६ महिन्यांनंतरही युक्रेन युद्धाची अनिर्णित अवस्था कायम

    30-Aug-2022   
Total Views |
 
russia
 
 
 
रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या लष्करी ताकदीच्या अवास्तव कल्पना उघड्या पडल्या आहेत. रशियाचे सैन्य कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युरोपीय महासंघाकडून युक्रेनला होणारी मदत बंद करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमधील एकी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी रशियाने नैसर्गिक वायू आणि तेलाचे शस्त्र उगारले आहे.
 
 
युक्रेनमधील युद्धाला नुकतेच सहा महिने पूर्ण होत असताना युक्रेनियन सैन्य रशियाने बळकावलेला आपला प्रदेश मुक्त करण्यासाठी सज्ज झाले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा रशिया अगदी सहजपणे युक्रेन ताब्यात घेईल, असा अंदाज होता. लष्करीदृष्ट्या रशिया आणि युक्रेनची तुलना होऊ शकत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या अनेक शतकं युक्रेन रशियन साम्राज्याचा आणि त्यानंतर सोव्हिएत रशियाचा भाग होता. युक्रेनमध्ये वंशाने तसेच भाषिकदृष्ट्या रशियन लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
 
युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की राजकारणात येण्यापूर्वी टीव्हीवरील विनोदवीर होते. युद्ध सुरू झाल्यास ते पळ काढून अमेरिकेत आश्रय घेतील, ही शक्यता खोटी ठरली. झेलेन्स्की राजधानी कीवमध्येच ठाण मांडून बसले. सुरुवातीला युक्रेनवर चहुबाजूंनी आक्रमण करून राजधानी कीव ताब्यात घ्यायची रशियाची योजना फसली. या युद्धापूर्वी युक्रेनचा १७ हजार चौ.मैल भूप्रदेश रशियाच्या ताब्यात होता. आता त्याच्या तिप्पट म्हणजे सुमारे ४७ हजार चौ. मैल भूप्रदेश रशियाच्या ताब्यात आहे, असे असले तरी या युद्धातील सर्वोच्च बिंदूपासून रशियाला सुमारे १७ हजार चौ. मैल भूप्रदेशावरील नियंत्रण गमवावे लागले आहे.
  
गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनचे सैन्य अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांकडून मिळालेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे रशियाने बळकावलेल्या प्रदेशावरील सैनिकी तळ तसेच दारूगोळ्याच्या कोठारांवर हल्ले करत आहे. या युद्धात दोन्ही बाजूंकडचे हजारो सैनिक मारले गेले असून, युक्रेनमधील नागरिकही मोठ्या संख्येने मारले गेले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनच्या सुमारे ६७ लाख लोकांनी देश सोडला असून सुमारे ६६ लाख लोक देशांतर्गत विस्थापित झाले आहेत. सुमारे पाच लाख युक्रेनियन मुलं युरोपातील कोणत्या तरी देशामध्ये शिकत आहेत.
 
 
मध्यंतरीच्या काळात युक्रेनमधील गव्हाच्या निर्यातीबाबत रशिया आणि युक्रेनमध्ये करार झाला असला तरी युक्रेनमधील गव्हाच्या निर्यातील ४० टक्क्यांची घट झाली आहे. युद्धामुळे युक्रेनमधील पोलाद उद्योगावरही मोठा परिणाम झाला असून या वर्षी युक्रेनची अर्थव्यवस्था सुमारे निम्याने आकुंचन पावेल, असा अंदाज आहे. या युद्धात नुकताच डिनिप्रो नदीच्या किनारी असलेला झापोर्झ्झिया अणुऊर्जाप्रकल्प लक्ष्य करण्यात आला. हा प्रकल्प युरोपमधील सर्वात मोठा विद्युतनिर्मिती प्रकल्प असून, रशियाने युद्धाच्या सुरुवातीलाच हा प्रकल्प ताब्यात घेतला. या प्रकल्पात काम करणारे कर्मचारी युक्रेनियन असून बंदुकीच्या धाकावर ते काम करत आहेत. प्रकल्पापासून अवघ्या दहा किमी अंतरावर असलेले निकोपोल हे शहर युक्रेनच्या ताब्यात असून त्यावर रशियाच्या तोफखान्याद्वारे हल्ला करण्यात येत आहे. युक्रेनने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात ‘अणुऊर्जा प्रकल्पा’चे नुकसान झाले. मानवी चुकीमुळे जर या प्रकल्पात एखादा अपघात झाला, तर त्याची किंमत युक्रेन, रशिया आणि सभोवतालच्या देशांना चुकवावी लागेल.
 
