ईश्वरोपासक चारुदत्त...

    23-Aug-2022   
Total Views | 136

chn

 
 
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी श्लोक वदवून घेतले आणि भक्तीचा अनोखा चमत्कारच घडला. पण, आजच्या आधुनिक युगात नाशिकच्या एका अवलियाने त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू स्वरचित अभंगांनी जीवंत केली आहे. अशा या ईश्वरोपासक चारुदत्त यांच्या भक्ती आणि लेखणीची ही कहाणी...
 
 
भवताली सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व आहे, असे आपण कायम म्हणत असतो. त्यामुळे प्रत्येक सजीव व निर्जीव घटकात असणारे परमेश्वराचे अस्तित्व व्यक्ती आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्नही करत असतो. नाशिक येथील चारुदत्त थोरात यांनीदेखील आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने ईश्वरी उपासनेचा मार्ग स्वीकारला आहे.
 
 
चारूदत्त थोरात यांनी वयाच्या 18व्या वर्षी ’दत्ताश्रय’ नावाचा ग्रंथ लिहिला, तर वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी चक्क हजारो अभंगांची रचना केली. आश्चर्य म्हणजे, त्यांनी हे अभंग आपल्या घरातील दारे, खिडक्या, खुर्च्या, भांडी आणि भिंतींवरदेखील लिहिले. विशेष बाब म्हणजे, हे कार्य करण्यासाठी त्यांचे कोणतेही आध्यात्मिक शैक्षणिक घडण झालेली नाही. पण, तरीही त्यांच्या राहत्या घरातील प्रत्येक कोपर्‍यात त्यांचे स्वरचित अभंग लिहिलेले सहज दिसून येतात.
 
 
त्यांच्या घरातील प्रत्येक कोपर्‍यात, भांड्यांवर, कपाट, मशीन, मिक्सर, पंखा अशा सर्वच वस्तूंवर आपल्याला अभंग लिहिल्याचे दिसून येते. त्या अभंगाची संख्या इतकी आहे की, ते एकत्र केले तर त्याचे सहज एक पुस्तक तयार होईल. चारुदत्तच्या घरात प्रवेश करताच त्याने स्वतः रचलेल्या अद्भुत अशा अभंगांचे लिखाण पावलोपावली आपल्याला दिसते.
 
 
त्याच्या घरातील क्वचितच एखादा असा कोपरा सुटला असावा, जो अभंगाच्या रूपात शाईत रंगला नसेल. या ‘दत्ताश्रय’ग्रंथात मानवी जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडल्याचा दावा चारुदत्त थोरात यांनी केला आहे. चारुदत्तचे अगम्य लिपीत लिहिलेले अभंग त्यांच्या ज्ञानाच्या सीमांचं दर्शन घडवणारे असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना दिसतात. संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेत चारूदत्त यांनी वयाच्या 12व्या वर्षी अभंग लेखनास सुरुवात केली असल्याचे त्याचे आई-वडील सांगतात.
 
 
श्रद्धा व उपासना यांचा संवैधानिक हक्क भारतीयांना प्राप्त आहे. मात्र, त्याचे अवडंबर होता कामा नये व त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी मिळता काम नये, हीच भूमिका असणे आवश्यक आहे. चारूदत्त यांचे लेखनकार्य हे अकल्पित असून त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनतही नक्कीच दखलपात्र आहे.
 
 
मानवी जीवनात असणारी रिक्त जागा ही मानवी मनातील विचारांनी भरली जात असते. या मनावर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ या षड्र्िपूंचा थर बसू नये, म्हणून संतांनी विविध प्रकारे जनजागृती केली आहे. तोच संदेश सजीव मनावर कोरण्यापूर्वी निर्जीवांच्या रिक्त जागांवर त्याची प्रचिती शोधण्याचा प्रयत्न चारूदत्त यांच्या कार्यातून प्रतिबिंबित होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इयत्ता आठवीत असताना चारूदत्त यांना याबाबत आवड असल्याची जाणीव त्यांच्या आई-वडिलांना झाली.
 
 
सुरुवातीला मुलाचे मानसिक आरोग्य बिघडले असावे, कुठे काही भयानक दृश्य पाहिले असावे, भेदरला असावा किंवा विचित्र स्वप्न पडत असावे, अशी शंकादेखील चारूदत्त यांच्या पालकांना आली. त्यामुळे आपली शंका दूर करत ईश्वरी उपासनेचा वेगळा मार्ग निवडणार्‍या चारूदत्त यांच्या कार्यास बळ देण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले.
 
 
चारूदत यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून लिहिण्यास खर्‍या अर्थाने सुरुवात केली. आजवर त्यांनी केलेले लेखन हे कागदरूपी पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित करावयाचे झाल्यास त्यांची काहीशी पुस्तके नक्कीच प्रकाशित होऊ शकतील, असा विश्वास त्यांचे पालक महेश व ज्योती थोरात व्यक्त करतात. त्यांच्या प्रकाशित ‘दत्ताश्रय’ या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पदवीधर असलेले चारूदत्त गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अध्यात्मिक आणि राष्ट्रीय विषयांवर लिहीत आहे.
 
 
त्यांच्या ‘काव्य विष्णु’ या सदनाचा उंबरा ओलांडून आत पाऊल ठेवताना कुठे पाऊल ठेवावे असा प्रश्न पडतो. कारण, नजर जाईल तिथे विविध प्रकारचे गुढ चक्र, श्लोक,अध्यात्मिक साहित्य लिहिल्याचे दिसते. हे सारे पाहून मती स्तब्ध होते. मात्र, आत प्रवेश करताना संकोच न करता घरभर मोकळ्या मनाने फिरून या अद्भुत ज्ञान साहित्याचा आस्वाद सहजपणे कोणालाही घेता येऊ शकतो. या जतन केलेल्या अनमोल ठेव्यातील काही निवडक अंश वेचून त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे.
 
 
मानवी जीवनात आदर्श हे कायमच महत्त्वाचे असतात, नव्हे ते असायलाच हवेत. जीवनातील आदर्श हे जर आध्यात्मिक ज्ञान व आपले भारतीय परंपरेतील श्लोक असतील, तर प्राप्त ज्ञानाची उंची वाढण्यास मदत होते, असे मत चारूदत्त मांडतात. भारताला थोर ऋषीमुनींची परंपरा लाभली असून, भारतीय समाज घडणीत संतांचे असणारे योगदानदेखील अभूतपूर्व आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचे आणि आचरणांचे स्मरण सदोदित व्हावे, यासाठी कार्य करणार असल्याचे ते सांगतात. दर्शनी भागावर असलेले आपले अभंग हीच प्रेरणा अंतस्थ मनात काम जागृत ठेवण्यास मदत करत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या कार्यास आगामी काळासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेछा! 
 
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121