पाकिस्तानातील महापुराचे थैमान जसजसे ओसरु लागले, तसतसे या महाविनाशाचे व्रण अधिक ठळकपणे दिसू लागले. पाकिस्तानातील जवळपास ८० जिल्ह्यांना या महापुराने पूर्णपणे गिळंकृत केले असून, मृतांची संख्याही १३००च्या वर पोहोचली आहे. १.२ दशलक्ष हेक्टर शेतजमीनही पाण्याखाली गेली असून पाळीव जनावरांच्या मृत्यूमुळे जवळपास करोडोंचे नुकसान झाले आहे. लोकांची घरं अक्षरश: पत्त्यासारखी कोसळून पुरात वाहून गेल्याने कोट्यवधी पाकिस्तानी नागरिक बेघर आहेत, तर काहींची व्यवस्था तात्पुरत्या शिबिरांमध्ये सरकारने केली आहे. पण, अजूनही लाखो नागरिक सरकारी मदतीपासून वंचित असून तेथील महामार्गांच्या दुतर्फा मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.
खरंतर अशा पूर परिस्थितीत जाती, धर्म, पंथभेद विसरून सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनीही एकमेकांना मदतीचा हात देणे हाच खरा मानवता धर्म. सर्व धर्मांची शिकवणही तसेच सांगते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानात अशा भीषण पूरस्थितीतही तेथील हिंदू अल्पसंख्याक बांधवांना सरकारने मुद्दाम मदतीपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर ही बाब बातम्यांच्या माध्यमातून समोर आणणार्या एका पाकिस्तानी पत्रकारालाही पाच दिवसांच्या पोलीस कोठडची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याचे झाले असे की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मिरपूर माथेलो या गावात भाग्री समुदायाचे हिंदू बांधव वास्तव्यास आहेत. पण, तेथील सरकारने मदत शिबिरांमधून या भ्रागी समुदायातील नागरिकांना चक्क पिटाळून लावले. त्या सरकारी यंत्रणांच्या मते, या भाग्री समुदायातील मंडळी हे पूरग्रस्त नाहीत आणि म्हणून त्यांना या निवार्यांची, सरकारी मदतीचीही तसूभरही गरज नाही. यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हिडिओही ‘व्हायरल’ झाले असून त्यातही हे हिंदू बांधव आपली व्यथा कथन करताना दिसतात.
‘’आम्ही हिंदू आहोत, म्हणून आम्हाला मदत नाकारण्यात आली आहे. आमच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा यापैकी कशाचीही मदत करण्यात आलेले नाही. मग आम्ही कुणाकडे मदत मागायची? आमच्या लहान मुलांनी कुठे जायचे?” भाग्री समुदायाचे हे दु:ख मांडणारे पाकिस्तानी पत्रकार नसरल्लाह गद्दानी यांनाही पोलिसांनी अटक केली आणि पाच दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कारण, त्यांचा दोष एवढाच की, भाग्री समुदायाच्या या उत्पीडनाला त्यांनी वाचा फोडली. पण, अखेरीस काफिरांच्या नादी लागून सहानुभूती दाखविल्याप्रकरणी पत्रकारालाच तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली.
एकीकडे पाकिस्तानातील हिंदू बांधवांवर पुराने झोडपले आणि धर्मामुळे झिडकारले अशी विचित्र परिस्थिती ओढावली असताना, पाकिस्तानातील बलुचिस्तानात मात्र हिंदूंनी आपल्या मंदिरात पूरग्रस्तांना निवारा दिल्याचे एक सकारात्मक उदाहरणही समोर आले. बलुुचिस्तानातील कच्ची जिल्ह्यातील जलील खान नामक गावात पुरानेही सर्वकाही उद्ध्वस्त केले. तेव्हा, या गावातील हिंदूंनी बाबा मधुदास मंदिराचे दरवाजे सर्व बांधवांसाठी खुले केले. त्यामुळे एकीकडे पाकिस्तानातील स्थानिक प्रशासन अशा संकटस्थितीतही धर्माच्या नावावरून भेदाभेद करत असताना, दुसरीकडे त्याच देशातील हिंदू बांधवांनी मात्र ‘सेवा परमो धर्म:’ची सनातन धर्माची शिकवण प्रत्यक्षात आणलेली दिसते.
खरंतर पाकिस्तानात हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची मालिका ही फाळणीनंतर आज ७५ वर्षांनंतरही कायम आहे. एका अंदाजानुसार, पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या आता एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६ ते १.८ टक्के इतकीच असल्याचे सांगितले जाते. आजही हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक आपला जीव मुठीत घेऊनच पाकिस्तानात दुय्यम नागरिक म्हणून कसेबसे जीवन जगत आहेत. तेव्हा, पाकिस्तानने यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी केलेल्या सरकारी राष्ट्रगीताच्या व्हिडिओत सर्वधर्म समभावाचे कितीही गोडवे गायले तरी वास्तव हेच की, पाकिस्तानात हिंदू कदापि सुरक्षित नाहीत. तेव्हा, पुरासारख्या भीषण परिस्थितीत तरी पाकिस्तान आणि तेथील प्रशासनाने माणुसकीला काळीमा फासण्याचेच केलेले हे उद्योग सर्वस्वी निंदनीयच म्हणावे लागतील.