भारताच्या जडणघडणीत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे स्थान

    25-Aug-2022   
Total Views |

ind
 
 
 
भारतात संगणक क्रांतीनंतर, मोबाईलच्या वापरात वाढ झाल्यानंतर व ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळाले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करणार्‍या कंपन्या इलेक्ट्रॉनिक उद्योगात समाविष्ट होतात. विसाव्या शतकात अस्तित्वात आलेला हा उद्योग जागतिक पातळीवर मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. या उद्योगाचा एक तोटा म्हणजे, हा उद्योग पर्यावरणाची हानी करणारा इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण करतो. या कचर्‍याची विल्हेवाट कशी लावायची, यावर जगभर विचारविनिमय सुरू आहे. ‘इलेक्ट्रॉनिक’ उद्योगाला पूरक असा ‘सेमी कंडक्टर’ उद्योग आहे. 2017 मध्ये या क्षेत्रात 29 ट्रिलियन डॉलरहून अधिक उत्पादन झाले होते. याची 2018 पर्यंत वार्षिक विक्री 481 अब्ज युएस डॉलर इतकी होती. असा हा इलेक्ट्रॉनिक उद्योग ‘ई-कॉमर्स’शी सुद्धा मोठ्या प्रमाणात निगडित आहे. त्याविषयी सविस्तर...
 
 
इतिहास
 
 
विद्युत ऊर्जा उद्योग 19व्या शतकात सुरू झाला. यामुळे ग्रामोफोन, रेडिओ ट्रान्समीटर, ’रिसिव्हर’ तसेच दूरदर्शन संच ही उत्पादने, उत्पादित होऊ शकली. वैयक्तिक संगणक, टेलिफोन, एमपी 3 प्लेअर, सेलफोन, स्मार्टफोन, ऑडिओ उपकरणे, कॅल्क्यूलेटर, जीपीएस ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल कॅमेरा, डीव्हीडी, व्हीसीआर हे प्लेअर व रेकॉर्डर ही सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादने भारतासह अन्य देशांतही फार मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
 
 
ही उपकरणे वरचेवर ‘अपडेट’ होत असतात. त्यामुळे अगोदरची उत्पादने वापरातून जाऊन त्यांचा कचरा होतो. अमेरिका व चीनमध्ये दरवर्षी सुमारे तीन दशलक्ष टन ‘इलेक्ट्रॉनिक’ कचरा निर्माण होतो. भारतासारख्या देशात पुढच्या दशकात मोबाईल फोन व संगणकाच्या कचर्‍यात सुमारे 500 पट वाढ अपेक्षित आहे.
 
 
एक ‘क्लिक’
 
 
इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानामुळे फक्त व्यवसायवृद्धीच होत नाही, तर समाजातील लोकांचा स्तरही उंचावतो. ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा वापर सध्या ‘बँकिंग’, वित्तीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, दळणवळण क्षेत्र व आरोग्य क्षेत्र येथे फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आतापासून काही वर्षांत भारत देश हा ‘डिजिटली अ‍ॅनेबल नॉलेज-बेस्ड इकोनॉमी’ होईल. भारतीयांना पैसे स्वीकारण्यासाठी किंवा पाठविण्यासाठी आता ‘युपीआय’ (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस)चा वापर करणे आता सहज जमते.
 
 
याचाच अर्थ भारतीयांनी डिजिटल व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर आत्मसात केले आहेत. हॉस्पिटल्सनी ‘ई-कन्सल्टेशन्स’ सेवा सुरू केली आहे. यामुळे घरबसल्या वैद्यकीय सेवा मिळण्याची सोय झाली आहे. ‘प्रॉपर्टी’चे ‘रजिस्ट्रेशन’ करण्यासाठी ‘सब- रजिस्ट्रर’च्या कार्यालयात जावे लागते व ‘प्रॉपर्टी’चे ‘रजिस्ट्रेशन’ करण्यासाठी वेळही बराच फुकट जातो, पण काही विकासकांनी त्यांच्या कार्यालयातून डिजिटल इंटरफेसिस मार्गे प्रॉपर्टी नोंदणी करण्याची सोय त्यांच्या ग्राहकांसांठी उपलब्ध करुन दिली आहे. ग्रामीण भागात राहणारेही आता सहजरित्या डिजिटल व्यवहार करू लागले आहेत. डिजिटल व्यवहारांत वाढ होण्यामुळे भारताचे आर्थिक भविष्य चांगले होऊ शकते. या इलेक्ट्रॉनिक उद्योगातील संगणकीय क्रांतीमुळे कोणत्याही खेड्यात राहणार्‍या विद्यार्थ्यांना शहरातल्या नावाजलेल्या महाविद्यालयाला ‘ई-एज्युकेशन’साठी जोडून घेतल्यास घरातही चांगले शिक्षण मिळू शकते, शासनाला हवे असलेले कागद विरहित व्यवहार ‘ई-हेल्पकेअर’ सेवा, महामार्गाच्या टोलनाक्यावर उपलब्ध असलेली ‘फास्टॅग’ सेवा अशा सेवांमुळे भारतीयांच्या जीवनशैलीतच बदल होत चालला आहे.
 
