‘चतुरंग’ची सांगीतिक व शैक्षणिक तपस्येची वाटचाल

    03-Aug-2022   
Total Views |

pg8

संगीत, नाट्य आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या संस्थेमध्ये एक अग्रगण्य नाव पुढे येते ते म्हणजे ‘चतुरंग प्रतिष्ठान.’ तब्बल 48 वर्षे म्हणजेच ‘चार तपा’ च्या प्रवासात या संस्थेने भरीव असे काम करून स्वत:ची एक वेगळी नाममुद्रा उमटवली आहे. ‘चतुरंग’ म्हणजे काय, असं कुणी विचारलं, तर नेमकं काय सांगायचं, असा प्रश्न केवळ इतरांनाच नव्हे तर कधी कधी खुद्द ‘चतुरंग’लाही पडतो. ‘चतुरंग’ ही केवळ एक संस्था नसून ती एक वृत्ती आहे. ‘चतुरंगा’च्या या चार तपाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया. ‘चतुरंग’ म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी, जाणून घेणार्‍यांसाठी संस्थेच्या वाटचालीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप.
 
 
चतुरंग प्रतिष्ठान’ची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २४ एप्रिल, १९७४ ला झाली. चौघांनी एकत्रित येत ‘चतुरंग’ची स्थापना केली. आजच्या घडीला १८ ते ८० वयोगटातील सुमारे १५० कार्यकर्ते कार्यरत आहेत. ‘चतुरंग’ची पहिली शाखा गिरगावात सुरू झाली. ९ ऑगस्ट, १९८६ ला डोंबिवली दुसरे केंद्र सुरू झाले. सध्या पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा येथे ही केंद्र आहेत. काळाच्या ओघात ‘चतुरंग’चे ‘चतुरंग प्रतिष्ठान’असे रुपांतर झाले. ‘काम करेल तो कार्यकर्ता’ हे बिरूद घेऊन ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा प्रवास सुरू आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’ म्हणजे एक वृत्ती आहे, असे म्हटलं जाते.
 
 
मग ही वृत्ती नेमकी काय आहे, याचा विचार केला तर सर्वांनी सातत्याने एकत्रित यावे, चांगल्या गोष्टींचा एकत्रितपणे आस्वाद घ्यावा. कलानंद घ्यावा. आपणचं घ्यावा, असे नव्हे तर इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे. ‘चतुरंग’चे विचार पटलेले टिकले, न पटलेले दूर गेले. पण संख्यात्मक आणि गुणात्मक संस्था-आलेख चढताच राहिला. ‘चतुरंग’चे कार्य आणि विचारसरणी पटणारी काही उद्योगपती, कलावंत, विचारवंत, साहित्यिक मंडळी ही संस्थेची हिंतचिंतक, मार्गदर्शक, सल्लागार आणि सहकारी या विविध भूूमिकेतून संस्थेला लाभत राहिली आणि असे सारेच जण ‘चतुरंग प्रतिष्ठान’चे बलस्थान ठरले.
 
 
‘चतुरंग’च्या सातत्यपूर्ण वाटचालीत कल्पकता, नेटके आयोजन आणि शिस्त या तीन गोष्टींचा वाटा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. या गोष्टींचे श्रेय ‘चतुरंग’चे मास्तर गणेश सोळंकी यांनाच द्यावे लागेल. सुरुवातीलाच ते कानमंत्र देऊन गेले. सतत नावीन्याची कास धरा. मळलेल्या वाटेने जाऊ नका. स्वत:ची पायवाट स्वत:च तयार करा,त्याचा हमरस्ता झालाच तर तो इतरांकडून होऊ द्या, असेच त्यांनी सांगितले होते.
 
 
आता अनेक ठिकाणी अनेकांकडून साजर्‍या होणार्‍या दिवाळी पहाट, कलाकरांच्या मुलाखतीचे वा कलावंत दरबारासारखे कार्यक्रम, कलावंताच्यासह होणार्‍या वर्षा सहली अथवा ‘चतुरंग’च्या ’जीवनगौरव पुरस्कारा’चे अनुकरण म्हणजे ‘चतुरंग’च्या पायवाटेचा हमरस्ता झाल्याचे असेच म्हणावे लागेल. संस्थेचे कार्यकर्ते शिस्तीचा धडा स्वत:पासून गिरवितात. संस्थेच्या सशुल्क कार्यक्रमाचा मोफत पास घेत नाहीत. निश्चित केलेला गणवेशही स्वत:च्या खर्चाने शिवतात. समानतेचे तत्त्व पाळणार्‍या ’चतुरंग’मध्ये कुणालाही कोणत्याही पदाची बिरुदावली नाही. कार्यातून मिळणार्‍या समाधानामुळे कार्यकर्ते संस्थेकडे आकृष्ट होतात.
 
