पोलिसांना मिळणार २० लाखांपर्यंतचे कर्ज! ठाकरेंनी बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु!
01-Sep-2022
Total Views | 155
62
मुंबई : फडणवीस-शिंदे सरकारकडून राज्यातील पोलिसांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या संदर्भातली माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ठाकरे सरकारने त्यांच्या काळात डीजी लोन ही सुविधा बंद केली होती. मात्र फडणवीसांनी ती सुविधा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, "या सुविधेअंतर्गत डीजी लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तेवढा पुरवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज खात्यांतर्गतच मिळेल." यापूर्वी फडणवीस-शिंदे सरकारने बीडीडी चाळीतील पोलीस रहिवाशांना १५ लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डीजी लोन सुविधा सुरु केल्याने राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संजय पांडेंच्या कार्यकाळात ठाकरे सरकारचा योजना थांबवण्याचा निर्णय
डीजी लोन ही राज्याच्या पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यामार्फत २० लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध केलं जातं. अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या कार्यकाळात ठाकरे सरकारकडून ही योजना थांबवण्यात आली होती. मात्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.