मुंबई : ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पहाटे धानवी, रामनगर नालासोपारा येथील एका चाळीवर छापा टाकला. यामध्ये कारु हुलाश यादव या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले. अत्यंत महत्वाचा नक्षलवादी असलेल्या कारूवर झारखंड पोलिसांकडून तब्बल १५ लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. "महाराष्ट्र एटीएसच्या या कारवाईने नक्षलवाद्यांना मोठा दणका बसणार आहे आणि नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेचे हे मोठे यश आहे" असे कौतुकोद्गार काढत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य एटीएसचे कौतुक केले.
कारू मुळचा डोडगा, तालुका कटकमसांडी, जिल्हा हजारीबाग, झारखंड येथील रहिवाशी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटीचा सदस्य आहे. दरम्यान यासंबंधीचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. झारखंड पोलीस त्याचा गेल्या कित्येक वर्षांपासून शोध घेत होती आणि त्याच्यासाठी तब्बल १५ लाखांचे इनाम जाहीर केले गेले होते. लवकरच महाराष्ट्र एटीएसकडून कारूला झारखंड पोलिसांच्या हवाली करण्यात येईल आणि तिथे त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यात नीती आयोगासारखी यंत्रणा उभारणार : देवेंद्र फडणवीस
राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही यंत्रणा उभारली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या योजनेस तत्वतः मंजुरी दिली आहे. अपारंपरिक ऊर्जा वापर, वाहतूक यंत्रणेतील सुधारणा, मालमत्ता विकास, इलेक्ट्रिक वाहन धोरण यांसाख्या विषयांवर ही यंत्रणा राज्य सरकारला मार्गदर्शन करेल. लवकरच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा होईल आणि त्यात मंजुरी मिळाल्यास या योजनेवर कार्यवाही सुरु करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.