अमोल मिटकरी हा राजकारणाला लागलेला काळा डाग : महेश शिंदे
24-Aug-2022
Total Views | 189
216
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली. या सगळ्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यात वाद झाला. यावेळी अमोल मिटकरींनी आपल्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ झाल्याचे आणि मारहाण झाल्याचे म्हटले. आमदार महेश शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देत या आरोपांचे खंडण केले.
शिंदे म्हणाले, "पन्नास खोके एकदम ओके तुम्ही म्हणाला याला उत्तर देण्यासाठी आम्ही विधानभवनाच्या दारातील पायऱ्यांवर विरोधकांना उत्तर देण्यासाठी आम्ही 'लवासाचे खोके बारामती ओके', असे म्हणाल्यावरच अमोल मिटकरींनी झोंबलं. आमच्या आंदोलनात खोडा घालायला मिटकरी आले. त्यानंतर हा वाद झाला. अमोल मिटकरींना माझं एकच म्हणणं आहे. गेली अडीच वर्षे तुम्ही बसून अर्थखाते धुवून खाल्ले त्यावेळी आम्ही तुम्हाला काही बोललो का?", असा सवालही त्यांनी केला.
'या प्रकरणाचे सीसीटीव्ही छायाचित्रण पाहूनच कारवाई करावी, अशी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. अमोल मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळाडाग आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो परंतु त्यांना हे झोंबल्याने आमच्या अंगावर ते आल्याचा आरोप,असा महेश शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले कि, "आम्ही बाळासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकत काम करत आहोत. मागच्या अडीच वर्षात त्यांनी केलेल्या कृत्याचा परिणाम ते भोगत आहेत."
मिटकरी म्हणाले, "शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की केली. घाणेरडी शिवीगाळ केली. त्यांनी आम्हाला आई बहीणीवरून शिवी दिली. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो." घडलेला प्रकार हा असंसदीय आहे. या प्रकारानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मिटकरींना सबुरीचा सल्ला त्यांनी दिला.