मुंबई : घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही, त्यामुळे ते सरकार गेले ही गणरायाची कृपाच आहे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच खरी गद्दारी केली आहे अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले. शिवाजीपार्कवर होणारी उद्धव ठाकरेंची सभा ही काहीच कामाची नाही कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, यामुळे कुठूनतरी पडकून, पैसे देऊन लोक जमवायचे आणि त्यांच्यासमोर सभा घ्यायची हीच उद्धव ठाकरेंची रीत आहे त्यामुळे त्यांच्या या सभेचा काहीच फायदा नाही अशी बोचरी टीका राणेंनी केली.
फक्त सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्या भाजपच्या सहकार्याने आपले आमदार शिवसेनेने निवडून आणले त्याच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सत्ता मिळवली ही गद्दारी उद्धव ठाकरेंनीच केली आहे. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार, विकासाच्या बाजूने असलेले सरकार आले आहे, खरी शिवसेना आता आमच्या सोबत आहे ही गणरायाची कृपाच आहे की राज्याच्या विकासाच्या विरोधातील सरकार पडले आहे आणि जनतेचे सरकार सत्तेवर आले आहे. अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
ठाकरे सरकारची एक पद्धत होती. नवीन प्रकल्प सुरु करायचे मध्येच बंद पाडायचे आणि त्यातून पैसे खाऊन झाले की ते प्रकल्प सुरु करायचे याच नीतीने ते काम करत होते. पण आता भाजप आणि शिवसेनेचे हे राज्यातले सरकार जनतेच्या आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल याची चुणूक त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्प मार्गी लावून वळवली आहे असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.