रामस्वामी नायकर उर्फ पेरियार हे तामिळनाडूमधील द्राविडी चळवळीचे जनक. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याची आंदोलने त्यांच्याच काळात तामिळनाडूमध्ये झाली होती. अशा या हिंदूद्वेष्ट्या पेरियार यांचा पुतळा त्या मंदिरासमोर कशासाठी, असा रास्त प्रश्न कन्नन यांनी विचारला होता. तो पुतळा पाडून टाकण्याची मागणी त्यांनी केली होती.
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम रंगनाथर मंदिराच्या बाहेर असलेला पेरियार यांचा पुतळा पाडून टाकावा, अशी मागणी केल्याबद्दल अटकेत असलेले तामिळनाडू चित्रपट सृष्टीतील स्टंट मास्टर कनल कन्नन यांची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी ‘हिंदू मुन्ननी’ या संघटनेने 16 ऑगस्ट रोजी तामिळनाडूमध्ये जोरदार निदर्शने केली. ‘हिंदू मुन्ननी’ने 34 दिवसांच्या यात्रेचे आयोजन केले होते आणि त्या यात्रेची सांगता चेन्नईमध्ये आयोजित जाहीर सभेने झाली. त्या सभेत कनल कन्नन यांनी पेरियार यांचा पुतळा पाडून टाकण्याची मागणी केली होती. कनल कन्नन हे ‘हिंदू मुन्ननी’च्या राज्य कला आणि साहित्य शाखेचे अध्यक्ष आहेत.
आपल्या भाषणात कनल कन्नन यांनी, आपण हिंदू आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे स्पष्ट केले. “सध्या धर्मांतराचा वापर करून अन्य धर्मीय देश बळकावत सुटले आहेत. श्रीरंगम रंगनाथर मंदिरामध्ये रोज हजारो श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात. याच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच देवावर विश्वास नसलेल्या व्यक्तीचा म्हणजे रामस्वामी नायकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्या दिवशी तो पुतळा उद्ध्वस्त होईल, तो दिवस हिंदू पुनरुत्थानाचा ठरेल,” असे कन्नन यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कन्नन यांचे ‘श्रीरंगममधील पेरियार यांचा पुतळा उद्ध्वस्त करा,’ हे शब्द समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाले. त्यावरून तामिळनाडूमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. रामस्वामी नायकर उर्फ पेरियार हे तामिळनाडूमधील द्राविडी चळवळीचे जनक. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याची आंदोलने त्यांच्याच काळात तामिळनाडूमध्ये झाली होती. अशा या हिंदूद्वेष्ट्या पेरियार यांचा पुतळा त्या मंदिरासमोर कशासाठी, असा रास्त प्रश्न कन्नन यांनी विचारला होता. तो पुतळा पाडून टाकण्याची मागणी त्यांनी केली होती. ‘थनथाई पेरियार द्रविड कझगम’ या संघटनेच्यावतीने चेन्नई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर कन्नन यांना अटक करण्यात आली. कनल कन्नन हे तामिळनाडूमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील स्टंट दृश्यांचे कोरिओग्राफर राहिलेले आहेत.
कनल कन्नन यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी ‘हिंदू मुन्ननी’ या संघटनेने राज्यभरात 70 ठिकाणी निदर्शने आयोजित केली होती. या निदर्शनात सहभागी झालेल्या काहींना पोलिसांनी अटक केली, तर काहींची त्याच दिवशी संध्याकाळी सुटका करण्यात आली.
चेन्नईमध्ये ज्या ठिकाणी निदर्शने योजण्यात आली होती त्या ठिकाणास, सदर जागा ही मुस्लीमबहुल भागात असल्याचे सांगून पोलिसांनी आक्षेप घेतला होता. पण, मुन्ननीच्या नेत्यांनी तो खोडून काढला. वल्लुवर कोट्टम हे परवानगी असलेले क्षेत्र असून त्या स्थानी अल्पसंख्याक, द्राविडी आणि डाव्या पक्षांना निदर्शने करण्यासाठी अनुमती देता कामा नये, असे मुन्ननीचे म्हणणे होते. बर्याच वादावादीनंतर पोलिसांनी त्या स्थानी निदर्शने करण्यास अनुमती दिली. पण तेथे निदर्शने करणार्या सर्वांना अटक केली. पोलीस केवळ हिंदू मुन्नानीच्या कार्यकर्त्यांना अटक करीत असल्याच्या निषेधार्थ तेनकासी जिल्ह्यातील अयाकुडी गावात एका कार्यकर्त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशीच निदर्शने तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी करण्यात आली.
