"भारत सोडून जा! ५० कोटी मिळतील!", धमकी देणाऱ्याची करुणा शर्मांनी केली शिंदेंकडे तक्रार!
23-Aug-2022
Total Views | 170
127
मुंबई : महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनानंतर आरोपप्रत्यारोपांचे नाट्य सुरू असताना पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवार दि. २२ ऑगस्ट रोजी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी शर्मा यांनी आपल्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप केल्याने, माजी सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
काय आहे प्रकरण -
पत्नी शिवाय आपले करुणा शर्मा या महिलेशी संबंध असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे शोशल मीडियावर कबूल केले होते. करुणा शर्मा यांची बहिण रेणुका शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी असलेले नाते जाहीर केले असल्याचे बोलले जाते.
नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी आपली बदनामी करण्याच्या हेतूने तसेच आपल्याला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यामांवर आपली व्यक्तिगत व अत्यंत खासगी माहिती प्रकाशित करून आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.
तसेच, आपले त्यांच्याशी असलेले संबध परस्पर सहमतीने सुरू होते. या संबंधाबद्दल आपली पत्नी व आपल्या कुटुंबीयांना देखील माहीत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. करुणा शर्मा त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा व बहिण रेणुका यांना सोबत घेऊन आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिली होती.
कोण आहेत करुणा शर्मा?
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे २००३ पासून खासगी संबंध आहेत. करुणा शर्मा मूळच्या इंदौरच्या असल्याची माहिती मिळते. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. या दोन्ही मुलांचे पालक म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव लावले असल्याचे मुंडे यांनी कबूल केले आहे.
करुणा शर्मा यांच्या मुलांचे आपण पिता असल्याने त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे धनंजय मुंडे यांनी या आधीच जाहीर केले आहे. करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी मुंबईत घर घेऊन दिले असून त्यांचा भाऊ ब्रिजेश याला देखील व्यवसायात मदत केली आहे.
का झाली होती करुणा शर्मा यांना अटक -
करुणा शर्मा व त्यांचा मित्र अजय देढे या दोघांना जानेवारी २०२२ रोजी येरवडा पोलिसांनी अटक केली होते. अजय देढे हा करुणा शर्मा यांचा पीए म्हणून वावरत असून त्यादोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने या दोघांनी आपल्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकून आपल्याला मारहाण केली, असा आरोप देढेच्या पत्नीने केला होता.
तसेच, शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे अजय देढे याच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार कलम ४९८ (अ), ३७७, ३२३, ५०४, ५०६ (२), ३४ अन्वये गुन्हा दाखल करून घेत करुणा शर्मांना अटक केली होती. परंतु, आपल्याला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा करुणा शर्मा यांच्यावतीने करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करुणा शर्मा यांनी कोणती मागणी केली -
आपल्यावर अॅट्रॉसिटीच्या दोन खोट्या केसेस टाकण्यात आल्या आहेत. त्यातून आपली मुक्तता करण्यात यावी. तसेच आपल्याला ५० कोटी रुपयांचे आमिष दाखवून आपण भारत सोडवा, यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे. ज्यापद्धतीने माझ्या आईने आत्महत्या केली तशीच मी आत्महत्या करावी यासाठी मला वेगवेगळ्या पद्धतीने धमकावण्यात येत आहे.
याआधी आपल्याला १६ दिवसांसाठी आणि नंतर ४१ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे. माझ्या आईने जशी आत्महत्या केली होती, तशाच पद्धतीने मी आत्महत्या करावी यासाठी मला प्रवृत्त केले जात आहे. मात्र मी घाबरत नाही. मी लढत राहीन,” असे करुणा शर्मा म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्याकडून न्याय मिळेल, असा मला विश्वास करताना आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.