मुंबई : तिसऱ्या आणि नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रनदरम्यान केवळ ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी ही माहिती दिली. याशिवाय, फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टीम नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल, असेही ते म्हणाले. भारताची ही सेमी-हाय स्पीड ट्रेन येत्या काही आठवड्यांत अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यासाठी तयार आहे.
९ सप्टेंबर रोजी अहमदाबाद-मुंबई मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. या ट्रेनच्या वेगाचा विक्रम पाहून लोक बुलेट ट्रेनला विसरतील. कारण या ट्रेनने अहमदाबाद ते सुरत हे अंतर अवघ्या २ तास ३२ मिनिटांत पूर्ण केले. ही ट्रेन अहमदाबादहून सकाळी ७:०६ वाजता सुटली आणि सकाळी ९.३८ वाजता सुरत स्थानकात पोहोचली. त्याच वेळी शताब्दी एक्स्प्रेसला ३ तास लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन इथे न थांबता दुपारी १२.१६ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली होती. नवीन वंदे भारत ट्रेनने अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानचे ४९२ किमीचे अंतर कापण्यासाठी फक्त ५ तास १० मिनिटे लागली.
वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाइनमध्ये फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टम आहे, जे ९९टक्के जंतू आणि विषाणू नष्ट करू शकते. वंदे भारत ट्रेनमध्ये विमानाची वैशिष्ट्ये आहेत. या ट्रेनमध्ये एसी, टीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे, हायक्लास पॅन्ट्री आणि वॉशरूम आहेत. वंदे भारत पूर्णपणे मेड इन इंडिया आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
ट्रेनमध्ये सेल्फ-प्रोपेल्ड इंजिन आहे, म्हणजेच वेगळे इंजिन जोडलेले नाही. एक्झिक्युटिव्ह कोच सीट्स १८० डिग्री पर्यंत फिरवता येतात, अगदी व्हिस्टाडोम सीट्स प्रमाणे. नवीन ट्रेनने तिचा दर्जा आणि सवारी निर्देशांक सुधारला आहे. या पॅरामीटर्सवर ट्रेनचा स्कोअर ३.२ आहे, तर जागतिक स्तरावर सर्वोत्तम स्कोअर २.९ आहे. मंत्रालयाला अपेक्षा आहे की ऑक्टोबरपासून वंदे भारत गाड्यांच्या नवीन बॅच प्रत्येक महिन्यात सुरू होतील.