 
ही इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची ताकद आहे. भारतीयांनाच नव्हे, तर जगातल्या सर्वांनाच चांगल्या पगाराच्या नोकर्‍या आणि चांगले राहणीमान हवे असते, ते इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने कित्येकांच्या बाबतीत शक्य केलेले आहे. तांत्रिक प्रगती व आर्थिक प्रगती ही एकाच गाडीची चाके आहेत. जगभर बर्‍याच प्रमाणात आर्थिक प्रगतीही तांत्रिक प्रगतीमुळेच झाली आहे. याचा सपाटा एवढा आहे की, आजचे उत्पादन, उद्या कालबाह्य होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक उद्योग त्या-त्या देशातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावू शकतो. या डिजिटल क्रांतीत ग्रामीण भागातील जनतेनेही शहरातील लोकांचा वेग पकडावा म्हणून शासनाने प्रयत्न करावयास हवे.
 
 
आपल्या देशाने नवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक ‘कनेक्टिव्हिटी’ व ‘मोबिलिटी’ यात जास्तीत जास्त गुंतवणूक करायलाच हवी. कारण, नवीन तंत्रज्ञान हा देशाच्या विकासासाठी पाठीचा कणा आहे. डिजिटल व्यवहार वाढत असल्यामुळे ‘डाटा प्रायव्हसी’ व ‘डाटा सिक्युरिटी’ यांच्याबाबत दक्षता घ्यावयास हवी. भारताच्या 75 वर्षांच्या यशोगाथेत ’आयटी’ क्षेत्राचा वाटा मोठा आहे. बर्‍याच ‘सॉफ्टवेअर’ कंपन्यांसाठी भारत हा ‘आयटी हब’ आहे. भारतात ‘आयटी’ क्षेत्राने बरेच रोजगारही दिले. भारताच्या ‘जीडीपी’त ‘आयटी’ क्षेत्राचा वाटा आठ टक्के आहे. हे क्षेत्र 50 लाख लोकांना रोजगार देते. भारताने 1991 साली अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर आपल्याकडे ‘आयटी’ उद्योगाने क्रांती केली. आपल्या देशाकडे ‘आयटी’ क्षेत्राचे जागतिक नेतृत्व आहे.
 
 
भारतातील ‘आयटी’ क्षेत्रातील कित्येक तरुण आज प्रगत देशात नोकरीस आहे, तर कित्येक भारतात राहून परदेशातील कंपन्यांना सेवा देत आहेत. केंद्र सरकारच्या ’मेक इन इंडिया’ व ’स्टार्टअप इंडिया’ या संकल्पनामुळे आर्थिक वाढ झाली आहे.
कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. शिक्षणही ऑनलाईन झाले. बरेच व्यवहार ऑनलाईन झाले. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून व्यवहारांची संख्याही वाढली. 2025 पर्यंत भारतात 900 दशलक्ष ‘इंटरनेट युजर्स’ असतील, असा अंदाज आहे. गेली काही दशके देशातील माहिती-तंत्रज्ञान व ‘कम्युनिकेशन’ उद्योगाने दोन आकडी वाढ साधली आहे. वैयक्तिक संगणक व ‘इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट डिव्हायसेस’ यांची मागणी देशात सतत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ व ‘बी टू बी व्यवहारांतही वाढ होत आहे सध्याच्या ग्राहकांना त्यांना उत्पादनापासून काय पाहिजे, याची चांगली जाण असते. ‘गेमिंग’ व्यवसायही जोर धरत आहे, हा व्यवसाय या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत 29 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवेल, असा अंदाज आहे.
 
 
यावर्षी 100 दशलक्ष गेमर्स असतील, आपल्या देशात सुरुवातीला एका घरात एक संगणक होता, आता प्रत्येक माणशी एक संगणक लागतो. घरी एक ‘लॅण्डलाईन’ फोन होता. पण, आता घरात जितकी माणसे तितके मोबाईल असतात. कधीकधी तर घरातल्या माणसांपेक्षाही मोबाईलची संख्या जास्त असते. लॅपटॉपधारकांची संख्याही भारतात प्रचंड आहे.
 
 
एकूणच काय तर इलेक्ट्रॉनिक उद्योगाला फार चांगले भवितव्य आहे. कारण, याची उत्पादने ‘अपडेशन’मुळे सातत्याने बदलत असतात. भारतात ‘5 जी’ तंत्रज्ञान आल्यावर मोबाईलमध्येही आमूलाग्र बदल होतील. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात जेवढे जलद बदल होतात, तेवढे इतर उद्योगात होत नाहीत व हा उद्योग पुढे नेण्यासाठी जी कौशल्य असलेले मनुष्यबळ लागते, तेही भारतात उपलब्ध आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.