श्रीरंगम मंदिरासमोर रामस्वामी नायकर यांचा पुतळा 2006 साली उभारण्यात आला. त्यावेळी द्रमुक नेते एम. करुणानिधी यांनी त्या कृतीचे समर्थन केले होते. हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडविणारे वक्तव्य तेव्हा करुणानिधी यांनी केले होते. “मंदिराच्या आतमध्ये हिंदू देवदेवतांच्या वस्त्रहीन मूर्ती असतात. ते पाहता चांगले कपडे परिधान केलेल्या रामस्वामी नायकर यांचा पुतळा मंदिराबाहेर उभारण्यात चुकीचे काय,” असा प्रश्न तेव्हा त्यांनी विचारला होता. त्यावेळी “थिलाई नटराजर आणि श्रीरंगम रंगनाथर ही मंदिरे जेव्हा उडवून दिली जातील तो दिवस चांगला असेल,” असे स्फोटक वक्तव्यही करुणानिधी यांनी केले होते.
तामिळनाडूमध्ये जे द्रमुक सरकार आहे, ते हिंदू समाजाबद्दल आकसाने वागत असल्याची अनेक उदाहरणे घडत आहेत. हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे. हिंदूंची धर्मांतरे करणार्या ख्रिश्चन समाजास पाठीशी घातले जात आहे. अशा हिंदू विरोधकांविरुद्ध ठामपणे आणि आक्रमकपणे लढणारी संघटना म्हणून ‘हिंदू मुन्ननी’कडे पाहिले जाते.
‘बालगोकुलम’ जन्माष्टमी समारंभास चांगला प्रतिसाद
‘बालगोकुलम’ ही बालकांसाठीची चळवळ असून, या चळवळीने केरळमध्ये आपले पाय भक्कम रोवले आहेत. बालकांसाठीची अशा प्रकारची जगातील ही एकमात्र चळवळ असावी! दरवर्षी जन्माष्टमीनिमित्त ‘बालगोकुल’मच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीकृष्ण, राधा, वासुदेव, बलराम, यशोदा, भीम , अर्जुन यांच्या वेशभूषा करून हजारो बालके यानिमित्ताने आयोजित शोभायात्रांमध्ये सहभागी होत असतात. गेल्या 18 ऑगस्ट रोजी केरळमधील लहान मोठी शहरे, लहान लहान गावांमधील रस्त्यांनी जणू मथुरेचे रूप धारण केले होते. आपल्या लहानग्या मुलांना कृष्णाची वेशभूषा करून आणि त्यांना कडेवर घेऊन असंख्य माता या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
संपूर्ण केरळमध्ये सात हजारांहून अधिक शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या, अशी माहिती ‘बालगोकुलम’च्या एका पदाधिकार्याने दिली. सुमारे दोन लाख लोक या शोभायात्रांमधून सहभागी झाले होते. ‘बालगोकुलम’ ही चळवळ सुमारे 50 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झाली. आज या ‘बालगोकुलम’ने भव्य रूप धारण केले आहे. या संघटनेतर्फे साप्ताहिक सांस्कृतिक वर्ग चालविले जातात. जन्माष्टमी शोभायात्रा हा ‘बालगोकुलम’चा एक भव्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात धार्मिक, जातीपातीचे आणि राजकीय भेद बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. केरळमध्ये या ‘बालगोकुलम’ चळवळीने आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे.
मादागास्करच्या राजधानीत पहिले हिंदू मंदिर
मादागास्करची राजधानी असलेल्या अंतानानारिओ या राजधानीच्या शहरात अलीकडेच एका भव्य हिंदू मंदिराची उभारणी करण्यात आली. हिंदी महासागरातील एक अत्यंत मोठे बेट अशी मादागास्करची ओळख आहे. या देशाची लोकसंख्या आहे अवघी 2 कोटी, 60 लाख. मंदिराच्या उद्घाटनास मादागास्करमधील भारतीय राजदूत अभय कुमार हे आवर्जून उपस्थित होते. मादागास्करच्या राजधानीत उभारण्यात आलेले हे पहिले हिंदू मंदिर आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरू होते. मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना तेथील हिंदू समाजाचे अध्यक्ष संजीव हेमतलाल म्हणाले की, राजधानीच्या शहरात उभारण्यात आलेले हे भव्य मंदिर ही येथील हिंदू समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
मादागास्करमध्ये मूळ भारतीय वंशाचे सुमारे 20 हजार नागरिक आहेत. त्यातील बहुसंख्य गुजरातमधून आलेले आहेत. त्यामधील बहुतांश हिंदूधर्मीय आहेत. मादागास्कर देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये लहान लहान हिंदू मंदिरे आहेत. मादागास्कर बेटावर भारतीयांचे आगमन 18व्या शतकाच्या अखेरीच्या काळात झाले. तेथे स्थायिक झालेल्या भारतीयांनी मादागास्करच्या आर्थिक विकासामध्ये मोलाची भर घातली आहे. मादागास्कर आणि भारतामध्ये चांगले संबंध असून उभय देशांमध्ये अनेक करारही झाले आहेत. हिंदू धर्माची पताका विदेशातील अनेक देशांमध्ये फडकत असून मादागास्कर हे त्याचे आणखी एक उदाहरण!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.