गुरूग्राम : विनोदाच्या नावाखाली हिंदू देवी देवतांवर कायम वादग्रस्त विधाने करणाऱ्या कुणाल कमराचा गुरूग्राम मधील कार्यक्रम आयोजकांकडून रद्द करण्यात आलेला आहे. विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुग्रामच्या उपायुक्तांना पत्र लिहून स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा गुरूग्राममधील आगामी शो रद्द करण्याची मागणी केली होती. कुणाल कामरा त्याच्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवतो. त्यामुळे जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या शोला विरोध झाल्यानंतर, गुरुग्राममधील सेक्टर-२९ च्या स्टुडिओ एक्सओ पब बार मॅनेजमेंटने त्याचा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. "काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे लोक आमच्याकडे आले होते आणि त्यांनी शो रद्द करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर आमच्या व्यवस्थापनाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला", असे स्टुडिओ एक्सओ पब बारचे मॅनेजर साहिल यांनी सांगितले.
कुणाल कामरा स्टुडिओ एक्सओ बार, सेक्टर २९, गुरुग्राम येथे १७ आणि १८ सप्टेंबर रोजी परफॉर्म करणार होता. बारने २९ ऑगस्ट रोजी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर 'कुणाल कामरा लाइव्ह' नावाचे पोस्टर जारी केले ज्यात शोची वेळ आणि तिकिटाचा तपशील नमूद करण्यात आला होता. सदर कार्यक्रम रद्द न केल्यास आम्ही आंदोलन करू असा इशार विहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता.