मुंबई : 'लाल सिंग चड्ढा' हॉलीवूडचा ऑस्कर विनिंग सिनेमा 'फॉरेस्ट गम्प'चा ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच अनेक नेटकरी विरोध करत आहेत. आमिर खान आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'लाल सिंग चड्ढा' रिलीज होण्यास आता अवघे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. 'बॉयकोट लाल सिंग चड्ढा' हा ट्रेंड सुरु असतानाही या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या सिनेमाची पटकथा प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. एका मुलाखती दरम्यान अतुल कुलकर्णींनी सिनेमाच्या स्क्रीप्टविषयी मोठा खुलासा केला आहे. आमिर खाननं स्क्रिप्ट संदर्भात आपल्याला कसा त्रास दिला याविषयी अतुल स्पष्ट सांगितले आहे.
अभिनेता अतुल कुलकर्णी म्हणाले, ''फॉरेस्ट गम्पच्या अॅडाप्टेशनची सुरुवात २००८ मध्ये आमिर खान प्रॉडक्शनचा सिनेमा 'जाने तू जाने ना' च्या प्रीमियरनंतर झाली. आम्ही सगळेच त्यावेळी सिनेमाच्या प्रीमियरसाठी आमिरखान सोबत होतो. त्याच दरम्यानं आमिरच्या या ड्रीम प्रोजक्टच्या विषयावर चर्चेला सुरुवात झाली. मी आणि आमिरने फॉरेस्ट गम्पचं नाव घेतलं, त्यानंतर लगेचच पुढल्या दिवशी माझ्या घरी या सिनेमाची डिव्हीडी मी पाहिली. माझ्याकडे तेव्हा वेळ होता, मी लगोलग सिनेमा पाहिला आणि लगेचच माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले. या सिनेमात जे दाखवलंय ते जर भारतात घडलं तर ते कशा पद्धतीनं दाखवलं जावं,त्याचे परिणाम कसे होतील. हा सर्व विचार करून मी याच्या पटकथेवर काम करण्याचा विचार केला''.
अतुल कुलकर्णी पुढे म्हणतात की, ''मी १० दिवसांच्या आत स्क्रीप्टचे काम पूर्ण केले आणि पुढील ३ ते ४ दिवसांत मी सेकेंड ड्राफ्ट देखील पूर्ण केला. यामध्ये फारशी अडचण आली नाही कारण खरी अडचण पुढेच होती. मी या स्क्रिप्टसाठी जेव्हा आमिरला संपर्क केला, तेव्हा त्यानं मला स्क्रिप्ट वाचनासाठी वेळच दिला नाही. स्क्रिप्ट वाचायलाच आमिरनं तब्बल २ वर्ष लावली. आम्ही दोघं अनेकदा एकत्र यायचो, भेटायचो. तेव्हा आमिरला विचारलं की तो म्हणायचा, हां,पढते है''.
''काही वर्षानंतर जेव्हा मी आमिरला विचारलं की, 'कधी वाचायची स्क्रिप्ट?'. त्यावर तो मला म्हणाला, 'तू लेखक नाहीस आणि तू मला सांगतोयस की, १५ दिवसांत तू 'फॉरेस्ट गम्प' ची स्क्रिप्ट लिहिलीस. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि तू खूप वाईट स्क्रिप्ट लिहिली आहेस असं बोलून मला तुला नाराज नाही करायचं'. फक्त याच कारणासाठी आमिर स्क्रिप्ट ऐकण्यास तयार नव्हता. पण माझी स्क्रिप्ट तुला आवडली नाही तरी मी नाराज होणार नाही'' असं म्हणत शेवटी अतुल कुलकर्णी यांनी आमिर खानला स्क्रिप्ट ऐकवण्यास तयार केलं होतं.