इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतनाधृतिः ॥ (अ.१३ श्लो.६ )
गीतेतील सहाव्या श्लोकातील हे सूत्र अतिशय महत्त्वाचे असून जडात चेतना कशी उत्पन्न झाली, याचे महाविज्ञान सांगते. 'E = mc2' सूत्राद्वारे परमाणूला फोडल्यानंतर त्यातून भयानक ऊर्जा प्राप्त होते, हे सांगून आईनस्टाईनने विज्ञानक्षेत्रात क्रांती घडवून आणली. तद्वत् व्यासांचे वरील सूत्र लक्षात आल्यास जडातून चैतन्य कसे उत्पन्न झाले, याबद्दल आज जो न संपणारा वाद उत्पन्न झाला आहे, त्याचे उत्तर याच सूत्रात सापडते. आजच्या विज्ञानानुसार सदा भयानक वेगाने फिरणारे आसमंतातील ओत सापेक्षकालात, सापेक्षसंख्येत आणि सापेक्षअवस्थेत जर एकत्र आले, तर त्यातून अनुस्यूत असलेल्या विद्युतचुंबकीय शक्तीमुळे त्या सापेक्षरित्या एकत्रित आलेल्या ओतांपासून प्राणवायू, नत्रवायू इत्यादी मूलद्रव्ये उत्पन्न होतात. असली मूलद्रव्ये पुन्हा एकमेकांशी संलग्न होऊन नवनवीन द्रव्ये म्हणजे पदार्थ तयार करून त्याद्वारे हे सारे विश्व बनले आहे. ही सारी द्रव्ये आणि मूलद्रव्ये जड स्वरूपाची असून त्यांना वजन, आकार व विभिन्न गुण आहेत. त्या मूलद्रव्यांना घटित करणारे ओत मात्र जड नसून केवळ विद्युतभार आहेत.
आपल्या विद्युतभारीय भ्रमणशक्तीमुळे ते संघटितपणे विभिन्न गुणांची मूलद्रव्ये तयार करतात. आता गुणहीन असा ओत सापेक्षरित्या संघटित झाल्यास त्यातून जडपदार्थ तयार होतो, जो आपापल्या उत्पन्न गुणाने अन्य गुणांच्या मूलद्रव्यांशी संलग्न होऊन आणखी नवीनच गुणाचा मिश्रपदार्थ तयार करतो, अशी ही साखळी चालू आहे. परंतु, असल्या मूलद्रव्याच्या गुणात्मक संबंधांना किंवा संघटनांना कोणी जीव म्हणून संबोधत नाही.
बाहेर हवेत असणारा प्राणवायूचा कण निर्जीव मानला जातो. तो श्वासाद्वारे रक्तात अभिसारित झाल्यास लगेच त्यात जीवंतपणा उत्पन्न होऊन अशा अनेक प्राणवायूंच्या संघटित सक्रियतेला जीवकार्य असे म्हणतात. सृष्टीत विपुल असणारा जडकर्बअणू जीव मानला जात नाही. कारण, तो तसाच दगडासारखा असंख्य वर्षे तसल्या अवस्थेत सृष्टीत पडून राहील. निर्जीव जडकर्बापासून अमीबासारखे एकपेशीय जीव उत्पन्न होऊ शकतात, असे आजचे विज्ञान मानते.
पण ते कसे याचे उत्तर अजून विज्ञानाजवळ नाही. ते केवळ इतर धर्मपंथांप्रमाणे मानणेच (ऋरळींह) आहे. असल्या मानण्याला शास्त्रीय आधार नसतो. धार्मिक विचारांचे वैज्ञानिक असे मानतात की, परमेश्वराने जडकर्बात प्राण ओतून त्याला चैतन्यमय करून जीवसृष्टी उत्पन्न केली. वैज्ञानिकांनी एका पात्रात बरेच वायू मिसळून त्यांचा स्फोट केला. तेव्हा वैज्ञानिकांना त्या पात्रात अत्यल्प प्रमाणात ‘डीएनए’ पदार्थ मिळाला, ज्यापासून सर्व सजीवसृष्टी उत्पन्न झाली आहे. परंतु, हा ‘डीएनए’ पदार्थ कसा आणि का उत्पन्न झाला, त्याचे समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत मिळू शकले नाही.
मनुष्याला गुंगीचे औषध दिले की, त्याच्या तंतूसंस्थेवर परिणाम होऊन शरीराचे सुख व दुःख मनुष्याला कळत नाही. पण त्याही अवस्थेत शरीरातील विभिन्न जीवंतपणाच्या प्रक्रिया चालूच असतात. जसे रूधिराभिसरण, श्वासोच्छवास, पेशीवृद्धी, रसनिर्मिती इत्यादी. हृदय आदी क्रिया बंद पडल्या, तर त्या शरीराचा साराच खेळ आटोपला, असे मानावे लागेल. ज्या शरीरातील रूधिराभिसरण, हृदयस्पंदन, पेशीवृद्धी आणि रसनिर्मिती बंद पडेल, ते शरीर मृत मानले जाऊन त्या शरीराला जाळावे लागेल किंवा गाडावे लागेल.
