मुंबई (ओंकार मुळ्ये) : समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समाज सबलीकरणासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण काही ना काही कार्य करत असतो. अशातच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून वनवासी विभागातील गरजू बांधवांसाठी रा.स्व.संघ दिंडोशी भाग आणि हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यांच्या घरी गणपती बसतात अशांसाठी एक विशिष्ट 'दानपेटी' या संस्थांतर्फे तयार करण्यात आली आहे. या दानपेटीत जमा होणारा निधी वनवासी विभागातील गरजूंच्या भवितव्यासाठी वापरला जाणार आहे.
गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पेढे-मिठाई न आणता त्या खर्चातली इच्छूक रक्कम या दानपेटीत दान करावी, असे आवाहन रा. स्व. संघाचे दिंडोशी भाग संघचालक वीरेंद्र याज्ञिक आणि हिंदू सेवा संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी केले आहे. या निधीचा उपयोग वनवासी विभागातील गरजू व्यक्ती, शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण, तिथल्या समस्या अशा अनेक गोष्टींसाठी केला जाणार आहे. या संबंधित सविस्तर माहिती 'हिंदू सेवा संघ, महाराष्ट्रचे कार्यकर्ते आशिष साखळकर यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली. 'ईश्वरसेवेतून मानवसेवा या संकल्पनेतून प्रत्येक सामान्य नागरिक नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतो', असे ते यावेळी म्हणाले.
हा उपक्रम मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन ठिकाणी होणार आहे. गणेशोत्सवानंतर या दानपेटीतील रक्कम स्वयंसेवकांतर्फे आपल्या घरून गोळा केली जाईल. त्यानंतर याची रीतसर पावतीही मिळेल. महत्त्वाचे म्हणजे हा मदतनिधी ज्यादिवशी संस्थेच्या केंद्रांकडे सुपूर्त होईल, तो दिवस आणि वेळ संबंधितांना आवर्जून कळवण्यात येईल. आपल्याला या अभिनव उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास दानपेटीसाठी ७७३८८००८१२ / ९८६७३१९५३८ या नंबरवर संपर्क साधा.