मुंबई :"ईडीच्या कोठडीतून लवकर जामीन मिळत नाही, त्यांच्या कायद्यातच तशी तरतूद आहे" असे सूचक विधान करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राऊतांची अटक लांबणार असेच अप्रत्यक्षरित्या ध्वनित केले. ईडीने कोर्टकडे इतर आरोपींच्या चौकशीसाठी, अजून पुरावे गोळा करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे असे मी ऐकले बाकी काही मला माहित नाही असे म्हणत सरळ सरळ विषयाचा सांधाच भुजबळांनी बदलला. माझ्या संजय राऊतांना शुभेच्छा असेही भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीकडून या कायद्याच्या विरोधात प्रश्न विचारले गेले आहेत आणि यापुढेही विचारतील असेही भुजबळ यांनी सांगितले.
या कायद्याबद्दल अजून काय बोलणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी आमची या कायद्याबद्दल अवस्था आहे. युपीए सरकारच्या काळात त्यावेळचे गृहमंत्री आणि कायदेतज्ञ पी. चिदंबरम यांनीच हा कायदा आणला आहे त्यामुळे आम्ही भाजपला तरी कसा दोष देणार? असा सवाल करत संजय राऊत यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा निषेध करणे टाळले, तरी विरोधीपक्ष हा कायदा वाजवीपेक्षा जास्तच जाचक आहे, यातील काही तरतुदी कमी कराव्यात यासाठी मागणी करत आहेत तेही आपण लक्षात घेतले पाहिजे अशी पुष्टीही भुजबळांनी त्यांच्या विधानाला जोडली.
सध्या राज्यात मराठवाडा, विदर्भ यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतजमिनींचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके आडवी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि त्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. तसे निवेदनही त्यांना देण्यात आले आहे. असे भुजबळांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होणाऱ्या आरक्षणाबाबत जो निर्णय झाला आहे त्याचा पुनर्विचार व्हावा अशी मागणीही भुजबळांनी यावेळी केली आहे.