गृहकर्ज-वाहनकर्ज महागणार : जाणून घ्या! काय आहे नवा रेपो रेट
05-Aug-2022
Total Views | 57
मुंबई : देशातील वाढत्या महागाईवर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरांत वाढच केली आहे. सलग तिसऱ्या तिमाहीतही रिझर्व्ह बँकेकडून आपल्या धोरणात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. आधीच्या रेपो रेट मध्ये तब्बल ५० अंशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ५.४ टक्के इतका नवी रेपो रेट असेल. सगळं तिसऱ्या तिमाहीत रेपो रेट वाढीचे धोरण राबवण्यात आले आहे, गेल्या पतधोरण आढावा बैठकीत ४० अंशांची वाढ करण्यात आली होती.
देशातील ग्राहक किंमत निर्देशांकात सातत्याने होत असलेली वाढ हा अत्यंत चिंतेचा विषय राहिला आहे. महागाईतेही सातत्याने वाढच होत राहिली आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी ही वाढ करणे गरजेचे ठरले आहे असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढतच राहिलेले खनिज तेलाचे दर हा अजूनही चिंतेचे कारण आहे. सध्या तरी खनिज तेलांच्या किंमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. तसेच भारतात सध्या वर्तवण्यात आलेला चांगल्या मान्सूनचा अंदाज याही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. पुढील गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि परिस्थिती पाहून आम्ही निर्णय देऊ अशी प्रतिक्रिया शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
वाढत्या रेपो दरांमुळे सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत, गृहकर्ज, वाहनकर्ज यांच्या व्याजदरांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोना तडाख्यातून सावरत असलेल्या या दोन्ही क्षेत्रांसाठी हा धक्काच आहे. व्याजदरांमधील वाढ ही निवृत्ती वेतन तसेच बँकेतील ठेवींवर अवलंबून असलेल्या म्हणजे प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांना जाचक ठरते कारण त्यांच्या ठेवींवरील व्याजदरांमध्येही कपातच केली जाते. त्यामुळे त्यांना या रेपो रेट वाढीचा फाटकाच बसणार आहे. तरीही येत्या खरीप हंगामात चांगले उत्पादन येण्याच्या शक्यतांनी बाजरात पुन्हा एकदा आशेचा किरण आहे.
जागतिक पातळीवरील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये व्याजदर वाढीची लाट आलेली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हनेही त्यांच्या व्याजदरांत वाढ केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही या परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनेही व्याजदर वाढीचाच मार्ग अवलंबला आहे. आधीच मंदीच्या सावटाखाली जागतिक अर्थव्यवस्था असताना हा व्याजदरवाढीने अजून एक झटका बसणार आहे अशीच भावना आहे.