दि. २० ऑगस्टला मॉस्कोजवळ एका घातपाती हल्ल्यामध्ये रशियातील समाजमाध्यमांत आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारधारेसाठी प्रसिद्ध दारिया दुगिन यांची हत्या करण्यात आली. दारियाचे वडील अलेक्झांडर दुगिन हे रशियातील राष्ट्रवादी विचारधारेच्या अग्रगण्य चिंतकांपैकी एक असून अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर दुगिन यांचा प्रचंड प्रभाव असल्याचे मानण्यात येते. गेल्या अनेक दशकांपासून दुगिन साम्यवादाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. ते रशियन साम्राज्यवादाचे समर्थक राहिले आहेत. मध्य युरोप आणि अशियातील प्रचंड मोठ्या प्रदेशावर रशियाचा ऐतिहासिक अधिकार असून, युक्रेन हा रशियाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन दुगिन अनेक वर्षांपासून करत आहेत.
 
 
दुगिन यांचे पुतीन यांना समर्थन असले तरी वेळोवेळी व्लादिमीर पुतीन यांनी अधिक आक्रमकपणे वागायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुगिन यांचे म्हणणे आहे की, युरेशियन प्रदेशावरील रशियन साम्राज्यापुढे अटलांटिक महासागरावरील अमेरिकेचे आव्हान आहे. दुगिन यांच्या मते, अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन हे सर्व ‘अँग्लोसॅक्सन’ साम्राज्याचा भाग आहेत. दुगिन यांच्या प्रभावामुळे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असल्याचे मानण्यात येते. दारिया दुगिन यांचे वय अवघे 29 वर्षं असले, तरी त्या समाजमाध्यमांवर चांगल्याच लोकप्रिय होत्या.
 
 
अमेरिकेने निर्बंध घातलेल्या प्रभावशाली रशियन नागरिकांमध्ये त्यांचा समावेश होता. प्रत्यक्षात दारिया आणि त्यांचे वडील अलेक्झांडर एकाच गाडीने प्रवास करणार होते. पण, आयत्या वेळेस अलेक्झांडर पाठच्या गाडीत बसल्याने त्यांचा जीव वाचला. व्लादिमीर पुतीन यांनी रशियावरील सत्तेवर पकड घेतल्यापासून रशियामधील दहशतवादी हल्ले जवळपास थांबले आहेत. त्यामुळे राजधानी मॉस्कोजवळ अशा प्रकारचा हल्ला झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. रशियन सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार, एक युक्रेनियन स्त्री गाडीने सीमा पार करून युक्रेनमधून रशियात शिरली आणि हा हल्ला झाल्यानंतर त्याच गाडीने पण गाडीची नंबर प्लेट बदलून इस्टोनियाला गेली. या हल्ल्याला युक्रेन जबाबदार असून त्यासाठी त्याला धडा शिकवायला हवा, अशी रशियात लोकभावना आहे.
 
 
 
रशियासाठी हे युद्ध आत्मसन्मानाचा विषय बनला आहे. युद्धात निर्णायक विजय मिळणे अशक्य असल्याने कृषी आणि औद्योगिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या युक्रेनच्या पूर्व भागाचा लचका तोडून तेथील लोकांना रशियाचे नागरिकत्व द्यायचे, तिथे बळजबरीने सार्वमत घेऊन या भागातील लोकांचा रशियात सामील होण्याची इच्छा आहे, असा बनाव रचून नैतिकदृष्ट्या स्वतःचा विजय घोषित करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. त्यासाठी रशियाने १ लाख, ३७ हजार नवीन सैनिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे सैनिक रशियाच्या दारुगोळ्याची कोठारे आणि लष्करी छावण्यांवर तोफा आणि ड्रोनद्वारे हल्ले करत असले तरी प्रत्यक्ष लढाईत हा प्रदेश ताब्यात घेण्याइतकी ताकद त्यांच्यात नाही. या युद्धात रशियाचा स्वाभिमान दुखावला गेल्यास त्याच्याकडून संहारक शस्त्रांचा वापर करण्यात येईल, अशी भीती असल्यामुळे युक्रेनला या चौकटीत राहूनच प्रतिहल्ले करावे लागत आहेत.
 
या युद्धात रशियाच्या लष्करी ताकदीच्या अवास्तव कल्पना उघड्या पडल्या आहेत. रशियाचे सैन्य कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युरोपीय महासंघाकडून युक्रेनला होणारी मदत बंद करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमधील एकी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी रशियाने नैसर्गिक वायू आणि तेलाचे शस्त्र उगारले आहे. रशियाने तेल आणि वायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी केल्यामुळे युरोपमध्ये इंधन आणि विजेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अन्नधान्याच्या टंचाईमुळे महागाई दर दोन आकडी घरात गेला आहे. त्यातूनच या वर्षी उन्हाळ्याने विक्रम केला असून अनेक देशांत तापमान 40 अंश सेल्सियसच्या वरती पोहोचल्याने युरोपातील अनेक देशांनी ‘एअर कंडिशनर’च्या वापरावर मर्यादा आणली, असे असले तरी आजवर युरोपीय देशांमधील एकी कायम राहिली आहे. चीन आणि भारत यांनी या युद्धात तटस्थता राखली असली तरी त्यांच्या अर्थव्यवस्थाही या युद्धामुळे प्रभावित झाल्या आहेत. आज हे युद्ध अनिर्णित अवस्थेकडे झुकले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.