीकारली. आपल्या पित्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करून या राजमुद्रेच्या रूपाने जणू काही शिवजी महाराजांनी त्यांना दिलेली मानवंदनाच दिली होती.