 
अशा प्रकारचे कार्यकर्ते हेच चतुरंगचे फार मोठे संचित आहे. ‘चतुरंग’च्या वाटचालीत सातत्य ही गोष्टष्स्देखील तितकीच महत्त्वाची ठरली आहे. गेल्या ४८ वर्षांतील वैविध्यपूर्ण उपक्रमांचा प्रवास अखंडितपणे सुरू आहे.
 
 
‘चतुरंग’ ही सरकार दरबारी नोंदणीकृत संस्था आहे. विश्वस्त संस्थेच्या कारभाराची काळजी वाहतात. ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या पूर्ण क्षमतेने संस्थेला प्रगतिपथाकडे नेत असतात. नियमित, उत्साही आणि उत्सवी अशा सर्वप्रकारचे कार्यकर्ते आपापल्या आवडी व क्षमतेनुसार त्यात मोलाची भर घालत असतात. होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर प्रथम सर्वामध्ये चर्चा होते. त्याचे नियोजन केले जाते आणि कार्यक्रमोत्तर सिंहावलोकन ही केले जाते. कौतुकाचा आणि तुटींचा टाळेबंद मांडला जातो.
कौतुक झाले, तरी त्याला विस्मरणात टाकून चुकांची मात्र काळजीपूर्वक दखल घेतली जाते. मिळालेले यश हा केवळ एक अपघात आहे, असे मानून अधिक यशासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेला कोणतेही सरकारी आर्थिक अनुदान मिळत नाही. संस्थेकडून स्वत:च्याच सांस्कृतिक कार्यक्रमातून उभारलेल्या निधीचा विनियोग शैक्षणिक, सामाजिक उद्दिष्टांसाठी केला जातो.
 
 
‘चतुरंग प्रतिष्ठान’चा आजवरचा सांगीतिक प्रवास पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचाही समावेश राहिला आहे. गीतकार, संगीतकार आणि गायक यांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरुवातीच्या काळात त्रिवेणी संगीत स्पर्धा, सवाई एकांकिकांसह ‘एक कलाकार-एक संध्याकाळ’, ‘चैत्रपालवी’, ‘मुक्तसंध्या’, दोन दिवसीय रंगसंमेलन, ‘जीवनगौरव पुरस्कार’ आदी उपक्रम आजवर राबविले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत अनेक संस्थांनी ‘जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत. मात्र, या पुरस्काराबरोबरच ‘दिवाळी पहाट’चा पायंडादेखील ‘चतुरंग प्रतिष्ठा’ने पाडला.
 
 
‘चतुरंग’ने आपल्या अक्षय तृतीयेच्या वर्धापन दिनाच्या आनंदात रसिकांनाही सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने १९९५ पासून अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित ‘चैत्रपालवी संगीतोत्सवा’ला सुरुवात केली आहे. उदयोनमुख गुणी कलाकाराला चोखंदळ रसिकांचे दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच एखाद-दुसर्‍या बुजुर्ग संगीत साधकाला ‘चतुरंग संगीत सन्मान’, तर शास्त्रीय संगीत हेच आयुष्य ध्येय मानून संगीताची आराधना करणार्‍या युवा कलाकाराला ‘चतुरंग संगीत शिष्यवृत्ती’ने २००७ पासून गौरविण्यात येते. यंदा दि. ३ मेच्या अक्षय तृतीयेला ‘चतुरंग’ने स्थापनेची ४८ वर्षे पूर्ण करून ४९व्या वर्षात पदार्पण केले, ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल इतरांसाठी ही आदर्शवत अशी आहे.
 
 
अनेक वर्षांपासून कोकणातील शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. दहावीतील हुशार तसेच अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे निवासी स्वरूपाचे अभ्यासवर्ग चालतात. याव्यतिरिक्त शाळा साहाय्य योजना, नाताळ अभ्यासक्रम, व्यवसाय मार्गदर्शन, कपडे-दूध वाटप योजना, निर्धार वर्ग चालविले जातात. यातून सक्षम विद्यार्थी घडविताना सक्षम शिक्षक तयार झाले पाहिजेत, या उद्देशाने पुण्याच्या ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या सहयोगाने ‘शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग’ आयोजित केले जात आहेत.
 
 
संस्थेने जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या अशा कार्यपद्धतीमुळे कविवर्य कुसुमाग्रजांनी ही संस्थेचे कौतुक केले आहे. कुसुमाग्रजांनी संस्थेविषयी बोलताना “ ‘चतुरंग संस्थे’चे ‘संस्थान’ झालेले नाही आणि खुर्च्यांची सिंहासने झालेली नाहीत. संस्था आज उत्तमरीत्या कार्यरत आहे. प्रगतिपथावर आहे. ‘चतुरंग’च्या कसदार बीजातून अंकुरलेल्या ‘चतुरंग’ वृत्तीचा हा विजय आहे. ” आज ‘चतुरंग’चे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या जराशा मोठ्या झाडात रुपांतर झालंय. मात्र, ‘चतुरंग’ला वृक्षाकडे वटवृक्षाकडे वाटचाल करायची आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.