नवी दिल्ली : देशभर कॉंंग्रेसची वाताहत सुरु असताना गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या जेष्ठनेत्याने कॉंग्रेसला राम राम ठोकून पक्षाचा त्याग केला. माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रसकडून आपल्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार घेत, "राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी आम्ही प्रयत्न केले, पण ते ऐकतचं नाहीत. त्यांना पक्षात रसच नाही, ते एका जागी बसतच नाहीत!", असे वक्तव्य आजाद यांनी केले.
देशभरात पळंमुळं घट्ट रुजलेला राष्ट्रीय कॉंग्रेसपक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे रसातळाला गेला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. या संदर्भात कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी मागे आवाज देखील उठवला होता. अखेर आपल्या पक्षाची वाताहत न पहावल्याने आझाद यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबाबत आत्मपरीक्षण करण्यापेक्षा कॉंग्रेसने आझाद यांच्यावर विखारी टीका केली.
आपल्यावरील टीकेला उत्तर देताना "दुर्दैवाने देशाचा आणि गांधी-नेहरूंचा इतिहास माहित नसलेल्या लोकांना कॉंग्रेसने प्रवक्तेपदी नेमले आहे, त्यामुळे अशा लोकांना आमचा इतिहास माहित नसणे हे स्वाभाविक आहे" असे वक्तव्य केले. "पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना माझे कर्तुत्व माहित असल्याने ते माझ्या विरोधात बोलायला तयार नाहीत, त्यामुळे ज्यांना आपल्या बद्दल माहित नाही, असे लोक आपल्यावर चिखलफेक करत असल्याचे आजाद यांनी सांगितले.
आपल्या मनात सोनिया गांधी यांच्याबद्दल आदर आहे. इंदिरा गांधींचे कुटुंबीय किंवा राजीव गांधी यांचे सुपुत्र या नात्याने राहुल गांधी किंवा गांधी परिवाराबद्दल आपल्या मनात व्यक्तिगत आदर आहे. राहुल गांधी यांना उदंड आयुष्य लाभो पण कॉंगेसचे नेतृत करण्यासाठी ते सक्षम नाहीत. राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी आम्ही प्रयत्न केले, पण ते ऐकतचं नाहीत. त्यांना पक्षात रसच नाही, ते एका जागी बसतच नाहीत, अशी खंत गुलाम नबी आजाद यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली.
नुकतीच कॉंग्रेसची वर्किंग कमिटी विदेशातून नियुक्त केली गेली. एकशे सदोतीस वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. त्यामुळे आपला कोणालाही व्यक्तिगत विरोध नसून कार्यपद्धतीला विरोध आहे, असे आजाद यांनी स्पष्ट केले.