परंतु, शरीरातील सर्व क्रिया-प्रक्रिया पूर्णपणे बंद असलेले समाधिस्थ योग्याचे शरीर मात्र तसल्या अवस्थेतही पूर्णपणे सजीव असते. कारण, कालांतराने शरीरभावावर येणारा योगी, ज्यावेळी आपल्या कल्पशरीरात परत सक्रीय बनतो, त्यावेळेस पुन्हा त्या समाधिस्थ शरीरात चैतन्य खेळायला लागून शरीरातील श्वासोच्छवास, रूधिराभिसरण आणि अनेक सजीव प्रक्रिया आपोआप उत्पन्न होतात. असा श्रेष्ठ योग्यांचा नित्य अनुभव असतो. मेलेले शरीर जर पाच-सहा दिवस ठेवता आले, तर त्या शरीराच्या चेहर्यावर दाढी वाढलेली दिसेल. परंतु, योगस्थ समाधी शरीराच्या त्याच अवस्थेत काही वर्षे जरी तसेच राहू दिले, तरी त्या शरीराच्या चेहर्यावर दाढी वाढणार नाही. कारण, ते शरीर काळाच्यावर असते.
असल्या कल्प शरीरात जीवात्मा परत कार्यमग्न झाला की, त्या मृत वाटणार्या शरीराच्या सर्व क्रियाप्रक्रिया आपणहून चालू होतात. यावरून देहाला चालवणारी एक स्वतंत्र अवस्थाशक्ती मानल्याशिवाय वरील प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.असल्या शरीराचे संचालन करणार्या स्वतंत्र चेतनाशक्तीला ‘जीवात्मा’ असे म्हणतात. परंतु, ही जीवात्मा अवस्था जडाची प्रक्रियाशक्ती मानावी तर समाधी अवस्थेत जडशरीर व्यवस्थित असूनही ते रासायनिक क्रिया-प्रक्रिया का करीत नाही? परमेश्वराने हे जीवात्मे उत्पन्न केले काय? अगणित जीवांचे व्यापार चालताना ज्या असंख्य घडामोडी चालत असतात त्या सर्व घडामोडी परमेश्वर चालवितो काय? ते शक्य आहे काय? की त्यात अन्य काही रहस्य आहे? गीता वारंवार सांगते की, हे सर्व जग आपापल्या गुणस्वभावाने चालले आहे, परमेश्वर या सर्व सृष्टीव्यवहाराच्यावर आहे.
मग ही सृष्टी व जीवसृष्टी कशाच्या आधारावर चालू आहे? याबद्दल गीता वर सांगते, ‘संघातः श्चेतना धृतिः’ ओतांचा सापेक्ष संघात (सम+घातः) झाल्यावर त्यातून चेतना उत्पन्न होते आणि चेतना उत्पन्न झाल्यावर आपोआप धृती म्हणजे जीवधारणा अथवा जीवाचा आभास उत्पन्न होतो. जीवसृष्टीची सुरुवात ओतांच्या सापेक्ष गतीने उत्पन्न होते. या सत्यावर यावे लागते. ओतांचे संघातामुळे जी चेतना उत्पन्न होते आणि त्या चेतनेची जी एक सतत धारणाशक्ती उत्पन्न होते, त्या सततच्या धारणाशक्तीला म्हणजे धृतीला ‘जीव’ असे म्हणतात.
ही धृतिशक्ती सतत कायम असून एक शरीर नष्ट झाल्यावर त्याच्या गृहीत संस्कारांना धरून जेथे ते योग्य शरीर असेल तेथे ती धृती अथवा जीवशक्ती आपण होऊन कर्षित केली जाते, जसे सुयोग्य विद्युतभार पृथ्वीतलावर उत्पन्न झाला की, मेघातील विद्युत आपणहून त्या पृथ्वीतलावर कर्षिली जाते. नवीन देहजन्मातील नवीन संस्कार ग्रहण करून ही धृती अथवा जीवशक्ती अधिक पुष्ट बनते आणि अशा तर्हेने तिची धारणाशक्ती वाढून ती उत्क्रांत मार्गाने गमन करते. उन्नत योनीला धरून त्या जीवात्म्यावर उन्नत संस्कार होत होत अखेर तो जीवात्मा अथवा धृतिशक्ती मानव योनीत कर्षण केली जाते.
या सर्व दिव्य अनुभवावरून वरील गुण जीवात्म्याचे मानणे भाग आहे. जीवात्मा अवस्थेवरील व अवस्था संस्कार विरहित असल्यामुळे आत्मावस्था वरील सर्व गुण विरहित असते. म्हणूनच शुद्ध चित्त आत्मावस्थाच जाणू शकते.
योगिराज हरकरे