मुंबई: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. पिंगोरी हे गाव पुरंदर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे. सोमवारी दि.१ ऑगस्ट रोजी रात्री हा बिबट्या रस्त्यावरुन जाताना गावकऱ्याने पहिला. माणसाला पाहून हा बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झाडीत जाऊन बसला. आतापर्यंत बिबट्यान कोणावरही हल्ला केलेला नाही.
वन विभागाला या बाबतची माहिती मिळताच, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन, लोकांची विचारपूस केली. तसेच, काही अनुचित घडू नये यासाठी, वन विभागाने, लोकांना व्हीडीओ दाखवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र या गावात अजूनही मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे जरी कोणता आपत्कालीन प्रसंग आला तर मोबाईलला रेंज नसल्याने गावकऱ्यांनी संपर्क कोणाला करायचा, असा प्रश्न निर्माण होतो.
फोन असतो पण मोबाईलला रेंज नसल्या कारणाने फोन असून पण उपयोग होत नाही, अशी स्थिती गावकऱ्यांची आहे. गावकऱ्यांनी गावात टॉवर लावावा अशी मागणी केली मात्र प्रशासनाने टॉवरची सोय केली नसल्याचे गावकरी सांगतात. लोकांनी काळजी घ्यावी आणि बिबट्याला डिवचण्याचा पर्यंत करू नये. तसेच बिबट्या विषयक दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे वनविभागाकडून गावकर्यांना सांगण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास गावकऱ्यांनी तात्काळ माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी केले आहे.