नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत अवमानकारक ट्विट करणाऱ्या मोना आंबेगावकर या महिलेवर कडक कारवाई झालीच पाहिजे यासाठी लोकसभेतील शिवसेना गटनेते राहुल शेवाळे यांनी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांकडे निवेदन सादर केले आहे. त्या महिलेवर तात्काळ कारवाई व्हावी आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अवमान करण्यास कोणीही धजावू नयेत यासाठी या प्रकारांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली आहे.
मोना हिने २२ ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल वादग्रस्त ट्विट केले. ज्यात सावरकरांनी शिवाजी महाराजांवर कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठ्वण्याबद्दल टीका केली आहे असे म्हटले होते. त्या महिलेबाबत नक्की काय करावे असे सावरकरांना अपेक्षित होते असे सवालदेखील त्या ट्विटमध्ये मोना हिने केले होते. शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्राच्या या दोन महापुरुषांबद्दल अशा पद्धतीने अत्यंत खालच्या भाषेत टिपण्णी करणे हे अत्यंत निंदनीय आहे असे राहुल शेवाळेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
कुठलाही ऐतिहासिक आधार नसलेली आणि फक्त सामाजिक शांतता बिघडवणे याच हेतूने हे कृत्य त्या महिलेने केले आहे, त्यामुळे अशी विधाने करणे हे अत्यंत निंदनीय आहे आणि हे प्रकार बंदच झाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे अशी गरज राहुल शेवाळेंनी या भेटीत व्यक्त केली आहे.