वेदांता-फॉक्सकॉनकडे कुणी पैसे मागितले का? चौकशी करा : राज ठाकरे
महाराष्ट्रातून आलेला उद्योग बाहेर का गेला चौकशी व्हायला हवी : राज ठाकरे
19-Sep-2022
Total Views | 68
50
नागपूर : महाराष्ट्र मोठा होण्याचं कारणच मुळात उद्योग महाराष्ट्रामध्ये आले हेच होतं. ज्यावेळेला उद्योगांसाठी आपण रेड कार्पेट टाकलं, त्यावेळाला महाराष्ट्राची प्रगती झाली. सर्व जेवढे उद्योग भारतामध्ये येऊ इच्छितात त्यांची पहिली पसंती हा महाराष्ट्र असतो. जर एखादा उद्योग महाराष्ट्रात येण्याच्या तयारीत होता तर नेमकं फिस्कटलं कुठे याची चौकशी व्हावी, वेदांता-फॉक्सकॉनकडे कुणी पैसे मागितले का? याची चौकशी करा , अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसे नव्या मुद्द्यांसह जनतेपुढे जाणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. "निवडणूका झाल्या. लोकांनी मतदान केलं. निकाल लागले आणि मग हे नवीन काहीतरी काढलं. कांनी हा फक्त काय खेळ बघत बसायचा का या सगळ्यांचा, असा सवाल त्यांनी विचारला. दोन दोन तास रांगेमध्ये उभं राहायचं मतदानाला उभं राहायचं त्या उन्हातान्हात उभं राहायचं यांना मतदान करायचा आणि ते केल्यानंतर हे वाट्टेल त्या प्रकारची प्रतारणा करायची, असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. मुळात वेदांताचं फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का?, असा सवालही त्यांनी विचारला. देशातलं प्रत्येक राज्य मोठं व्हावं प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यावेत तुम्हाला जर आठवत असेल तर मी २०१४च्या निवडणूकीला माझ्या भाषणामध्ये सांगत होतो की नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या तीन राज्यांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं. की या राज्यांमधनं बाहेर पडणारी लोकं ही त्याच राज्यामध्ये काम शोधतील. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच. पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय? याची चौकशी होणं गरजेचं आहे.", असेही राज ठाकरे म्हणाले.
नागपूर कार्यकारणी बरखास्त!
राज ठाकरेंनी नागपूर मनसेची कार्यकारणी बरखास्त करत असल्याचेही जाहीर केले. गेल्या १६ वर्षांत पक्षीय स्तरावर ज्या प्रमाणे बदल आणि वाढ अपेक्षित होती. ते दिसलेले नाहीत. त्यामुळे आता भविष्यात नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहितीही राज ठाकरेंनी दिली.