जनरल बाजवांचा उत्तराधिकारी कोण?

Total Views |


ret

 
 
शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये सत्ताधार्‍यांइतकेच आणि क्वचितप्रसंगी त्याहूनही शक्तिशाली सत्ताकेंद्र म्हणजे पाकिस्तानी लष्कर. त्यामुळे पाकिस्तानचा लष्करप्रमुख कोण होणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून असते. कारण, या देशावर फाळणीनंतर बहुतांशी काळ लष्करप्रमुखांनीच राज्य केले. तेव्हा, विद्यमान लष्करप्रमुख जनरल बाजवा येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती पत्करणार असून त्यांचा उत्तराधिकारी कोण, यावर सध्या पाकिस्तानात चर्चा रंगली आहे. त्याविषयी...
 
 
पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा वाढीव कार्यकाळ संपुष्टात येत असताना, पाकिस्तानातील ज्येष्ठ राजकारण्यांकडून नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीबाबतची विधाने सध्या देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. विशेष म्हणजे, जनरल बाजवा यांनी आणखी एका मुदतवाढीची मागणी करण्यास कोणतेही स्वारस्य दाखवलेले नाही. पाकिस्तानी लष्कराची माध्यम आणि जनसंपर्क विभागाची शाखा असलेल्या ‘आयएसपीआर’ने सुद्धा बाजवांच्या सेवाविस्ताराची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या निवेदनानुसार, जनरल बाजवा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या वर्षी दि. २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
 
 
अशा स्थितीत देशातील पुढील लष्करप्रमुख कोण, याबाबत पाकिस्तानमध्ये चर्चांना उधाण आले आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांची हकालपट्टी केल्यापासून राजकीय वर्तुळात राजकीय नेतृत्व आणि लष्कर यांच्यातील तणावामुळे अनेक राजकारण्यांनी या प्रकरणावर अगदी उघड उघड विधाने केलेली दिसतात. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरीफ अल्वी तसेच ‘पीपीपी’चे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि ‘पीएमएल-एन’च्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांनी अलीकडेच नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबत थेट भाष्य केले आहे.
 
 
उल्लेखनीय बाब म्हणजे, जनरल बाजवा दि. २९ नोव्हेंबर रोजी लष्करप्रमुख म्हणून तीन वर्षांच्या मुदतवाढीनंतर अखेरीस निवृत्त होणार आहेत. ६१ वर्षीय जनरल बाजवा यांची तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २०१६ मध्ये लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.
 
 
पाकिस्तानच्या सामरिक वर्तुळापासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत, जनरल बाजवा यांचा संभाव्य उत्तराधिकारी कोण, याचे अंदाज वर्तविले जात आहेत आणि सर्वोच्च दावेदारांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ आणि प्रभावशाली जनरल्सचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्या लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा, अझहर अब्बास, नौमान महमूद राजा आणि फैज हमीद हे या पदासाठी काही प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
 
 
लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्याबद्दल सांगायचे तर, बाजवा यांच्या निवृत्तीनंतर ते पाकिस्तानी लष्करातील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी असतील. सप्टेंबर २०२१ पासून मिर्झा रावळपिंडीमधील ‘कॉर्प्स एक्स’चे कमांडर आहेत, जे पाकिस्तानी सैन्याचे सर्वात प्रमुख ‘स्ट्राईक कॉर्प्स’ मानले जातात आणि याच कॉर्प्सने जनरल अशफाक परवेझ कयानी आणि जनरल बाजवा यांच्या रूपाने पाकिस्तानला लष्करप्रमुख दिले आहेत. जनरल मिर्झा यांना १९८७ मध्ये ‘सिंध रेजिमेंट’च्या आठव्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी नोव्हेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘जीएचक्यू’मध्ये ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ (सीजीएस) आणि सप्टेंबर २०१५ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत ‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स’ (डीजीएमओ) अशा काही प्रमुख पदांवर काम केले आहे.
 
 
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदासाठी दुसरे सर्वात मोठे दावेदार लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास आहेत, जे सध्या ‘जीएचक्यू’मध्ये ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ (सीजीएस) म्हणून कार्यरत आहेत. ‘बलुच रेजिमेंट’च्या ४१व्या बटालियनमध्ये नियुक्त झालेले अब्बास हे जनरल बाजवा यांच्या मूळ रेजिमेंटमधील आहेत. त्यांनी क्वेटा येथील ‘इन्फंट्री स्कूल’चे ‘कमांडंट’ म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर २०१३ ते नोव्हेंबर २०१६ या काळात लष्करप्रमुख राहिलेल्या जनरल राहील शरीफ यांचे ते स्वीय सचिवही होते. लेफ्टनंट जनरल अब्बास यांनी मुरी येथे ‘१२ इन्फंट्री डिव्हिजन’चे नेतृत्व केले आहे आणि संयुक्त कर्मचारी मुख्यालयाचे महासंचालक म्हणून कार्याव्यतिरिक्त संचालन संचालनालयात ब्रिगेडियर म्हणूनही काम केले आहे.
 
