सुभेदार पिंपुटकरांचा दहिवलीतील पार आणि त्याचा इतिहास
17-Sep-2022
Total Views | 216
38
कर्जत तालुक्यातील दहिवली गावातील सर्वांत जुनी वास्तू म्हणजे पिंपुटकर सुभेदारांचा वाडा होय. साधारणतः शके 1714 म्हणजे इसवी सन 1792 मध्ये विठ्ठल मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद मिळते. विचार केला असता त्या आधी पिंपुटकर सुभेदार इथे आले आणि त्यांनी निवास केला व दहिवली गावाला व्यापक रूप मिळत गेले. त्याचवेळी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पंचायतन आकार घेत होते. याच परिसरात अनेक जुन्या वृक्षांना पार बांधण्यात आले; आजही त्यातील चार पार शाबूत आहेत. तीन पार विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आहेत, तर एक पार हे गुरव आळीतील पिंपुटकर सुभेदारांच्या वाड्याजवळ आहे. बांडगुळ अंगावर घेऊन स्वतःचे अस्तित्व पूर्णतः विसरणारा भला मोठा वृक्ष त्याचा तयार झाला आहे. त्यामुळे त्याचे पुरातत्वीय दृष्टिकोनातून अचूक वय मात्र काढता आले नाही. सारासार विचार करता, त्या पाराचे बांधकाम पिंपुटकर सुभेदारांनी केले. त्याचा एक वेगळा इतिहास आहे. या लेखनप्रपंचात त्याचाच आढावा घ्यायचा आहे.
इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील तो काळ... दहिवलीतील सुभेदारांच्या राहत्या वाड्यात रोजची वर्दळ असायची. कारण, कल्याण सुभ्यात असलेला नसरापूर तालुक्याची अतिरिक्त सुभेदारीसुद्धा त्यांना मिळाली होती. थेट पेशव्यांचा दरबारात पुण्याला सुभेदारीण पार्वताबाई पिंपुटकरांचा नातू विसाजीपंत होते. राजकीय दृष्टिकोनातून विचार केला असता दहिवली गावाला आणि खास करून पिंपुटकर सुभेदारवाड्याला तेव्हा तालुक्याचे प्रमुख स्थान आले होते.
आजच्या दोन तालुक्यांची म्हणजे कर्जत व खालापूर आणि ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्याला स्पर्श करणारा काही भाग असा संपूर्ण परिसर त्यांच्या ताब्यात होता. त्यात होणार्या मोहिमा, सारा आकारणी आणि देव-उत्सवासाठी असा सर्वच लवाजमा सुभेदारवाड्याच्या परिसरातून बाहेर पडत असे. रोजची होणारी गर्दी लक्षात घेता कोण्या एका मंत्राक्षराच्या सांगण्यावरून गुरव आळीतील या पिंपळाच्या झाडाला पार बांधण्यात आला, अशी नोंद मिळाली आहे. हिंदू धर्मांत झाडांना पार बांधणे म्हणजे सत्कर्म होय.
आज पाराच्या बांधकामाला 200 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. त्याकाळी सुभेदारांच्या वाड्यात वर्दळ असली की, इथे महत्त्वाचा थांबा असे. कोणी कामानिमित्त अथवा भेटीगाठीसाठी आल्यावर इथून या पारावरून पहिले वर्दी दिली जात असे, जोपर्यंत वाड्यातून होकार येत नाही, तोपर्यंतयाच पारावर मंडळी बसलेली असे, त्याशिवाय वाड्यात कोणालाही प्रवेश नसे. पाराचे बांधकाम झाल्यावर इथे मंत्राक्षराच्या सांगण्यावरून पारावर मुंजोबाचे राऊळ बांधण्यात आले. याच पाराच्या सावलीत दहिवलीची ग्रामदेवता महालक्ष्मीचे मंदिरसुद्धा आहे.
पिंपुटकर सुभेदारांनी पिंपळाला पार बांधला आणि त्यावर मुंजोबाची स्थापना केली. विठ्ठल संस्थानाच्या ताब्यात दहिवली गावातील 18 वेशी आहेत, त्यामध्ये ज्याचा मान पहिला आहे तो मुंजोबा या पारावर आहे. त्याकाळी या मुंजोबाचा छोटा उत्सव गुरवांच्या मदतीने पिंपुटकर सुभेदारांच्या हस्ते केला जात असे. चैत्र कृ.2 मध्ये मुंजोबाला अभिषेक करून पाच ब्राह्मण आणि 25 मुंज्यांचे भोजन या पारावर केले जात होते. या उत्सवाच्या मागे इतिहास असा आहे की, दहिवली गाव दोन वेळा अग्निमुखी पडले, तेव्हा हा उत्सव सुरू करण्यात आला, अशी नोंद आहे. आज हा उत्सव पूर्णपणे बंद आहे.
आज या पिंपळाच्या झाडावर अनेक बांडगुळ झाडं आली आहेत. त्यामुळे याचे अचूक वयवर्षे वनस्पतीतज्ज्ञ नम्रता म्हाळसेकर - गांगल यांना काढता आले नाही, तरीसुद्धा त्यांच्या प्रयत्नाने या झाडाचे अंदाजे वय 319 वर्षे आलं आहे. आज दहिवली गावाची ओळख म्हणजे हे पाराचे झाड आहे, तर गावातील लग्नाचा पहिला नारळ या मुंजोबाला वाढवला जातो, अशी प्रथा आहे. सध्या स्थानमाहात्म्याचा अभ्यास सुरू आहे, त्यावरून या मुंजोबाच्या मागे म्हणजे नैऋत्य-पश्चिमेला अनेक विचित्र अशा घटना दिसून आल्या आहेत. लवकरच त्या प्रकाशित करण्याचा मानस आहे.
इतिहास याचि डोळा पाहणारी पाराची ही वास्तू आज मात्र उपेक्षित आहे. अनेक दगडी चिरा निखळण्याच्या स्थितीत आहेत. प्रशासनाने पुरातत्वीय दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, पिंपुटकर सुभेदारवाड्याच्या खालोखाल वैभव याच पाराने पाहिले आहे. त्या समोर उभे राहिलेले दत्तमंदिर आणि निघून गेलेला दत्तसुद्धा याच पाराने पाहिला आहे. इतिहासात या पाराला महत्त्वाचे स्थान आहे. साहजिकच त्याला वाचवणे काळाची गरज आहे.