मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करत राज्यात विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने आरोपांची राळ उठवली आहे. वेदांतासारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यास विद्यमान फडणवीस शिंदे सरकार कारणीभूत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
दरम्यान, मविआतर्फे केल्या जाणाऱ्या आरोपांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वेदांताच्या बाबतीत घडलेल्या घटनेला तत्कालीन महाविकास आघाडीचे वसुलीचे धोरणच जबाबदार आहे,' अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
आ. राम शिंदे म्हणाले की , 'इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाणे महाराष्ट्रासाठी नुकसानदायक आहे. वेदांतासारखे मोठे प्रकल्प महाराराष्ट्राच्या बाहेर जाण्याला केवळ महाविकास आघाडीचे वसुली धोरण जबाबदार आहे.' फडणवीस - शिंदे सरकारवर टीका करणाऱ्यांना आव्हान देताना ते म्हणाले की, 'ठाकरे सरकारच्या काळात या कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील त्यांनी जाहीर करावा.'