 
सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ते ‘एक्स कॉर्प्स’चे कमांडर होते. आधी सांगितल्याप्रमाणे, ‘एक्स कॉर्प्स’चे पाकिस्तानी सैन्यात एक प्रमुख स्थान आहे. कारण, ही तुकडी भारतासोबतच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षेसाठी जबाबदार आहे आणि अशा या महत्त्वाच्या तुकडीचे प्रमुख असणे ही कोणत्याही ‘कॉर्प्स’ कमांडरसाठी निश्चितच अतिरिक्त पात्रता मानली जाते.
पाकिस्तानी माध्यमांमध्ये लेफ्टनंट जनरल नौमान महमूद राजा यांचीही या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. लेफ्टनंट जनरल राजा हे नोव्हेंबर २०२१ पासून राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ (एनडीयू)चेअध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. १९८७ मध्ये ‘बलुच रेजिमेंट’मध्ये ‘लेफ्टनंट’ म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
 
 
लेफ्टनंट जनरल राजा यांनी पेशावरमधील ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) येथे कॉर्प्स कमांडर, महासंचालक आणि विश्लेषण विभागाचे महानिरीक्षक म्हणून काम केले आहे. ते मिरनशाह येथे ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग’ (जीओसी) देखील राहिले आहेत. परंतु, त्यांची सध्याची पोस्टिंग लक्षात घेता, त्यांना लष्करप्रमुख म्हणून बढती मिळण्याची शक्यता तशी धुसरच. त्यामुळे एका प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुखाची देशाच्या लष्करप्रमुखपदी वर्णी लावणे, हे त्या पदासाठीच्या उपयुक्त दावेदारांच्या पात्रतेपैकी महत्त्वाचा असा निकष नक्कीच नाही.
 
 
लष्करप्रमुखपदासाठी आणखीन एक चर्चेतील चेहरा म्हणजे, लेफ्टनंट जनरल फैज हमीद, जे खासकरून इमरान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या पदाचे सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. जनरल फैज पेशावरमध्ये ’दख कॉर्प्स‘चे कमांडर म्हणून कार्यरत आहेत. जून २०१९ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत ‘आयएसआय’चे महासंचालक म्हणून फैज यांनी सत्ता आणि सैन्यातदेखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘बलुच रेजिमेंट’चे हमीद हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे.
 
 
ऑक्टोबर २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता ताब्यात घेतल्यानंतर, त्यांना ‘आयएसआय’च्या महासंचालक पदावरून हटवून त्यांच्याकडे ’दख कॉर्प्स’चा प्रभार देण्यात आला. असे म्हटले जाते की, भविष्यात लष्करप्रमुख होण्यासाठी ‘कॉर्प्स कमांडर’च्या पदाची आवश्यक पात्रता पूर्ण करण्यासाठीच इमरान खान यांनी फैज यांना हे महत्त्वपूर्ण पद दिले होते.
पुढचे नाव म्हणजे लेफ्टनंट जनरल हमीद, ज्यांना ‘आयएसआय’मध्ये अंतर्गत सुरक्षा महासंचालक म्हणूनही कामाचा दांडगा अनुभव आहे.
 
 
पण, नेमके याचमुळे त्यांचे जनरल बाजवांसोबतचे संबंध ताणले गेले होते. पण, हेही खरे आहे की, जनरल बाजवा यांच्याशी त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम वैयक्तिक संबंधही आहेत. ब्रिगेडियर म्हणून लेफ्टनंट जनरल हमीद यांनी जनरल बाजवा यांच्या हाताखाली‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणूनही काम केले आहे, जे त्यावेळी रावळपिंडीतील ‘एक्स कॉर्प्स’चे कमांडर होते. परंतु, सद्यःस्थितीत इमरान खान यांच्या गोटातील असल्यामुळे पाकिस्तानमधील विद्यमान सत्ताधार्‍यांकडून हमीद यांना डच्चू मिळण्याचीच शक्यता जास्त आहे.
 
 
तसे पाहायला गेले, तर पाकिस्तानी लष्करप्रमुख होण्यासाठी कोणतेही प्रस्थापित मानक नाही. जनरल अयुब खान यांच्यापासून ते आतापर्यंतच्या लष्करप्रमुखपदावरील नियुक्त्या पाहिल्या की बाब अगदी स्पष्ट होते. या सगळ्या बाबतीत ज्येष्ठता, गुणवत्ता यांचे स्थान अगदी तळाला आहे. पंजाब प्रातांशी संबंध, प्रभावशाली कुटुंब, सखोल राजकीय संपर्क, धार्मिक दृष्टिकोन यांसारखे अनेक घटक पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे साहजिकच एकूणच कारभारात पाकिस्तानी लष्कराला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
 
 
म्हणूनच सैन्याचे व्यावसायिक हितसंबंध आणि क्षमतेवर दिसून येतो. सध्या लष्करप्रमुखाची निवड पूर्वीप्रमाणेच होणार असून, त्यात सत्ताधारी पक्षाशी असलेले नाते आणि निष्ठा या बाबी आपसुकच ‘महत्त्वाची पात्रता’ ठरणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवाराला एकेकाळी सर्वात योग्य मानले गेले होते, तो त्याची पात्रता गमावू शकतो, तर एखादे अज्ञात नाव ‘छुपा रस्तम’ सिद्ध होऊ शकते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत राजकीय समीकरणे कोणत्या बाजूने वळतात, यावरच सर्वस्वी पाकिस्तानातील लष्करप्रमुखाचे भवितव्य ठरेल, हे निश्चित!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

संतोष कुमार वर्मा

संतोष कुमार वर्मा हे पीएचडी करत असून सध्या पाकिस्तान मीडिया स्कॅन या मासिकाचे सह संपादक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय विषयांवर विविध दैनिकातून लिखाण करत असतात.